एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शून्यावर पहिले तीन गडी गमावणारा भारत हा जगातील केवळ दुसरा संघ ठरला आहे. शुक्रवारी झालेल्या सामन्यात न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्री याने पहिल्याच षटकात रोहित शर्मा, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांना बाद करत भारतीय डावाची दाणादाण उडवून दिली.
एकदिवसीय डावाच्या पहिल्याच षटकात तीन किंवा त्याहून अधिक बळी घेण्याची हेन्रीची ही कामगिरी क्रिकेट इतिहासातील केवळ तिसरी घटना आहे. यापूर्वी १९९७ मध्ये लाहोर येथे पाकिस्तानविरुद्ध खेळताना दक्षिण आफ्रिकेच्या शॉन पोलॉकने पहिल्याच षटकात तीन बळी घेतले होते. त्यानंतर २००३ च्या विश्वचषकात पीटरमारित्झबर्ग येथे बांगलादेशविरुद्ध श्रीलंकेच्या चामिंडा वासने पहिल्याच षटकात चार गडी बाद केले होते.
भारताविरुद्धच्या या तिहेरी धक्क्यानंतर मॅट हेन्रीने या खास यादीत स्थान मिळवले आहे. शॉन पोलॉकने पाकिस्तानविरुद्ध सईद अन्वर, आमिर सोहेल आणि इजाज अहमद यांचे बळी घेतले होते. तर चामिंडा वासने २००३ च्या विश्वचषकात पहिल्याच षटकातील पहिल्या तीन चेंडूंवर हन्नान सरकार, मोहम्मद अश्रफुल आणि एहसानुल हक यांना बाद करून हॅट्ट्रिक पूर्ण केली होती. बांगलादेशला त्या षटकात आपले खाते उघडण्यात यश आले होते, मात्र भारत आणि पाकिस्तान यांना शून्यावरच पहिले तीन बळी गमवावे लागले.