'रामायण'वर बजेट आणि व्हीएफएक्सपेक्षा कथेवर चर्चा व्हावी; 'राम' आणि मूल्यांवर सलमान खानचे भाष्य

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 6 h ago
प्रातिनिधिक इमेज
प्रातिनिधिक इमेज

 

मुंबई 

दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या 'रामायण' या महाकाय चित्रपटाची चर्चा त्याच्या ४,००० कोटी रुपयांच्या बजेट किंवा व्हिज्युअल इफेक्ट्सवर (VFX) होण्याऐवजी प्रभू श्रीराम, माता सीता, रावण आणि या महाकाव्यातील मूल्यांवर व्हायला हवी, असे रोखठोक मत बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान याने व्यक्त केले आहे.

'व्हीएफएक्स आणि ४,००० कोटींच्या बजेटची चर्चा चुकीची'

आपल्या आगामी 'मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस' (Maatrubhumi: May War Rest in Peace) या चित्रपटाच्या प्रमोशनल कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना ६० वर्षीय सलमान खान म्हणाला, "माझ्या मते 'रामायण' चित्रपटाबाबतची चर्चा ही महाकाव्याच्या कथेवर केंद्रित असायला हवी, ना की त्याच्या निर्मिती खर्चावर किंवा व्हीएफएक्सवर. ४,००० कोटींचे बजेट आणि व्हीएफएक्स, व्हीएफएक्स, व्हीएफएक्स असा जप करणे मला योग्य वाटत नाही. प्रभू श्रीराम, रावण, माता सीता आणि आपल्या ग्रंथांमधील शिकवणीवरच बोलले गेले पाहिजे."

प्रभू श्रीरामांचे गुण आणि 'मातृभूमी'तील भूमिकेची तुलना

प्रभू श्रीरामांच्या आदर्शांवर भाष्य करताना सलमान म्हणाला, "श्रीराम हे उत्तम पती, उत्तम मुलगा, उत्तम पिता, महान योद्धा आणि उत्तम भाऊ होते. हेच सगळे गुण माझ्या 'मातृभूमी' चित्रपटातील पात्रातही पाहायला मिळतील." जेव्हा त्याला विचारण्यात आले की त्याने नितेश तिवारींचा चित्रपट पाहिला का, त्यावर हसत त्याने "मी रामानंद सागर यांचे 'रामायण' पाहिले आहे," असा संदर्भ देत ८० च्या दशकातील लोकप्रिय दूरदर्शन मालिकेची आठवण काढली.

७५ वर्षांवरील ज्येष्ठांसाठी ११ रुपयांत तिकीट

या कार्यक्रमात सलमानने आपल्या 'मातृभूमी' चित्रपटासंदर्भात एक मोठी सामाजिक घोषणा केली. ७५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना हा चित्रपट पाहण्यासाठी अवघे ११ रुपये तिकीट दर आकारले जातील, असे त्याने जाहीर केले. अपूर्व लखिया दिग्दर्शित हा चित्रपट २०२० च्या गॅलवान खोऱ्यातील भारत-चीन चकमकीवर आधारित असून सलमान यात कर्नल बिकुमल्ला संतोष बाबू यांची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट ४ डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.