नवी दिल्ली
धुक्याने वेढलेल्या संध्याकाळी हातात तेलाच्या बाटल्या घेऊन "तेल मालिश, चंपी, तेल मालिश..." गात अंधारातून प्रकाशात येणारा तो अवलिया आजही प्रेक्षकांच्या मनात ताजा आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील विनोदाला प्रतिष्ठा आणि निखळ हास्याची जोड देणारे दिवंगत ज्येष्ठ अभिनेते जॉनी वॉकर यांची जन्मशताब्दी साजरी होत आहे. बदरुद्दीन जमालुद्दीन काझी हे त्यांचे मूळ नाव होते. अश्लीलता किंवा द्व्यर्थी संवादांचा आधार न घेता केवळ आपल्या देहबोली आणि आवाजाच्या जोरावर त्यांनी तीनशेहून अधिक चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
इंदूरमधील एका विणकर कुटुंबात बारा मुलांपैकी एक असलेले बदरुद्दीन नोकरीच्या शोधात मुंबईत आले होते. सुरुवातीच्या काळात त्यांनी भाजी विक्री केली आणि नंतर मुंबईच्या 'बेस्ट' बसमध्ये कंडक्टर म्हणून काम पाहिले. १९५१ मध्ये 'बाजी' चित्रपटाचे लेखन करणारे अभिनेते बलराज साहनी यांनी बसमध्ये प्रवाशांचे मनोरंजन करणाऱ्या या कंडक्टरचे कौशल्य हेरले. साहनी यांच्या सल्ल्यानुसार बदरुद्दीन यांनी चित्रपटाच्या सेटवर जाऊन गुरु दत्त आणि देव आनंद यांच्यासमोर दारुड्याचा अभिनय सादर केला. गुरु दत्त त्यांच्या या कलेने प्रभावित झाले आणि त्यांनी चित्रपटात खास भूमिका लिहून त्यांना नाव दिले 'जॉनी वॉकर'.
प्रसिद्ध व्हिस्की ब्रँडचे नाव मिळालेल्या जॉनी वॉकर यांनी खऱ्या आयुष्यात कधीही मद्यपान किंवा धूम्रपान केले नाही, हा त्यांच्या आयुष्यातील मोठा विरोधाभास होता. स्वतःचे शालेय शिक्षण पूर्ण न झाल्याची खंत मनात ठेवून त्यांनी आपल्या सहाही मुलांना उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवले. 'आर पार' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अभिनेत्री शकीला यांची बहीण नूरजहाँ यांच्याशी त्यांचे सूत जुळले. कुटुंबाच्या विरोधाला न जुमानता त्यांनी गुपचूप विवाह केला. गुरु दत्त यांच्या 'साहिब बीबी और गुलाम' वगळता प्रत्येक चित्रपटात जॉनी वॉकर यांचा महत्त्वाचा सहभाग राहिला.
शम्मी कपूर आणि राजेंद्र कुमार यांच्यानंतर पार्श्वगायक मोहम्मद रफी यांनी सर्वाधिक गाणी जॉनी वॉकर यांच्यासाठी गायली आहेत. 'ये है बॉम्बे मेरी जान', 'जाने कहाँ मेरा जिगर गया जी' आणि 'मैं बंबई का बाबू' ही गाणी त्यांच्या अभिनयामुळे अजरामर झाली. 'प्यासा' मधील अब्दुल सत्तार आणि 'आनंद' चित्रपटातील इसाभाई सुरतवाला या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. १९८० च्या दशकात चित्रपटसृष्टीत आलेल्या बटबटीत आणि द्व्यर्थी विनोदाशी जुळवून न घेता त्यांनी स्वेच्छेने निवृत्ती पत्करली. १९९७ मधील 'चाची ४२०' हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला. २००३ मध्ये वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.