'रामायण' चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती; रणबीर कपूर आणि यश यांच्या अभिनयाचे तुफान कौतुक

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 2 h ago
'रामायण' चित्रपटातील मुख्य भूमिकांमध्ये रणबीर कपूर आणि साई पल्लवी
'रामायण' चित्रपटातील मुख्य भूमिकांमध्ये रणबीर कपूर आणि साई पल्लवी

 

नवी दिल्ली 

हिंदू पौराणिक महाकाव्यावर आधारित भव्य व्हीएफएक्सयुक्त 'रामायण' हा चित्रपट गुरुवारी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी प्रेक्षकांकडून या चित्रपटाला अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, विशेषतः रणबीर कपूर आणि यश यांच्या अभिनयाचे आणि चित्रपटाच्या भव्य व्हिज्युअल स्पेक्टॅकलचे प्रेक्षक कौतुक करत आहेत.

नितेश तिवारींचे दिग्दर्शन आणि ११,६२१ शो

दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या या दोन भागांच्या चित्रपटाच्या पहिल्या भागात रणबीर कपूर भगवान रामाच्या भूमिकेत, साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत, यश रावणाच्या भूमिकेत आणि रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत दिसत आहेत. या मोठ्या बजेटच्या निर्मितीला देशभरात ११,६२१ शो मिळाले आहेत. देशभरातील चित्रपटगृहांमधून प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया येत असून, बहुतांश प्रेक्षकांनी चित्रपटाचा आवाका, सिनेमॅटोग्राफी आणि व्हिज्युअल इफेक्ट्सचे कौतुक केले आहे. काही प्रेक्षकांच्या मते चित्रपटाची कथा आणि संवाद आणखी मजबूत असू शकले असते.

यश आणि रणबीर कपूर यांच्या अभिनयाला दाद

चित्रपटात रावणाची भूमिका साकारणाऱ्या यशच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी विशेष कौतुक केले आहे. पारंपारिक खलनायकापेक्षा रावणाची भूमिका अत्यंत प्रभावी आणि सूक्ष्म बारकाव्यांसह मांडल्याचे प्रेक्षकांनी सांगितले. त्याचा संस्कृत भाषेतील संवाद उच्चारही प्रेक्षकांना भावला आहे. दुसरीकडे रणबीर कपूरच्या श्रीरामाच्या रूपाने पूर्वार्धात प्रेक्षकांना बांधून ठेवले. चित्रपट ३.२५ तासांचा असला तरी प्रेक्षक अजिबात कंटाळत नाहीत, अशी प्रतिक्रिया चित्रपटगृहातून बाहेर पडणाऱ्या प्रेक्षकांनी दिली.

चित्रपटसृष्टीतूनही कौतुकाचा वर्षाव

चित्रपटाचा उत्तरार्ध आणि जटायू-रावण युद्धाचा प्रसंग अत्यंत प्रेक्षणीय ठरला आहे. दिग्दर्शक एस. एस. राजामौली, करण जोहर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांनी 'रामायण'च्या संपूर्ण टीमचे कौतुक केले आहे. पहिल्या भागाचा शेवट राम सीतेला सोडवण्याची प्रतिज्ञा करतो तिथे होतो, तर पुढील भागात म्हणजेच २०२८ मध्ये येणाऱ्या दुसऱ्या भागात सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे.



Latest News