गोव्यात २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या ५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची माहिती देताना आशुतोष गोवारीकर आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत
प्रसिद्ध पोलिश चित्रपट निर्माते पावेल पावलिकोव्स्की यांच्या 'फादरलँड' या चित्रपटाने ५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (IFFI) सुरुवात होणार आहे. २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान गोव्यात रंगणाऱ्या या महोत्सवात ८६ देशांतील १५९ आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि ७६ भारतीय चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत. महोत्सवाचे संचालक आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते आशुतोष गोवारीकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
यापूर्वी 'इडा' आणि 'कोल्ड वॉर' सारख्या पुरस्कारप्राप्त चित्रपटांचे दिग्दर्शन करणाऱ्या पावलिकोव्स्की यांनी 'फादरलँड'च्या माध्यमातून ऐतिहासिक कथांची त्रयी पूर्ण केली आहे. या चित्रपटासाठी त्यांना यंदाच्या कान्स चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे. 'सीमांशिवाय गोष्टी' (Stories Without Borders) या संकल्पनेवर आधारित या महोत्सवाचा समारोप सिंगापूरचे दिग्दर्शक अँथनी चेन यांच्या 'वी आर ऑल स्ट्रेंजर्स' या चित्रपटाने होणार आहे.
आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि पुरस्कारांची रक्कम
या महोत्सवासाठी १३७ देशांतून १,४०० चित्रपटांचे अर्ज प्राप्त झाले होते. यामध्ये ९ वर्ल्ड प्रीमियर, २ आंतरराष्ट्रीय प्रीमियर, २४ आशिया प्रीमियर, ११६ इंडिया प्रीमियर आणि १४ गाला प्रीमियरचा समावेश असेल. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत १५ चित्रपट सहभागी होतील, तर सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपट श्रेणीत ७ आणि आयसीएफटी-युनेस्को गांधी पदकासाठी १० चित्रपटांमध्ये चुरस पाहायला मिळेल.
आंतरराष्ट्रीय ज्युरीचे अध्यक्षपद प्रसिद्ध चित्रपट निर्माते आनंद एल. राय भूषवणार असून त्यांच्यासोबत बोगदान मुरेसानू, मारिया अलेजांड्रा रोजास, रत्चापूम बूनबुंचाचोक आणि सोल बेरुएझो पिचोन-रिव्हिएर यांचा समावेश असेल. सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीच्या सुवर्ण मयूर पुरस्कारासोबत ५१ लाख रुपये रोख, तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाच्या रौप्य मयूर पुरस्कारासोबत २० लाख रुपये दिले जातील. सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्रीला प्रत्येकी १५ लाख रुपये, विशेष ज्युरी पुरस्कारासाठी २० लाख रुपये आणि सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शकाला १५ लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे.
इंडियन पॅनोरमा, ब्रिक्स सिनेमा आणि विशेष सन्मान
इंडियन पॅनोरमा विभागात १८ भाषांतील ७६ चित्रपट दाखवले जातील. यामध्ये 'धुरंधर' या चित्रपटाने फीचर फिल्म विभागाची, तर लडाखी भाषेतील 'बिकमिंग' या चित्रपटाने नॉन-फीचर विभागाची सुरुवात होईल. ७०० हून अधिक प्रवेशिकांमधून २५ फीचर आणि २० नॉन-फीचर चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. सर्वोत्कृष्ट वेब सिरीज (ओटीटी) श्रेणीसाठी ४६ पात्र प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत.
महोत्सवात ब्रिक्स (BRICS) सिनेमावर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार असून भारताच्या 'रामायण' चित्रपटाने या विभागाची सुरुवात होईल. सर्व ११ ब्रिक्स सदस्य देशांचे चित्रपट येथे प्रदर्शित केले जातील. यंदा स्पेनला 'कंट्री ऑफ ऑनर' म्हणून घोषित करण्यात आले असून पेड्रो अल्मोडोवर यांच्या 'बिटर ख्रिसमस'सह स्पेनचे चार चित्रपट दाखवले जातील. रशिया हा 'पार्टनर कंट्री' असून त्यांचेही चार चित्रपट प्रदर्शित होतील. यंदा अॅनिमेशन आणि 'चित्रपटांवरील चित्रपट' हे दोन नवीन विभाग सुरू करण्यात आले आहेत.
महोत्सवातील उपक्रम आणि मान्यवरांना आदरांजली
यंदाच्या महोत्सवात ५२ महिला चित्रपट निर्मात्या आणि ६२ नवोदित दिग्दर्शकांचा सहभाग असेल. 'क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो'च्या सहाव्या पर्वात १३ चित्रपट कलांमधील १०० तरुण सहभागी होणार आहेत. तसेच 'वेव्हज फिल्म बाजार'च्या माध्यमातून चित्रपट निर्माते, वितरक आणि खरेदीदारांना एकत्र आणले जाणार आहे. नेटफ्लिक्स या उपक्रमाचा नॉलेज सिरीज पार्टनर असून भारताची व्हीएफएक्स (VFX) क्षमता बळकट करण्यासाठी ते सहकार्य करणार आहेत.
कला अकादमीत २१ ते २७ नोव्हेंबर दरम्यान १४ मास्टरक्लासेस आणि कार्यशाळांचे आयोजन केले जाईल. पोलिश चित्रपट निर्माते आंद्रेज वाजदा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या पाच चित्रपटांचे विशेष प्रदर्शन केले जाईल. यासोबतच भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज शक्ती सामंता, राज खोसला, उत्तम कुमार, सूर्यकांत मांढरे, प्रेम नझीर, राज कुमार आणि संगीतकार ओ. पी. नय्यर व रवी यांना जन्मशताब्दीनिमित्त आदरांजली वाहिली जाईल. गोव्यातील पणजी, पर्वरी, मडगाव आणि फोंडा येथील चार ठिकाणी १३ पडद्यांवर ४,००० हून अधिक प्रेक्षकांच्या आसनक्षमतेसह हे चित्रपट दाखवले जातील.
'लगान'च्या २५ वर्षांनिमित्त विशेष सोहळा आणि मुख्यमंत्र्यांचे मत
'सीमांशिवाय गोष्टी' या संकल्पनेमागील विचार स्पष्ट करताना आशुतोष गोवारीकर म्हणाले की, आपण आज पूर्वीपेक्षा जास्त जोडलेले असलो तरी आपल्याच भाषेत आणि वर्तुळात अडकणे सोपे झाले आहे. जेव्हा प्रेक्षक परदेशी भाषेतील चित्रपटातील पात्रांशी भावनिकदृष्ट्या जोडले जातात, तेव्हा मने जुळतात आणि अंतर कमी होते. आशुतोष गोवारीकर यांच्या गाजलेल्या 'लगान' चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त महोत्सवात विशेष स्क्रीनिंग आयोजित केले जाईल.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले की, इफ्फी हा आशियातील सर्वात जुना चित्रपट महोत्सव असून गेल्या काही वर्षांत तो एक महत्त्वाचे व्यासपीठ बनला आहे. दर नोव्हेंबरमध्ये गोवा जगभरातील कथाकारांचे स्वागत करण्यासाठी सज्ज असते. भारतातील या सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे यजमानपद भूषवणे गोव्यासाठी अभिमानास्पद असून राज्याच्या सांस्कृतिक ओळखीचा हा एक अविभाज्य भाग बनला असल्याचे त्यांनी नमूद केले.