National Sports Awards 2026: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अर्जुन आणि द्रोणाचार्य पुरस्कारांचे वितरण

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 8 m ago
राष्ट्रपती भवन येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार स्वीकारणारताना दिव्या देशमुख
राष्ट्रपती भवन येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार स्वीकारणारताना दिव्या देशमुख

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शुक्रवारी राष्ट्रपती भवनात राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यंदा कोणाचीही 'मेजर ध्यानचंद खेलरत्न' पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली नसून, डेकॅथलॉनपटू तेजस्वीन शंकर आणि बुद्धिबळ ग्रँडमास्टर दिव्या देशमुख व विदित गुजराथी यांच्यासह १७ खेळाडूंना प्रतिष्ठित 'अर्जुन पुरस्कार' प्रदान करण्यात आला. ३६ मिनिटांहून अधिक काळ चाललेल्या या सोहळ्याला केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडविया आणि क्रीडा सचिव हरी रंजन राव उपस्थित होते.

सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अरुण कुमार मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने गेल्या वर्षी केलेल्या शिफारशींचे अभूतपूर्व फेरमूल्यांकन केल्यानंतर एकूण १७ अर्जुन पुरस्कार विजेत्यांची निवड करण्यात आली. यापूर्वी २०१४ मध्ये देशात कोणालाही खेलरत्न पुरस्कार देण्यात आला नव्हता. पुरस्कारांची विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी आणि केवळ पात्र खेळाडूंचाच सन्मान व्हावा यासाठी मंत्रालयाने केलेल्या फेरमूल्यांकन प्रक्रियेमुळे यंदा पुरस्कारांच्या घोषणेला मोठा विलंब झाला.

प्रमुख विजेते आणि कामगिरी
सोहळ्याला दिव्या देशमुख, विदित गुजराथी, ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक विजेता बॉक्सर नरेंद्र बेरवाल (+९२ किलो) आणि युवा कर्णबधिर रायफल नेमबाज धनुष श्रीकांत उपस्थित होते. २० वर्षीय दिव्या देशमुख ही बुद्धिबळ विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे, तर विदित गुजराथी २०२४ च्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग होता. याशिवाय बॅडमिंटनपटू गायत्री गोपीचंद आणि त्रीसा जॉली यांनाही अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आले.

तेजस्वीन शंकरने २०२३ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत डेकॅथलॉनमध्ये रौप्यपदक, गेल्या वर्षीच्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत दुसरे स्थान आणि गुडघ्याच्या दुखापतीशी झुंज देत राष्ट्रकुल स्पर्धेत व ऐची-नागोया आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. पुरस्कारांच्या घोषणेला झालेल्या विलंबावर त्याने यापूर्वी टीका केली होती.
 
२०२४ मध्ये विक्रमी ३२ खेळाडूंना अर्जुन पुरस्कार देण्यात आला होता, ज्यात १७ पॅरा-खेळाडूंचा समावेश होता; मात्र यंदा केवळ दोन पॅरा-खेळाडूंना स्थान मिळाले. यामध्ये पॅरा क्लब थ्रोअर एकता भ्यान आणि नेमबाज रुद्रांश खंडेलवाल यांचा समावेश आहे. २०२३ मध्ये वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला मिळालेल्या पुरस्कारानंतर सलग दुसऱ्या वर्षी या यादीत एकाही क्रिकेटपटूचा समावेश नाही.

जीवनगौरव आणि द्रोणाचार्य पुरस्कारांचे मानकरी
१९६२ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय फुटबॉल संघाचे सदस्य आय. अरुमैनायगम यांना 'जीवनगौरव' श्रेणीतील एकमेव अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच मंत्रालयाने तीन द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली, ज्यामध्ये दिग्गज बॉक्सर एम. सी. मेरी कोमच्या सपोर्ट स्टाफचा भाग राहिलेले बॉक्सिंग प्रशिक्षक छोटे लाल यादव यांच्यासह परवीर सिंग आणि नेहा चव्हाण यांचा समावेश आहे. प्रशिक्षणातील 'जीवनगौरव' पुरस्कारासाठी पुरुष राष्ट्रीय बॉक्सिंग संघाचे प्रशिक्षक धर्मेंद्र यादव आणि कुस्ती प्रशिक्षक वीरेंद्र कुमार यांची निवड झाली आहे.

अर्जुन पुरस्कार विजेत्यांना १५ लाख रुपये रोख रक्कम देऊन गौरविण्यात येते. गेल्या वर्षी बुद्धिबळपटू डी. गुकेश, हॉकी कर्णधार हरमनप्रीत सिंग, पॅरा-अॅथलीट प्रवीण कुमार आणि नेमबाज मनू भाकर यांना खेलरत्न पुरस्कार देण्यात आला होता. पारंपारिकपणे दरवर्षी २९ ऑगस्ट रोजी मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिनी हे पुरस्कार दिले जातात, मात्र २०२० मधील कोरोना महामारीनंतर या तारखेत सातत्य राहिलेले नाही. यंदाच्या निवड समितीत भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे उपाध्यक्ष गगन नारंग, माजी बॅडमिंटनपटू अपर्णा पोपट आणि माजी हॉकीपटू एम. एम. सोमय्या यांचा समावेश होता.