काश्मीर खोऱ्यात ड्रग्ज तस्करांवर मोठी सर्जिकल स्ट्राईक; २ हजार तस्कर जेरबंद, ५६७ बँक खाती गोठवली

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 1 h ago
काश्मीर खोऱ्यातील अंमली पदार्थविरोधी मोहिमेविषयी माहिती देताना पोलीस महानिरीक्षक (IGP) सुजित कुमार
काश्मीर खोऱ्यातील अंमली पदार्थविरोधी मोहिमेविषयी माहिती देताना पोलीस महानिरीक्षक (IGP) सुजित कुमार

 

श्रीनगर 

जम्मू-काश्मीर खोऱ्यात अंमली पदार्थांच्या बेकायदेशीर व्यापाराविरोधात सुरक्षा दलांनी आतापर्यंतची सर्वात मोठी आणि कठोर मोहीम राबवली आहे. या व्यापक कारवाईदरम्यान पोलिसांनी अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार (NDPS Act) १,५०० हून अधिक गुन्हे दाखल केले असून सुमारे २,००० तस्करांना अटक केली आहे. तसेच तस्करांचे आर्थिक नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी ५६७ बँक खाती गोठवण्यात आली आहेत.

५६७ बँक खाती गोठवली आणि १.३१ कोटी रुपये सील

काश्मीर झोनचे पोलीस महानिरीक्षक (IGP) सुजित कुमार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत या कारवाईचा सविस्तर ताळेबंद मांडला. ड्रग्ज तस्करांच्या आर्थिक नेटवर्कवर मोठा घाला घालत पोलिसांनी ५६७ बँक खाती गोठवली असून, यामध्ये सुमारे १.३१ कोटी रुपयांचा निधी अडकवण्यात आला आहे. याशिवाय तस्करांची कोट्यवधी रुपयांची म्हणजेच तब्बल १५४ कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. या मोहिमेत पोलिसांनी संपूर्ण खोऱ्यातून १,७११ किलोग्रॅम अंमली पदार्थ जप्त केले आहेत.

तरुणांना सहभागाचे आवाहन आणि माहिती देणाऱ्याची ओळख गुप्त

काश्मीरमधील तरुणांनी ड्रग्ज आणि सायबर गुन्हेगारीविरोधातील या लढ्यात पोलिसांचे भागीदार व्हावे, असे आवाहन आयजी सुजित कुमार यांनी केले. अंमली पदार्थांच्या तस्करीबद्दल माहिती देणाऱ्या नागरिकांची व तरुणांची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. जर कोणी पुनर्वसन केंद्रात किंवा पोलिसांकडे मदतीसाठी आले, तर त्याला पूर्ण सहकार्य केले जाईल. तरुणांनी कोणत्याही प्रकारच्या ड्रग्ज तस्करीत किंवा ऑनलाइन सायबर फसवणुकीच्या जाळ्यात अडकू नये, असे त्यांनी आवर्जून स्पष्ट केले.

सायबर गुन्ह्यांवरही इशारा

काश्मीर खोऱ्यात वाढत्या सायबर गुन्ह्यांवर बोलताना त्यांनी सांगितले की, पोलिसांना गेल्या काही महिन्यांत ५४ कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या ऑनलाइन ठगीच्या तक्रारी मिळाल्या आहेत. यापैकी सुमारे १३ ते १४ टक्के रक्कम पोलिसांनी रिकव्हर केली असून ७ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम पीडितांना परत मिळवून दिली आहे. तरुणांनी स्वतःच्याच लोकांची फसवणूक करणाऱ्या टोळ्यांचा भाग बनू नये, असा गंभीर इशाराही पोलीस प्रशासनाने दिला आहे.