उर्दा (स्पेन)
स्पेनमध्ये बुधवारी सकाळी एक अत्यंत भीषण रेल्वे अपघात घडला असून, दोन हाय-स्पीड ट्रेन एकमेकींवर आदळल्याने झालेल्या या दुर्घटनेत किमान ६८ जणांचा मृत्यू झाला आहे. या वर्षभरातील हा दुसरा सर्वात मोठा रेल्वे अपघात असून, या घटनेमुळे स्पेनमध्ये शोककळा पसरली आहे.
कास्टिला ला मानचा प्रादेशिक सरकारने मृतांच्या संख्येला दुजोरा दिला असून, या अपघातात ५८ हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी बचाव पथकाकडून अद्यापही शोध आणि मदतकार्य वेगाने सुरू आहे.
स्पेनच्या ADIF या रेल्वे यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात टोलेडो प्रांतातील उर्दा आणि लॉस येबेनेसेस दरम्यान घडला. राजधानी माद्रिदहून सेव्हिलच्या दिशेने जाणाऱ्या दोन हाय-स्पीड ट्रेन एकाच रुळावर आल्याने ही टक्कर झाली. सरकारी कंपनी 'रेन्फे' (RENFE) ची ट्रेन रुळावर थांबलेल्या खाजगी कंपनी 'इरियो' (IRYO) च्या ट्रेनवर वेगाने धडकली. या जोरदार धडकेमुळे दोन डबे रुळावरून खाली घसरले.
या वर्षी जानेवारीमध्येही स्पेनच्या दक्षिणेकडील भागात असाच एक भीषण रेल्वे अपघात घडला होता. १९९२ मध्ये हाय-स्पीड रेल्वे जाळे सुरू झाल्यानंतर या वर्षापूर्वी कधीही असा प्राणघातक अपघात झाला नव्हता, त्यामुळे या वारंवार होणाऱ्या दुर्घटनांवर तीव्र चिंता व्यक्त होत आहे.
अपघातानंतर माद्रिद, सियुड रियाल आणि आंदालुसिया दरम्यानची रेल्वे सेवा तात्काळ स्थगित करण्यात आली आहे. स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून, सर्व सरकारी कार्यक्रम रद्द केले आहेत. राजा फिलिप सहावा यांनीही घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.