भारताची प्राचीन संस्कृती आणि भाषिक विविधता थक्क करणारी; रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याकडून कौतुक

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 44 m ago
व्लादिमीर पुतिन
व्लादिमीर पुतिन

 

मॉस्को 

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारताची प्राचीन संस्कृती आणि भाषिक विविधतेचे कौतुक केले आहे. भारताविषयी अधिक जाणून घेतल्यास या देशाबद्दलची उत्सुकता वाढत जाते, असे त्यांनी म्हटले आहे. सर्बियन चित्रपट निर्माते एमीर कुस्तुरिका यांना दिलेल्या मुलाखतीत पुतिन बोलत होते. क्रेमलिनने या मुलाखतीचा लिखित मजकूर प्रसिद्ध केला आहे.

भारताच्या संस्कृतीबद्दल बोलताना पुतिन म्हणाले, "भारताची संस्कृती सर्वात प्राचीन आहे आणि ती रंजक आहे. मी या संस्कृतीबद्दल अधिक माहिती घेतो, तशी माझी यातील रुची वाढत जाते." पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या एका संवादाची आठवणही त्यांनी या मुलाखतीत सांगितली. भारतातील मुख्य भाषा किती लोक बोलतात, असा प्रश्न पुतिन यांनी मोदी यांना विचारला होता.

या प्रश्नावर मोदी यांनी दिलेले उत्तर पुतिन यांनी सांगितले. देशाची लोकसंख्या दीड अब्ज असून त्यातील सुमारे ६० कोटी लोक मुख्य भाषा बोलतात, अशी माहिती मोदी यांनी दिली होती. उर्वरित दोन तृतीयांश लोक आपापल्या प्रादेशिक भाषा बोलतात, असे मोदी यांनी स्पष्ट केले होते. यावर भाष्य करताना पुतिन म्हणाले, "तुम्हाला हे आश्चर्यकारक वाटत नाही का? हे नक्कीच थक्क करणारे आहे!"

भारताला कोणतीही राष्ट्रभाषा किंवा एकच मुख्य भाषा नाही. देशात हिंदी ही सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. संविधानातील २२ अनुसूचित भाषांमध्ये हिंदीचा समावेश असून ती केंद्र सरकारची अधिकृत भाषा आहे. २०११ च्या जनगणनेनुसार, ५२ कोटी ८३ लाखांहून अधिक लोकांनी म्हणजेच देशातील ४३.६३ टक्के लोकसंख्येने हिंदी ही आपली मातृभाषा असल्याचे नोंदवले होते. तसेच ६९ कोटी १५ लाखांहून अधिक लोक म्हणजेच ५७.११ टक्के नागरिक पहिली, दुसरी किंवा तिसरी भाषा म्हणून हिंदी बोलतात.

पुतिन यांनी या मुलाखतीत रशियातील धार्मिक विविधतेवरही प्रकाश टाकला. रशियाने बौद्ध, ज्यू, इस्लाम आणि ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन या चार पारंपरिक धर्मांना मान्यता दिली आहे. या धर्मांचे अनुयायी एकत्र राहतात आणि सोबतच प्रगती करत आहेत, असे पुतिन यांनी नमूद केले. या धर्मांमध्ये भिन्नता असूनही त्यांची "मूलभूत मूल्ये" सारखीच आहेत. रशियाने या मूल्यांना बहरण्यासाठी पोषक वातावरण दिले असून हा देश पारंपरिक मूल्यांचा आधारस्तंभ बनू शकतो, असे मत त्यांनी व्यक्त केले.

युक्रेन युद्धाबाबत बोलताना पुतिन यांनी युक्रेनच्या सैनिकांना रशियाच्या बाजूने येण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, "त्यांनी शरणागती पत्करावी असे मी म्हणणार नाही, यात काहीसा अपमान वाटू शकतो. ते लढत आहेत आणि लढा सुरूच ठेवत आहेत. त्यांनी आमच्या बाजूने यावे असे मला वाटते, ही आपली सामायिक बाजू असून इतिहासाची योग्य बाजू आहे."

चित्रपट निर्माते कुस्तुरिका यांनी "अवर बॅप्टिझम: द पॅट्रिआर्क" या माहितीपटाचे दिग्दर्शन केले आहे. रशियन ऑर्थोडॉक्स चर्चचा रशियाच्या राज्यव्यवस्थेवर, पारंपरिक मूल्यांवर आणि राष्ट्रीय ओळखीवर असलेला प्रभाव या माहितीपटात मांडला आहे.