सेलम, तामिळनाडू
"देशाबद्दल पसरलेले द्वेषाचे वातावरण संपवण्याची जबाबदारी विद्वानांची आहे. यासाठी न डगमगता आणि न थकता सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत," असे प्रतिपादन मौलाना मुहम्मद सुफियान कासमी यांनी केले. तामिळनाडूतील सेलम येथील मदरसा मजाहिरुल उलूममध्ये आयोजित ३५ व्या फिक्ही सेमिनारमध्ये ते बोलत होते. १ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या या तीन दिवसीय सेमिनारमध्ये देशभरातील आघाडीचे विद्वान आणि तज्ज्ञ एकत्र आले आहेत. आजच्या समाजात निर्माण होणाऱ्या महत्त्वाच्या न्यायशास्त्रीय प्रश्नांवर याठिकाणी सखोल मंथन सुरू आहे.
दारुल उलूम वक्फ देवबंदचे प्रमुख आणि प्रसिद्ध धर्मगुरू मौलाना मुहम्मद सुफियान कासमी यांच्या अध्यक्षतेखाली या सेमिनारचे उद्घाटन सत्र पार पडले. कारी मुहम्मद सौद खान यांच्या पवित्र कुराण पठणाने या सत्राची सुरुवात झाली. उपस्थितांना मार्गदर्शन करताना मौलाना कासमी पुढे म्हणाले, मानवी जीवनात वेगाने होणाऱ्या बदलांमधून नवी आव्हाने उभी राहत आहेत. कुराण आणि सुन्नाहच्या प्रकाशात या प्रश्नांवर उत्तरे शोधणे ही विद्वान आणि न्यायशास्त्रज्ञांची जबाबदारी आहे. धार्मिक आणि सामाजिक प्रश्नांचा गांभीर्याने विचार करून परस्पर चर्चेतून व्यावहारिक मार्गदर्शन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
यावेळी मौलाना अबू शफिक कासमी यांनीही आपले विचार मांडले. नव्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सामाजिक नेते, विचारवंत आणि धर्मगुरू यांच्यात संवाद आणि सल्लामसलत होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. अशा विषयांवर चिंतन करण्यासाठी आणि विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी फिक्ही सेमिनार हे एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरत आहे, असे ते म्हणाले. इस्लामिक फिक्ही अकादमीचे सरचिटणीस मौलाना खालिद सैफुल्ला रहमानी यांनी विद्वानांच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. विद्वानांनी बदलत्या काळाचा अंदाज घेण्यासोबतच भविष्यात येणाऱ्या आव्हानांचाही वेध घ्यावा. त्यांनी आपली वैचारिक कक्षा रुंदावून बदलत्या जगाच्या संदर्भात मुस्लिमांना मार्गदर्शन करावे, असे आवाहन मौलाना रहमानी यांनी केले.
शरिया कायद्यांतर्गत महिलांच्या हक्कांबाबत मौलाना रहमानी यांनी सविस्तर भाष्य केले. इस्लामिक शरिया ही एक न्याय्य व्यवस्था असून तिने भारतात महिलांना सन्मान, प्रतिष्ठा आणि स्वायत्तता दिली आहे, असे त्यांनी सांगितले. या व्यवस्थेने विधवा पुनर्विवाहाला समाजमान्यता मिळवून दिली आणि विधवांना सन्मानाने जगण्याचा मार्ग मोकळा केला, याकडे त्यांनी लक्ष वेधले. इस्लामची शिकवण योग्य संदर्भात समजून घेऊन ती समाजासमोर मांडणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. माध्यमांमध्ये इस्लामविरोधात होणाऱ्या आरोपांचा आणि आक्षेपांचाही त्यांनी उल्लेख केला. अभ्यासपूर्ण आणि तर्कशुद्ध युक्तिवादातून हे गैरसमज दूर करणे ही विद्वानांची जबाबदारी आहे. प्रभावी वैचारिक संवादातून द्वेषाचा प्रसार रोखला पाहिजे, असे मत त्यांनी मांडले.

बालविवाह, घटस्फोट आणि बहुपत्नीत्व यांसारखे वादग्रस्त विषय शरियाच्या योग्य संदर्भात तपासण्याची गरज या सेमिनारमध्ये अधोरेखित करण्यात आली. जिहादचा संबंध अनेकदा चुकीच्या पद्धतीने दहशतवादाशी जोडला जातो, असे निरीक्षण वक्त्यांनी नोंदवले. भावनिक प्रतिक्रिया देण्याऐवजी तथ्यांवर आधारित स्पष्टीकरण आणि अभ्यासपूर्ण चर्चा होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. अपप्रचाराला बळी पडण्याऐवजी लोकांनी अचूक माहिती घ्यावी आणि गैरसमज दूर करण्यास मदत करावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
या तीन दिवसीय संमेलनात आजच्या काळातील अनेक न्यायशास्त्रीय प्रश्नांवर चर्चा होत आहे. यामध्ये लिंगबदल, विधवा आणि घटस्फोटित महिलांचे हक्क व समस्या, 'इस्तिहसान' ही न्यायशास्त्रीय संकल्पना आणि सोने-चांदीचा व्यापार या विषयांचा समावेश आहे. उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम भारतातील नामांकित विद्यापीठे व शैक्षणिक संस्थांमधील विद्वान आणि तज्ज्ञ यामध्ये आपले संशोधन व शैक्षणिक दृष्टिकोन मांडत आहेत. सुमारे २०० विद्वान आणि मुफ्ती या विचारमंथनात सहभागी होऊन आपली मते आणि सूचना मांडत आहेत.
उद्घाटन सत्रात इस्लामिक फिक्ही अकादमीच्या या सेमिनारच्या अखंड परंपरेलाही उजाळा देण्यात आला. १९८९ पासून अकादमीने हे सेमिनार अखंडपणे आयोजित केल्याबद्दल मौलाना अतीक अहमद बस्तवी यांनी समाधान व्यक्त केले. हे सेमिनार धार्मिक मदरसे आणि शैक्षणिक संस्था यांच्यातील दुवा ठरले आहेत. यातून समकालीन प्रश्नांवर गंभीर चर्चा करण्याची संधी निर्माण झाली आहे, असे ते म्हणाले. आजच्या काळातील गुंतागुंतीची आव्हाने सोडवण्यासाठी न्यायशास्त्रज्ञ आणि धर्मगुरूंचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यासाठी ही अभ्यासपूर्ण परंपरा टिकवून ठेवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. सेलम येथील ऐतिहासिक मदरसा मजाहिरुल उलूममध्ये हा सेमिनार होणे हे याच दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे.
या उद्घाटन सत्राला देशभरातील विविध भागांतून आलेले विद्वान आणि तज्ज्ञ उपस्थित होते. यामध्ये मौलाना मुहम्मद सुफियान कासमी, मौलाना खालिद सैफुल्ला रहमानी, मौलाना मुहम्मद शरीफ खान, दारुल उलूम झकारिया देवबंदचे मोहतमिम, काश्मीरचे मुफ्ती रहमतुल्ला बांदीपोरा, पाटण्याचे मौलाना अनिसुर रहमान कासमी, उमरबादचे डॉ. अब्दुल्ला जमील, मौलाना रुहुल हक रशादी, मौलाना सिराजुद्दीन रशादी आणि मौलवी अनस आबिद खान यांच्यासह इतर मान्यवरांचा समावेश होता.