Diwali 2026 : आमची दिवाळी दानधर्माची - डॉ. फरहा शेख

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 4 h ago
गरजवंतांना मदत करताना डॉ. फरहा शेख
गरजवंतांना मदत करताना डॉ. फरहा शेख

 

डॉ. फरहा शेख

दिवाळी आली की शहरातील वातावरण पूर्णपणे बदलून जाते. दारात पणत्या झळकतात, रांगोळ्यांचे रंग नटतात आणि घराघरात फराळाचा घमघमाट सुटतो. सगळीकडे आनंदीआनंद असतो. पण प्रत्येकासाठी हा सण सारख्याच स्वरूपाचा किंवा आनंदाचा नसतो. माझ्या डोळ्यांसमोर आजही असे अनेक चेहरे आहेत ज्यांना रोजच्या जेवणाचा प्रश्न असतो. दिवाळीत मुलांच्या तोंडापर्यंत गोड घास पोहोचवण्यासाठी त्यांना कितीतरी पापड बेलावे लागतात. 

घरात पणत्या पेटवायला काय तर खायला सुद्धा तेल नसतं. हे चित्र मी रोज पाहते, अनुभवते. आणि म्हणूनच आम्ही गेल्या सात-आठ वर्षांपासून गोरगरिबांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी यासाठी प्रयत्न करतोय. 
 

लोक मला अनेकदा विचारतात, “तुम्ही मुस्लिम असून हिंदूंची दिवाळी का साजरी करता?” त्यांना माझं एकच सांगणं असतं की सण कोणाचाही असो, आनंद साजरा करायला कोणता मुहूर्त लागत नाही. आमच्या घरात जसा ईदचा सोहळा असतो, तसच प्रत्येक गरजूच्या घरात दिवाळीचं गोडधोड बनावं आणि दारासमोर दिवा तेवता राहावा, यासाठीच आमची धडपड असते.

आम्ही मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशनकडून दरवर्षी मी आणि माझे पती अन्वर शेख जवळपास ६० ते ७० गरजू कुटुंबांपर्यंत दिवाळीच्या साहित्याचे किट पोहोचवतो. या किटमध्ये आटा, तेल, मैदा, साखर, भडंग, हळद आणि अगदी मोती साबणापर्यंत सर्व गोष्टी असतात. दिवाळीचे फराळ बनवायला ज्या ज्या गोष्टींची गरज असते ते सगळे आम्ही पुरवतो.
 

कुणालाही मदत करताना त्याच्या स्वाभिमानाला कधीही धक्का लागता कामा नये, ही गोष्ट मी माझ्या आयुष्यात अगदी गाठीशी बांधली आहे. आजकाल सोशल मीडियाचा जमाना आहे, पण आम्ही कधीही कोणाला मोठ्या व्यासपीठावर बोलावून, चारचौघात उभं करून किंवा त्यांच्या गरिबीचं प्रदर्शन करून मदत केलेली नाही. मला ते अजिबात आवडत नाही. आम्ही स्वतः त्यांच्या घरी जातो आणि ते किट त्यांच्या हातात देतो. कारण मदत घेणारा कधीही लहान नसतो आणि माणुसकीच्या नात्याने ती देवाणघेवाण होत असते.

कोणत्याही प्रसिद्धीचा हव्यास न ठेवता, कुणाच्या तरी आयुष्यात एक दिवा लावण्याचा हा आमचा प्रवास असाच सुरू राहील. ईद असो वा दिवाळी, आम्ही आमचे काम कायमस्वरूपी असेच सुरु ठेवणार.  यंदाच्या दिवाळीतही तुमच्या आमच्या आजूबाजूला कुणाचा अंधार दूर करता आला, तर नक्की करा. 


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter