दुबई
प्रत्येकाच्या आयुष्याची गोष्ट घरापासून सुरू होते आणि घर ही केवळ वास्तू नसून ती एक भावना, ओळख व अभिमानाचे स्थान असते, असे अभिनेता शाहरुख खान याने म्हटले आहे. दुबईमध्ये त्याच्या नावाने सुरू झालेल्या 'शाहरुखझ रेसिडेन्सेस बाय डॅन्यूब' (Shahrukhz Residences by Danube) या निवासी प्रकल्पाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलताना त्याने लग्न होईपर्यंत स्वतःचे घर नव्हते आणि पत्नी गौरीसोबत पहिले घर विकत घेतल्याच्या आठवणींना उजाळा दिला.
विश्वातील सर्वात सुंदर शब्द 'घर' असल्याचे सांगत ६१ वर्षीय शाहरुख म्हणाला, "मी अशा पार्श्वभूमीतून आलो आहे जिथे माझे आई-वडील लवकर गेले. ही कोणतीही रडगाण्याची गोष्ट नाही, तर ती वस्तुस्थिती होती. माझ्याकडे स्वतःचे घर नव्हते. मला माझे चित्रपट, कुटुंब आणि काम आवडतेच, पण जगात कशाहीपेक्षा जास्त मला स्वतःचे घर हवे होते." गौरीसोबत विकत घेतलेले पहिले घर आणि मुंबईतील 'मन्नत' हे दोन्ही आमच्या ऐपतीपलीकडचे होते, मात्र देवाच्या कृपेने ते शक्य झाले, असेही त्याने नमूद केले.
दुबईच्या मेरीटाईम सिटीमध्ये उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पातील पेंटहाऊसची रचना गौरी खान हिने केली आहे. डॅन्यूब प्रॉपर्टीजने दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येकी ५० कोटी रुपये किमतीचे सर्व पेंटहाऊस उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी विकले गेले. लोक त्यांच्या घराच्या पत्त्यात माझे नाव निवडतील, ही भावना अत्यंत नम्र करणारी असल्याचे शाहरुखने सांगितले. एखादे शहर आवडल्यास तिथे घर घेण्याची इच्छा व्यक्त केल्यावर मुले आर्यन, सुहाना आणि अबराम आपली खिल्ली उडवतात, असा रंजक किस्साही त्याने सांगितला.
आयुष्यात चांगले आणि वाईट दिवस येत असतात, मात्र दिवसाच्या शेवटी माणसाला स्वतःच्या घरी परतावे लागते आणि तिथेच त्याला जगाचा सामना करण्याची नवी ऊर्जा मिळते, असे शाहरुखने स्पष्ट केले. स्वप्नातील घर घेण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना प्रोत्साहन देताना तो म्हणाला, "जेव्हा तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर विकत घ्यायचे असते, तेव्हा अल्लाह, भगवान आणि देव तुम्हाला मदत करतात. तुम्ही मनापासून इच्छा धरली तर परमेश्वर तुम्हाला तुमच्या स्वप्नातील सर्वात सुंदर घर नक्कीच देतो."