श्रीनगर येथील शेर-ए-काश्मीर स्टेडियमवर काश्मिरी पंडित आणि मुस्लिमांनी एकत्र येत साजरा केलेला भव्य दसरा उत्सव
काश्मीर खोऱ्यातील सामाजिक सलोखा, सांस्कृतिक वारसा आणि धार्मिक सहअस्तित्वाची परंपरा दृढ करणारा दसरा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. श्रीनगर येथील ऐतिहासिक शेर-ए-काश्मीर स्टेडियमवर अत्यंत उत्साहात आणि भव्य दिव्य वातावरणात पार पडला. काश्मिरी पंडित संघर्ष समिती आणि पुनीत बालन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यात काश्मीरच्या मूळ काश्मिरियत दर्शन झाले. या उत्सवात काश्मिरी पंडितांसह स्थानिक मुस्लिम, शीख, हिंदू तसेच विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
वाईटावर चांगल्याच्या विजयाचे आणि असत्यावर सत्याच्या विजयाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या दसऱ्याच्या या उत्सवातून काश्मीरमधील विविध धर्मीयांच्या मनात एकमेकांबद्दल असलेला आदर आणि सहअस्तित्वाची भावना अधिक बळकट झाली. राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक मतभेद बाजूला ठेवून सर्व समुदायांनी एकाच व्यासपीठावर येऊन दाखवलेली ही एकता, काश्मीरची सामायिक सांस्कृतिक परंपरा आजही तितकीच जिवंत आणि प्रवाही असल्याचे सिद्ध झाले.
या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनानंतर काश्मिरी पंडित संघर्ष समितीने श्रीनगर जिल्हा प्रशासन, श्रीनगर पोलीस दल, जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशन (जेकेसीए), श्रीनगर महानगरपालिका, वाहतूक पोलीस तसेच अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा विभागाचे मनःपूर्वक आभार मानले. जेकेसीएकडून मैदान आणि आवश्यक कर्मचारी वेळेवर उपलब्ध करून देण्यात आले होते. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झालेल्या सर्व अधिकारी, स्वयंसेवक आणि नागरिकांप्रती समितीने कृतज्ञता व्यक्त केली.
उत्सवातून एकतेचा सूर
श्रीनगरमधील दसऱ्याचा हा सोहळा केवळ एका धार्मिक उत्सवापुरता मर्यादित राहिला नाही, तर तो काश्मीरच्या बहुधार्मिक आणि बहुसांस्कृतिक अस्मितेचा एक बुलंद आवाज ठरला. विविध धर्मांचे अनुयायी एकमेकांच्या श्रद्धांचा आणि परंपरांचा सन्मान करत एकत्र कसे येऊ शकतात, याचे हे एक आदर्श उदाहरण होते. करुणा, परस्पर आदर आणि एकात्मतेची मूल्ये अशा सामूहिक सणांमधून अधिक प्रखरतेने समोर येतात.
काश्मिरी पंडित संघर्ष समितीने नमूद केल्याप्रमाणे, विविध समुदायांमधील दुरावा मिटवून संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि काश्मीरच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरांना पुन्हा एकदा बहर आणण्यासाठी अशा सामूहिक आणि सर्वसमावेशक उत्सवांची नितांत गरज आहे. काश्मीर हे केवळ एका विशिष्ट वर्गाचे नसून तेथील प्रत्येक नागरिकाचे आहे; आणि या खोऱ्याचे उज्ज्वल, शांततामय भविष्य हे सामाजिक सलोखा, सहअस्तित्व आणि सामायिक माणुसकीच्या पायावरच रचले जाऊ शकते, हाच स्पष्ट संदेश या उत्सवाने संपूर्ण देशाला दिला आहे.