मुंबई
आंध्र प्रदेशातील एका शाळेत घडलेल्या साखळी करवत (Electric Chainsaw) हल्ल्याच्या भीषण घटनेनंतर चित्रपट आणि वास्तव जीवनातील हिंसाचाराच्या संबंधावरून सोशल मीडियावर नवा वाद पेटला आहे. या घटनेची तुलना २०२३ मधील गाजलेल्या 'ॲनिमल' (Animal) चित्रपटातील वर्गातील हिंसक दृश्याशी करत टीका करणाऱ्यांवर चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. सिनेमाला नेहमीच बळीचा बकरा बनवले जात असून, काही लोक या दुर्दैवी घटनेचा वापर वैयक्तिक हिशोब चुकवण्यासाठी करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका आक्रमक पोस्टमध्ये संदीप रेड्डी वांगा यांनी लिहिले, "एका भीषण गुन्ह्यानंतर पहिली प्रतिक्रिया ही पीडितांबद्दल सहानुभूती आणि या समस्येच्या मुळाशी जाण्याची असायला हवी, ना की सिनेमाला बळीचा बकरा बनवण्याची. तुमचे लक्ष पीडित किंवा त्यांच्या कुटुंबावर नसून या भीषण दुर्घटनेचा वापर स्वतःचे वैयक्तिक हिशोब चुकवण्यासाठी करत आहात, हे आता स्पष्ट होत आहे." स्वतःला समाजसुधारक समजणाऱ्या आणि दुसऱ्यांच्या कामावर टीका करण्याची संधी शोधणाऱ्या अपयशी आणि निराश व्यक्तींवर त्यांनी यावेळी थेट निशाणा साधला.
आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील रापताडू येथील एका सरकारी उच्च प्राथमिक शाळेत एका दहावीच्या विद्यार्थिनीवर तिच्याच एका नातेवाइकाने वर्गात घुसून साखळी करवतीने प्राणघातक हल्ला केला होता. एकतर्फी प्रेमातून हा हल्ला झाल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर 'ॲनिमल', 'धुरंधर', 'केजीएफ' आणि 'मिर्झापूर' यांसारख्या चित्रपट व वेब सिरीजमधील हिंसेच्या उदात्तीकरणावर जोरदार टीका सुरू झाली. युट्युबर ध्रुव राठीसह अनेक युजर्सनी या चित्रपटांना गुन्हेगारांचे 'टॅम्पलेट' असे संबोधले. मात्र, दुसरीकडे रामगोपाल वर्मा यांच्यासह अनेक नेटकऱ्यांनी या वादात चित्रपटांची बाजू घेत "हिंसाचारासाठी सिनेमाला जबाबदार धरणे चुकीचे आहे," असे मत मांडले.