मुंब्राची रुख्सार खान देतेय जगभरातील महिलांना योगाचे धडे

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
रुख्सार खान
रुख्सार खान

 

भक्ती चाळक

उत्तर प्रदेशातील हुसैनाबाद या छोट्या शहरातून आलेली एक मुस्लिम मुलगी. तीने केवळ बारावीपर्यंत शिक्षण घेतले आणि कमी वयातच तिचे लग्न देखील झाले. ती आज मुंबईत महिलांना आरोग्याचे धडे देतेय. आयुष्यात जबाबदाऱ्यांचे डोंगर, तीन मुलांचे संगोपन आणि आजारपणाची आव्हाने समोर उभी असताना, तिने स्वतःला सिद्ध केलंय. ही गोष्ट आहे मुंब्रा येथील योग प्रशिक्षक आणि हेल्थ कोच रुख्सार खान यांची.

रुख्सार यांचे बालपण उत्तर प्रदेशात गेले. वडिलांचा बुट-चप्पलच्या दुकानात सेल्समॅनची नोकरी करायचे. एक भाऊ आणि चार बहिणींमध्ये त्या सर्वात मोठ्या. त्यांची आई गृहिणी. परंतु आईने स्वतःची स्वप्ने बाजूला ठेवून मुलांच्या शिक्षणासाठी पराकाष्ठा केली. रुख्सार या भावंडांमध्ये थोरल्या असल्याने वयाची अठरा वर्षे पूर्ण करताच त्यांचे लग्न झाले आणि त्या महाराष्ट्रात आल्या.

इच्छा असेल तिथे मार्ग दिसेल 
अनेकदा महिला लग्नानंतर किंवा मुलं झाल्यावर स्वतःची स्वप्नं बाजूला ठेवतात. वय वाढलं की ‘आता आमचं काय राहिलंय’ असा विचार करतात. पण रुख्सार खान यांनी या साच्याला छेद दिला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. ‘आवाज-द-व्हॉईस’शी बोलताना त्यांनी आपल्या या संघर्षमय आणि तितक्याच प्रेरणादायी प्रवासाबद्दल सांगितले.

घरातली एकमेव सून असल्याने सर्व कौटुंबिक जबाबदाऱ्या त्यांच्यावर आल्या. या गडबडीत शिक्षणाचा धागा सुटला आणि बारावीनंतरचे शिक्षण अधुरेच राहिले. त्यांना दोन्ही गोष्टीचा समतोल राखता न आल्याने त्यांनी अभ्यासाला तात्पुरता अभ्यासाला पूर्णविराम दिला. पण मनात शिकण्याची आणि काहीतरी करण्याची जिद्द कायम होती.

रुख्सार म्हणतात, “मला आयुष्यात एक गोष्ट स्पष्ट ठाऊक होती; जे करायचं ते पूर्ण ताकदीने आणि १०० टक्के देऊन करायचं, नाहीतर करायचंच नाही. वेळ फुकट घालवणं मला पटत नाही.”

मुलाच्या अभ्यासापासून शिकवणीची सुरुवात
घरकामात गुंतलेल्या रुख्सार यांच्या आयुष्याला पहिलं वळण मिळालं, जेव्हा त्यांचा मोठा मुलगा शाळेत जाऊ लागला. रुख्सार त्याला स्वतः घरी शिकवायच्या. मुलाला शिकवता शिकवता त्याच्या अभ्यासात चांगली प्रगती दिसू लागली. मुलाचा चांगला निकाल पाहून शेजारच्या पालकांनी रुख्सार यांना ट्यूशनबद्दल विचारणा केली. 

अशारितीने शेजाऱ्यांनी रुख्सार यांच्याकडे स्वतःची मुलं अभ्यासाला पाठवू लागली. तिथून त्यांच्या होम ट्यूशनची सफर सुरू झाली. कुर्ला येथे राहत असताना त्यांनी सलग ९ वर्षे लहान मुलांचे ट्यूशन घेतले.

योगा क्षेत्रातील पहिलं पाऊल
काही वर्षांनंतर रुख्सार यांचं कुटुंब कुर्ल्यावरून मुंब्र्याला शिफ्ट झालं. तिथे आल्यावर पाण्याचा बदल आणि हवामानामुळे त्यांना आरोग्याच्या समस्या भेडसावू लागल्या. सतत आजारी पडण्यामुळे त्या त्रस्त झाल्या होत्या. फिटनेसची आवड आधीपासूनच असल्याने त्यांनी आरोग्यात सुधारणा व्हावी म्हणून एका स्थानिक योगा स्टुडिओमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.

मात्र, तिथे गेल्यावर त्यांना चित्र खूप वेगळं दिसलं. लोक फक्त येणे-जाणे करत होते, योगाचे प्रकार चुकीच्या पद्धतीने केले जात होते आणि कोणालाच त्याबद्दलची योग्य माहिती नव्हती. हे पाहून रुख्सार यांच्या मनातील अभ्यासू वृत्ती पुन्हा जागी झाली.

याविषयी रुख्सार सांगतात, “आम्ही तासभर वेळ देतोय, पण आरोग्यासाठी काहीच फायदा होत नाहीये हे पाहून मला खूप विचित्र वाटलं. तिथेच मी ठरवलं, मला याचं योग्य शिक्षण घ्यायचंय आणि एक परफेक्ट हेल्थ कोच बनायचंय.”

डोंबिवलीत घेतलं योगाचं शिक्षण 
स्वतःला सिद्ध करायच्या ध्येयाने रुख्सार यांनी मुंब्र्यातून थेट डोंबिवली गाठलं आणि तिथे योगाचं शास्त्रीय प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. शरीराची रचना (ॲनाटोमी), विविध आजार आणि योगाचे योग्य फॉर्म्स यांचा त्यांनी सखोल अभ्यास केला.

रुख्सार यांनी योगामध्ये प्रशिक्षण पूर्ण करून अधिकृत प्रमाणपत्र देखील मिळवले. प्रात्यक्षिक आणि डेमो क्लासेसमध्ये त्यांचा परफॉर्मन्स इतका उत्तम राहिला की, ज्या स्टुडिओमध्ये त्यांनी प्रशिक्षण घेतलं, त्याच संस्थेने त्यांना तिथेच ट्रेनर म्हणून नोकरी दिली. परंतु काही दिवसांनी त्यांनी फिटनेस योगशाला नावाने स्वतःचा योगा स्टुडीओ उभारला आणि महिलांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली.

या संपूर्ण प्रवासात रुख्सार यांचे पती इम्रान खान हे त्यांची भक्कम ढाल बनून उभे राहिले. इम्रान हे पेशाने इलेक्ट्रिकल इंजिनिअर असून ते स्वतःचा व्यवसाय चालवतात. त्यामुळे त्यांनाही वाटत होते रुख्सार यांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे. रात्रीचा अभ्यास असो वा क्लासला जाण्या-येण्याची सोय, पतीने प्रत्येक पावलावर त्यांना पूर्ण पाठिंबा दिला.

सामाजिक गैरसमजांना केराची टोपली 
योगा क्षेत्रात काम करताना रुख्सार यांच्यासमोर एक मोठा सामाजिक अडसर होता. मुस्लिम समुदायामध्ये योगाबद्दल अनेक गैरसमज होते. अनेकांना वाटायचं की योगा हा एका विशिष्ट धर्माशी जोडलेला व्यायाम प्रकार आहे. हा गैरसमज दूर करण्यासाठी रुख्सार यांनी पुढाकार घेतला.

व्यायाम किंवा आरोग्याचा कोणत्याही धर्माशी थेट संबंध नसतो, हे त्यांनी आपल्या कामातून दाखवून दिलं. गैरमुस्लिम महिलांसाठी क्लास घेताना त्या पारंपरिक पद्धतीचे श्लोक व ॐकार जप करून घ्यायच्या. तर मुस्लिम महिलांसाठी त्यांनी त्यांच्या श्रद्धेशी कनेक्ट करून मेडिटेशनची एक नवीन आणि प्रभावी पद्धत सुरू केली. त्या मुस्लिम महिलांसाठी आयात (श्लोक) म्हणायला सुरुवात केली. त्यामुळे महिलांचा योगाकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला.

योगा हा कोणत्याही धर्माचा नसतो हे पटवून देताना रुख्सार सांगतात, “मी महिलांना एकच गोष्ट समजावली, जोपर्यंत आपण मनात तसा विचार करत नाही, तोपर्यंत व्यायामाला कुठलाही धर्म नसतो. योगाने आपली आत्मिक शक्ती वाढते. योगा शरीराला ताजेतवाने ठेवते आणि आपण तंदुरुस्त होतो.”

अशी झाली रील्सची सुरुवात 
सुरुवातीला रुख्सार सोशल मीडियावर फारशा सक्रिय नव्हत्या. पण त्यांच्या एका डिजिटल मार्केटिंगमध्ये असलेल्या  क्लायंटने रुख्सार यांचं कौशल्य पाहून त्यांना इन्स्टाग्राम अकाऊंट बनवून दिलं. हळूहळू रुख्सार यांनी आरोग्याशी संबंधित, आजारांवर मात करणाऱ्या योगासनांचे व्हिडिओ टाकण्यास सुरुवात केली. आज सोशल मीडियावर त्यांचे हजारो फ्लॉलोवर्स आहेत.

त्यांची शिकवण्याची थेरपी पद्धत लोकांना इतकी आवडली की, त्यांना जगभरातून विचारणा होऊ लागली. आज त्या फक्त भारतातच नाही, तर कॅनडा, युके, दुबई अशा अनेक देशांतील क्लायंट्सचे ऑनलाईन क्लासेस घेतात. आजारांवर नियंत्रण मिळवण्यासोबतच नैसर्गिक पद्धतीने वजन कमी करण्यात त्यांना १००% यश मिळालं आहे.

याविषयी रुख्सार म्हणतात, “लोकांचे प्रॉब्लेम्स सोल्व्ह करणं ही माझी प्रायोरिटी आहे. रोज सकाळी ८:३० ते रात्री १० वाजेपर्यंत माझे ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅचेस चालतात. अर्निंगपेक्षा लोकांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास माझ्यासाठी खूप मोठा आहे.”

वेळेचं अचूक नियोजन
आज रुख्सार यांचं रोजचं शेड्युल अत्यंत व्यस्त असतं. त्यांचा मोठा मुलगा १२ वीत आहे, मुलगी ८ वीत आणि सर्वात लहान मुलगा अवघा १ ल्या इयत्तेत आहे. घरात कोणतीही मोलकरीण न ठेवता संपूर्ण घरकाम, तिन्ही मुलांचा अभ्यास, कुटुंबाची जबाबदारी आणि स्वतःचे योगा बॅचेस... या सर्व गोष्टी त्या एकट्या लीलया सांभाळतात.

रुख्सार यांच्या आयुष्यात योगा क्लासेस दरम्यान अनेक फसवणुका झाल्या, लोकांचे टोमणे ऐकावे लागले, कपड्यांवरून किंवा नकाबवरून कमेंट्स आल्या. पण त्यांनी या सगळ्याकडे दुर्लक्ष करत फक्त आपल्या कामावर लक्ष केंद्रित केलं. आज त्या एक यशस्वी हेल्थ कोच म्हणून स्वतःच्या पायावर उभ्या आहेत.

महिलांना आत्मविश्वास देताना रुख्सार म्हणतात, “अनेक महिला म्हणतात आता आमचं वय निघून गेलं. पण वयाला काहीच मर्यादा नसते. वृद्धेपणातही तुम्ही तितकेच सुंदर दिसू शकता. स्वतःला पहिली प्रायोरिटी द्या. तुम्ही आहात तर सगळं आहे. स्वतःचा आदर करा, जग तुमचा आपोआप आदर करेल.”

शिकण्याची जिद्द असेल आणि कष्टाची तयारी असेल, तर गृहिणी असणे ही तुमची मर्यादा नसून ती तुमची ताकद बनू शकते, हे रुख्सार खान यांच्या कहाणीतून लक्षात येते. 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter