नवी दिल्ली
तुर्कस्तानमधील अंटालिया येथे पार पडलेली COP31 हवामान परिषद अंतिम कराराविना रविवारी संपली. जीवाश्म इंधनापासून दूर जाण्याच्या अधिक ठोस वचनबद्धतेवर आणि नवीन हवामान वित्तपुरवठा आश्वासनांवर मतभेद झाल्याने हा करार होऊ शकला नाही. नियोजित समाप्तीनंतर दोन दिवस चर्चा चालूनही संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल परिषदेत (UNCCC) एकमत होऊ शकले नाही. यापूर्वी २००० मध्ये नेदरलँड्समधील हेग येथे झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या हवामान परिषदेत चर्चा निष्फळ ठरली होती.
केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी सांगितले की, भारताने शेवटच्या क्षणापर्यंत रचनात्मक आणि अविरत सहभाग घेतला. अंतिम मसुदा करारावर एकमत होऊ शकले नाही याबद्दल देशाने खेद व्यक्त केला. "अंतिम करार नसल्याने हवामान कृती थांबत नाही. देशात १७० गिगावॅटहून अधिक सौर ऊर्जा क्षमता उभारून भारत देशांतर्गत पातळीवर काम करत आहे आणि COP32 कडे जाताना एकमत आधारित बहुपक्षीयवादासाठी कटिबद्ध आहे," असे भूपेंद्र यादव यांनी 'एक्स'वरील पोस्टमध्ये म्हटले.
संयुक्त राष्ट्रांचे हवामान प्रमुख सायमन स्टील यांनी परिषदेच्या समारोपाच्या भाषणात निराशा व्यक्त केली. "जगाला या क्षणाची पुनरावृत्ती परवडणारी नाही. रूलबुक आणि पूर्वोदाहरणांसह आमची प्रक्रिया सुमारे २०० देशांना एकत्र आणण्यासाठी तयार केली आहे. गेल्या दशकात आपण वारंवार पाहिल्याप्रमाणे यातून परिणाम मिळतात," असे कार्यकारी सचिव म्हणाले. "सुधारणा, आधुनिकीकरण आणि बदलांना नक्कीच वाव आहे. पण केवळ येथे जे घडले त्यामुळेच नाही," असेही त्यांनी नमूद केले.
जागतिक तापमानवाढ पूर्व-औद्योगिक पातळीपेक्षा १.५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होण्याच्या काळात COP31 मध्ये एकमत होऊ शकले नाही. संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या (UNEP) ताज्या अहवालानुसार, सध्याची धोरणे अशीच राहिल्यास या शतकात तापमानवाढ २.८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते आणि त्यानंतरही वाढत जाऊ शकते.
दिल्लीतील हवामान संशोधन संस्था 'क्लायमेट ट्रेंड्स'च्या संचालिका आरती खोसला म्हणाल्या की, गंभीर हेतूचा सर्वसाधारण अभाव दिसून आला. "कव्हर निर्णयावर एकमत न होणे म्हणजे राजकीय महत्त्वाकांक्षा आणि जबाबदारीचा स्पष्ट अभाव आहे. रविवारपर्यंत चर्चा चालूनही देशांनी जीवाश्म इंधनापासून दूर जाण्याच्या अर्थपूर्ण वचनबद्धतेवर किंवा हवामान सुरक्षेवर सहमती दर्शवली नाही," असे खोसला यांनी निवेदनात म्हटले. "संक्रमणाला वित्तपुरवठा करण्याची मोजता येण्याजोगी जबाबदारी विकसित देशांनी टाळली, तर प्रमुख जीवाश्म इंधन उत्पादकांनी अधिक कडक शमन भाषेला रोखले," असे त्या म्हणाल्या.
समान पण विभेदित जबाबदाऱ्या आणि संबंधित क्षमता (CBDR-RC) तत्त्वे आणि समतेची तत्त्वे अंतिम मसुद्यात पुरेशा प्रमाणात प्रतिबिंबित झाली नाहीत, याकडे निवेदनात लक्ष वेधले. ऐतिहासिक हरितगृह वायू उत्सर्जनात विकसित देशांचा वाटा सर्वाधिक असल्याने त्यांनी प्राथमिक जबाबदारी घ्यावी, असे CBDR-RC तत्त्व सांगते. "आपण येथे का आहोत आणि या हवामान संकटापर्यंत आपण कसे पोहोचलो?" असा मूलभूत प्रश्न गटाने COP31 दरम्यान उपस्थित केल्याचे निवेदनात म्हटले आहे. तसेच ऐतिहासिक आणि सुरू असलेल्या उत्सर्जनाने जागतिक कार्बन बजेटचा मोठा वाटा वापरला आहे. मात्र अंतिम मसुद्यात याचा उल्लेख नसून मागील निर्णयांतील परिच्छेदच पुन्हा मांडले.
हवामान संकटास कारणीभूत असलेल्या ऐतिहासिक उत्सर्जनात सर्वात कमी वाटा असलेल्या ग्लोबल साऊथमध्ये तापमानवाढीचे परिणाम आधीच जाणवत आहेत. हवामानाशी संबंधित टोकाच्या हवामान घटनांच्या १९९६ ते २०२५ या ३० वर्षांच्या आकडेवारीच्या विश्लेषणानुसार, या काळात डोमिनिका, म्यानमार आणि होंडुरास हे देश सर्वाधिक प्रभावित झाले. त्यानंतर लिबिया, हैती आणि ग्रेनेडा यांचा क्रमांक लागतो.
विकसित देशांकडून विकसनशील देशांकडे जाणारा हवामान वित्तपुरवठा आवश्यकतेपेक्षा खूपच कमी आहे. UNEP च्या अॅडॉप्टेशन गॅप रिपोर्ट २०२६ नुसार, २०२४ मध्ये विकसित ते विकसनशील देशांमधील आंतरराष्ट्रीय सार्वजनिक अनुकूलन वित्तपुरवठा २८.२ ते ३१.७ अब्ज डॉलर्सवर पोहोचला, जो मागील वर्षापेक्षा १ अब्ज डॉलर्सने अधिक आहे. मात्र २०३५ पर्यंत वार्षिक ३०० अब्ज डॉलर्सच्या अंदाजित गरजेपेक्षा हा निधी खूपच कमी आहे.