वॉशिंग्टन
अमेरिकन सैन्याने शुक्रवारी इराणच्या हवाई संरक्षण यंत्रणांवर (Air Defense Systems) मर्यादित स्वरूपाचे नवे लक्ष्यित हल्ले केले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः या लष्करी कारवाईची माहिती दिली. तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतील (Strait of Hormuz) केशम बेटावरील सुझा भागात दोन मोठे स्फोट झाल्याचे इराणच्या सरकारी माध्यमांनी नमूद केले आहे.
फ्लोरिडातील वेस्ट पाम बीच येथे पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी या कारवाईचे वर्णन अत्यंत 'किरकोळ' असे केले. "इराणने एक लहान हवाई संरक्षण यंत्रणा उभारली होती, जी आम्ही सुमारे १५ मिनिटांत उद्ध्वस्त केली," असे ट्रम्प म्हणाले. अमेरिकन मध्यावधी निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाला झालेल्या मोठ्या पराभवाननंतर अमेरिकेने इराणवर केलेला हा पहिलाच हल्ला आहे. इराण युद्धावरून अमेरिकन मतदारांमध्ये असलेला असंतोष आणि इंधनाचे वाढलेले दर हे रिपब्लिकन पक्षाच्या पराभवाचे मुख्य कारण मानले जात आहे.
एकीकडे लष्करी हल्ले सुरू असतानाच, दुसरीकडे मध्यपूर्वेत शांतता प्रस्थापित करण्यासाठी कतार या मध्यस्थ देशाकडून नवीन प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. कतारने दिलेल्या प्रस्तावांवर इराण विचार करत असल्याचे दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, अमेरिकेने आपल्या बंदरांवरील नाकेबंदी उठवणे, निर्बंध मागे घेणे, गोठवलेली मालमत्ता मुक्त करणे आणि युद्धाच्या नुकसानीची भरपाई देणे या अटी मान्य करेपर्यंत ट्रम्प प्रशासनाशी अण्वस्त्रांबाबत थेट चर्चा करणार नाही, या भूमिकेवर इराण अजूनही ठाम आहे.
दरम्यान, अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (CENTCOM) इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाविषयी माहिती देणाऱ्यासाठी तब्बल २ कोटी अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले आहे. इराणचे अणुप्रकल्प, उपकरणे, वैज्ञानिक आणि तंत्रज्ञांशी संबंधित माहिती देणाऱ्यांना बक्षीसासोबत सुरक्षित स्थलांतराची सोय केली जाईल, असे सांगण्यात आले आहे. कतारच्या मध्यस्थीने दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी, तात्पुरती नाकेबंदी उठवणे आणि आयएईए (IAEA) निरीक्षकांना तपासणीची परवानगी देणे यावर आधारित दोन दिवसांचा 'ब्रिज डील'चा आराखडाही चर्चेत आहे.