स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६: इंदूरची ८ वर्षांची मक्तेदारी संपवत नवी मुंबई ठरले देशातील सर्वात स्वच्छ शहर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 41 m ago
स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते भारतातील सर्वात स्वच्छ शहराचा सन्मान स्वीकारताना नवी मुंबई महानगरपालिका.
स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते भारतातील सर्वात स्वच्छ शहराचा सन्मान स्वीकारताना नवी मुंबई महानगरपालिका.

 

नवी दिल्ली 

केंद्र सरकारच्या वार्षिक स्वच्छता सर्वेक्षणात म्हणजेच 'स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६' मध्ये महाराष्ट्रातील नवी मुंबईने देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून पहिला क्रमांक पटकावला आहे. गेल्या आठ वर्षांपासून अव्वल स्थानावर असलेल्या मध्य प्रदेशातील इंदूर शहराची मक्तेदारी नवी मुंबईने संपुष्टात आणली आहे. नवी दिल्लीतील विज्ञान भवनात आयोजित सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी मुंबईला 'स्वच्छ शहर - रँक १' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सुपर स्वच्छ लीगमध्ये नवी मुंबई अव्वल

यंदाच्या सर्वेक्षणातील 'सुपर स्वच्छ लीग' (Super Swachh League) गटात नवी मुंबईने पहिला क्रमांक मिळवला असून गुजरातच्या सुरतने दुसरे आणि आंध्र प्रदेशच्या विजयवाडा शहराने तिसरे स्थान पटकावले आहे. गेल्या आठ वर्षांपासून पहिल्या स्थानावर असलेले इंदूर शहर यंदा नव्याने सुरू करण्यात आलेल्या 'स्वच्छ शहर जोडी' (Mentor City) श्रेणीत देपालपूर या आपल्या जोडीदार शहरासोबत दुसऱ्या स्थानावर राहिले. या पुरस्कार सोहळ्याला केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल उपस्थित होते.

विविध लोकसंख्या गटांतील विजेती शहरे

दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांच्या गटात आंध्र प्रदेशातील ग्रेटर विशाखापट्टणमने पहिला क्रमांक पटकावला असून जबलपूर दुसऱ्या आणि लखनौ तिसऱ्या स्थानावर राहिले. तीन ते दहा लाख लोकसंख्येच्या गटात उज्जैन अव्वल ठरले, तर चंदीगड आणि गुंटूर अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी राहिले. महाराष्ट्रातील विटा शहराने वीस ते पन्नास हजार लोकसंख्येच्या गटात पहिला क्रमांक मिळवला. स्वच्छ किनारपट्टी शहरांच्या गटात ओडिशातील पुरीने पहिले, केरळमधील अलप्पुझाने दुसरे आणि महाराष्ट्रातील रत्नागिरीने तिसरे स्थान मिळवले.

४,७५१ शहरांचा सहभाग आणि नागरिकांचा प्रतिसाद

केंद्रीय मंत्री मनोहर लाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१६ मध्ये ७३ शहरांपासून सुरू झालेल्या या सर्वेक्षणात यंदा देशभरातील ४,७५१ हून अधिक शहरांनी सहभाग नोंदवला. या सर्वेक्षणात २.७ कोटी नागरिकांचा प्रत्यक्ष प्रतिसाद नोंदवण्यात आला असून मूल्यांकनाची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल पद्धतीने राबवण्यात आली. नवी मुंबई महानगरपालिकेने हा राष्ट्रीय सन्मान शहरातील सर्व स्वच्छतामित्र, स्वच्छतासखी आणि सुजाण नागरिकांना समर्पित केला आहे.



Latest News