सौदी अरेबिया आणि पश्चिम आशियातील संघर्षात २२ भारतीय नागरिकांचा बळी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 5 h ago
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत बोलताना.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत बोलताना.

 

नवी दिल्ली 

पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षात १४ खलाशांसह एकूण २२ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या संपूर्ण भागातील बिघडलेल्या परिस्थितीवर भारताने तीव्र चिंता व्यक्त केली आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) बुधवारी दिली.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी नियमित साप्ताहिक पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, पश्चिम आशियातील चालू असलेल्या संघर्षाबद्दल आम्हाला गांभीर्याने चिंता वाटत असून, या संघर्षात आपण २२ भारतीय नागरिक गमावले आहेत. यात १४ खलाशांचाही समावेश आहे.

आखाती देशांतील भारतीयांच्या सुरक्षेवर भर

आखाती प्रदेशातील आपल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी सरकार सतत संपर्कात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सौदी अरेबियामध्ये तीन भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहितीही त्यांनी दिली. या वर्षी फेब्रुवारीमध्ये अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर पश्चिम आशियातील संघर्षाला सुरुवात झाली होती.

सौदी अरेबियाच्या नागरी पायाभूत सुविधा आणि आर्थिक मालमत्तांवर हूती बंडखोरांनी केलेल्या हल्लांमुळे या भागात तणाव अचानक वाढला आहे. हूती हल्ल्यांमुळे प्रादेशिक स्थिरता धोक्यात येत असून बाब-एल-मंडेब सामुद्रधुनीमधील नौकानयनाचे स्वातंत्र्य धोक्यात आल्याचे भारताने म्हटले आहे. इराण समर्थित हूती गटाने सौदी अरेबियाच्या पूर्व-पश्चिम तेल पाइपलाइनवर हल्ला केला आहे, जी कच्चे तेल पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते.