लखनौ
आगामी २०२७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (AIMIM) अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी आणि आझाद समाज पक्षाचे (कांशीराम) प्रमुख चंद्रशेखर आझाद एकत्र येणार आहेत. दोन्ही नेते लखनौमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आपल्या युतीची अधिकृत घोषणा करण्याची शक्यता पक्षाच्या नेत्यांनी वर्तवली आहे.
भाजप आणि काँग्रेसपासून दूर राहून तिसरी आघाडी उभारण्याचा प्रयत्न या दोन पक्षांकडून केला जात आहे. देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशात सुमारे ४१ टक्के दलित आणि अल्पसंख्याक मतदार आहेत. राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे, तर समाजवादी पक्ष हा विजय रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर ओवेसी आणि नगीनाचे खासदार चंद्रशेखर आझाद यांची युती महत्त्वाची मानली जात आहे.
या युतीचे नेमके स्वरूप अद्याप गुलदस्त्यात असले तरी दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याच्या वृत्ताला एमआयएमचे प्रवक्ते शादाब चौहान यांनी दुजोरा दिला आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आझाद आणि ओवेसी स्वतंत्रपणे लखनौमध्ये दाखल झाले आहेत. गोमतीनगर येथील एका हॉटेलमध्ये दुपारी होणाऱ्या पत्रकार परिषदेत या आघाडीचा सविस्तर तपशील जाहीर केला जाईल, असे चौहान यांनी सांगितले. तरुण, शेतकरी, दुर्बल आणि वंचित घटकांना सक्षम करणे हा आमचा मुख्य उद्देश असल्याचे चंद्रशेखर आझाद यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
उत्तर प्रदेशातील ४०३ जागांपैकी हे दोन्ही पक्ष किती जागा लढवणार आणि इतर लहान पक्ष या आघाडीत सहभागी होणार का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. यापूर्वी ओवेसी यांनी समाजवादी पक्ष आणि काँग्रेसला आपल्या पक्षाला इंडिया आघाडीत सामावून घेण्यासाठी २ ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली होती. मात्र दोन्ही पक्षांनी त्याकडे दुर्लक्ष केले. अल्पसंख्याक मतदारांमध्ये असलेला ओवेसींचा प्रभाव आणि तरुण दलित मतदारांमध्ये वाढलेली आझाद यांची लोकप्रियता भाजपप्रणित एनडीए आणि इंडिया आघाडीसाठी आव्हान ठरू शकते.