न्यू यॉर्क
अमेरिकेतील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर असलेल्या लॉस एंजिलीसच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भारतीय वंशाच्या लोकशाही समाजवादी (Democratic Socialist) नेत्या निथ्या रामन यांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे. त्यांनी विद्यमान महापौर कॅरेन बास यांचा पराभव केला असून, लॉस एंजिलीस शहराच्या इतिहासात या सर्वोच्च पदावर पोहोचणाऱ्या त्या पहिल्या दक्षिण आशियाई वंशाच्या नेत्या ठरल्या आहेत.
सीएनएन (CNN) आणि द न्यू यॉर्क टाईम्सच्या अहवालानुसार, ७ लाख ८४ हजार २६२ मतमोजणीपैकी निथ्या रामन यांनी ५१.७ टक्के म्हणजेच ४ लाख ५ हजार १९३ मते मिळवत दणदणीत आघाडी घेतली, तर कॅरेन बास यांना ४८.३ टक्के म्हणजेच ३ लाख ७९ हजार ६९ मते मिळाली. जूनमध्ये झालेल्या प्राथमिक फेरीत रिपब्लिकन उमेदवार स्पेंसर प्रॅट यांना मागे टाकून रामन यांनी अंतिम शर्यतीत प्रवेश केला होता. २०२८ मधील लॉस एंजिलीस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेपूर्वी शहरातील बेघरपणाची समस्या निम्म्याने कमी करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
केरळमध्ये जन्मलेल्या निथ्या रामन या लॉस एंजिलीस सिटी कौन्सिलच्या ४ व्या डिस्ट्रिक्टचे प्रतिनिधित्व करतात. व्यवसायाने त्या नागरी नगररचनाकार (Urban Planner) असून त्यांनी प्रतिष्ठित हार्वर्ड युनिव्हर्सिटीतून पदवी आणि मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) मधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.
न्यू यॉर्क शहराच्या महापौरपदी झोहरान ममदानी हे आधीच कार्यरत असताना, आता निथ्या रामन यांच्या विजयामुळे अमेरिकेतील दोन सर्वात मोठ्या शहरांचे नेतृत्व भारतीय वंशाचे नेते करणार आहेत. अमेरिकन मध्यावधी निवडणुकांमध्ये भारतीय वंशाच्या उमेदवारांनी मिळवलेल्या ऐतिहासिक विजयांच्या मालिकेतील हे सर्वात मोठे यश मानले जात आहे.