नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' या चित्रपटाच्या संगीतासाठी ऑस्कर विजेते संगीतकार ए. आर. रहमान आणि हान्स झिमर यांच्यापेक्षा दुसरी सर्वोत्तम जोडी असूच शकत नाही, असे मत प्रसिद्ध गायक अरमान मलिक याने व्यक्त केले आहे. या दिग्गज संगीतकारांसोबत काम करताना आपण त्यांच्या दृष्टिकोनाला पूर्णपणे शरण गेलो होतो, असे त्याने सांगितले. 'दंगल' फेम नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीराम, साई पल्लवी सीता आणि यश रावणाच्या भूमिकेत आहेत.
या भव्य चित्रपटाच्या पार्श्वसंगीतासाठी हान्स झिमर आणि ए. आर. रहमान एकत्र आले आहेत. अरमान मलिकने या चित्रपटातील रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांच्यावर चित्रित झालेल्या 'मंगला संगम' या कन्नड विवाह गीताला आपला आवाज दिला आहे. एका मुलाखतीत बोलताना मलिक म्हणाला की, 'रामायण' सारख्या महान वारशाशी मोठ्या प्रमाणावर भावना आणि अपेक्षा जोडलेल्या असतात. या भव्य प्रकल्पाला शोभेल असेच भव्य संगीत रहमान सर आणि हान्स झिमर यांनी दिले आहे. मात्र, झिमर यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली नसल्याचेही त्याने नमूद केले.
ऑनलाइन टीका
या गाण्याच्या 'मंगल रंग' या हिंदी आवृत्तीतील सुफी आणि कव्वाली शैलीतील संगीतावरून नेटकऱ्यांनी समाजमाध्यमांवर टीका केली होती. मात्र, या ऑनलाइन टीकेचा आपल्या कामावर कोणताही परिणाम होऊ दिला नाही, असे अरमानने स्पष्ट केले. रहमान सरांसारख्या संगीतकारासोबत काम करताना बाहेरील मतांपेक्षा त्यांच्या संगीत दृष्टिकोनावर पूर्ण विश्वास ठेवून स्टुडिओत जाणे महत्त्वाचे असते, असे तो म्हणाला. प्रेक्षक कशी प्रतिक्रिया देतील हे आपल्या हातात नसते, पण कलेप्रती असलेला प्रामाणिकपणा आणि समर्पण आपण नक्कीच जपू शकतो, अशी भावना त्याने व्यक्त केली.
भारतातील सर्वात लोकप्रिय महाकाव्याच्या चित्रपट रूपांतरासाठी गाणे गाताना प्रेम, भक्ती आणि दिव्यत्व यांचा समतोल साधणे ही मोठी जबाबदारी होती, असे मलिकने सांगितले. गाताना आवाजाची जास्त करामत न दाखवता प्रभू श्रीरामांचा संयम, शांती आणि सौम्यता स्वरात उतरवण्यावर त्याने भर दिला. उच्च सुरांमध्ये गातानाही आवाजात कोणताही कृत्रिमपणा न ठेवता निखळ भक्तीभाव आणि शांतता टिकवून ठेवण्याचा त्याचा प्रयत्न होता.
नितेश तिवारींसोबत पुनरागमन
३१ वर्षीय अरमान मलिकने सांगितले की, रहमान यांच्या टीमकडून कन्नड गाणे रेकॉर्ड करण्यासाठी अचानक फोन आला तेव्हा हे गाणे 'रामायण' चित्रपटासाठी आहे, याची त्याला अजिबात कल्पना नव्हती. स्टुडिओत रेकॉर्डिंग सुरू असताना या प्रकल्पाची भव्यता त्याच्या लक्षात आली. कन्नड प्रेक्षकांनी नेहमीच भरभरून प्रेम दिले असल्याने या ऐतिहासिक चित्रपटासाठी कन्नड भाषेत गाणे त्याच्यासाठी अधिक खास ठरले. यापूर्वी त्याने 'सरियागी', 'ओंदू मालेबिल्लू' यांसारखी अनेक लोकप्रिय कन्नड गाणी गायली आहेत.
२०११ मधील 'चिल्लर पार्टी' या चित्रपटात अरमानने नितेश तिवारी यांच्यासोबत पहिल्यांदा काम केले होते. आता 'रामायण' सारख्या भव्य चित्रपटासाठी त्यांच्यासोबत पुन्हा काम करणे हा आपल्या कारकिर्दीतील मोठा टप्पा असल्याचे तो मानतो. नमित मल्होत्रा आणि यश यांच्या निर्मितीत तयार झालेला हा चित्रपट ५ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला असून, यात रवी दुबे, अरुण गोविल, लारा दत्ता, आदिनाथ कोठारे यांसारख्या कलाकारांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचा दुसरा भाग २०२८ च्या दिवाळीत प्रदर्शित होणार आहे.