अमेरिकन निवडणुकांत मुस्लिम उमेदवारांचा डंका; फोडाफोडीच्या राजकारणाविरुद्ध जनतेचा कौल?

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 5 h ago
अब्दुल अल-सय्यद त्यांच्या पत्नी डॉ. सारा जुकाकूसोबत
अब्दुल अल-सय्यद त्यांच्या पत्नी डॉ. सारा जुकाकूसोबत

 

अमेरिका: 

अमेरिकेत नुकत्याच पार पडलेल्या मध्यावधी निवडणुकांमध्ये (Midterm Elections) डेमोक्रॅटिक पक्षाने दणदणीत यश मिळवत अमेरिकन काँग्रेसवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. या भव्य विजयातील सर्वात ठळक आणि कौतुकास्पद बाब म्हणजे मुस्लिम उमेदवारांनी मारलेली ऐतिहासिक मजल. आतापर्यंत हाती आलेल्या अधिकृत निकालांनुसार, देशभरात किमान ३६ मुस्लिम उमेदवार विविध पातळ्यांवर विजयी झाले आहेत. यातील सात उमेदवार अमेरिकन काँग्रेसमध्ये पोहोचले आहेत. सहा उमेदवार 'हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज'वर निवडून गेले असून एका नेत्याने थेट सिनेटमध्ये धडक मारून अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात स्थान निर्माण केले आहे.

 

अब्दुल अल-सय्यद: अमेरिकेचे पहिले मुस्लिम सिनेटर आणि त्यांचे भारतीय नाते

मिशिगन राज्यामध्ये यंदा एक खूप मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळाला. इजिप्शियन वंशाचे अमेरिकन डॉक्टर आणि सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ अब्दुल अल-सय्यद (Abdul El-Sayed) यांनी रिपब्लिकन पक्षाच्या माईक रॉजर्स यांचा पराभव केला. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एक मुस्लिम नेता 'सिनेटर' पदावर पोहोचला आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रचारादरम्यान त्यांच्यावर अनेक वैयक्तिक आणि धार्मिक हल्ले केले होते. ट्रम्प यांनी त्यांना एका सभेत "जिहादी" आणि "अब्दुल रमजान" अशी नावे ठेवली होती. या सगळ्या द्वेषपूर्ण प्रचाराला अब्दुल यांनी अत्यंत संयमाने आणि खंबीरपणे उत्तर दिले. आरोग्य सेवा, वाढती महागाई आणि राजकारणातील कॉर्पोरेट प्रभाव कमी करण्याच्या मुद्द्यांवर त्यांनी आपला प्रचार केंद्रित केला होता.

विजयानंतरच्या आपल्या पहिल्याच भाषणात त्यांनी विरोधकांना सडेतोड उत्तर दिले. "तुम्ही एका अत्यंत अनपेक्षित उमेदवारावर विश्वास दाखवला. आज रात्री आपण त्या 'इन्शाअल्लाह'चे रूपांतर 'अल्हम्दुलिल्लाह'मध्ये करू शकतो," असे ते अत्यंत भावूक होऊन म्हणाले. पुढे ते ठामपणे म्हणाले, "विरोधकांना असा अमेरिका हवा आहे, तिथे आपल्या सर्वांसाठी खूप कमी जागा असेल. पण आपला अमेरिका देश आपल्या सर्वांसाठी पुरेसा मोठा आहे, हे आपण आज त्यांना दाखवून दिले आहे."

अब्दुल अल-सय्यद यांच्या या विजयाचा आनंद भारतातही उत्साहाने साजरा होत आहे. यामागे एक अतिशय खास भारतीय नाते दडलेले आहे. त्यांच्या पत्नी डॉ. सारा जुकाकू (Sarah Jukaku) यांचे मूळ गाव कर्नाटकातील भटकळ हे आहे. सारा यांचे वडील डॉ. तय्यब जुकाकू अनेक वर्षांपूर्वी अमेरिकेत स्थायिक झाले. सारा यांचे आजोबा शमसुद्दीन जुकाकू हे म्हैसूरमध्ये प्रसिद्ध वकील होते आणि त्यांनी म्हैसूर राज्य सरकारमध्ये अर्थ राज्यमंत्री म्हणूनही काम पाहिले होते. एका मुलाखतीत अब्दुल यांनी आपल्या या भारतीय नात्याबद्दल अतिशय गमतीशीर विधान केले. "गेली वीस वर्षे मी एका दक्षिण भारतीय कुटुंबाचा भाग आहे. मी आता त्यांच्यात पूर्णपणे मिसळून गेलोय. मला वाटते, मी आता अरब असण्यापेक्षा जास्त भारतीयच झालो आहे," असे ते हसत हसत म्हणाले.

 

अॅडम हमावी: गाझामध्ये सेवा देणाऱ्या डॉक्टरची काँग्रेसमध्ये एन्ट्री 

न्यू जर्सीच्या १२ व्या डिस्ट्रिक्टमध्येही असाच एक मोठा विजय पाहायला मिळाला. इजिप्शियन वंशाचे अमेरिकन सर्जन अॅडम हमावी यांनी रिपब्लिकन उमेदवार ग्रेग मेली यांचा पराभव केला. न्यू जर्सीतून काँग्रेसमध्ये पोहोचणारे ते पहिले मुस्लिम प्रतिनिधी ठरले आहेत. हमावी यांचा इतिहास प्रेरणादायी आणि धाडसी आहे. ते अमेरिकन सैन्यात सर्जन होते. २००४ मध्ये इराक युद्धात हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर त्यांनी सिनेटर टॅमी डकवर्थ यांचे प्राण वाचवले होते. त्यानंतर त्यांनी नुकतेच गाझामध्ये स्वयंसेवक म्हणून काम केले. इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये जखमी झालेल्या पॅलेस्टिनी नागरिकांवर आणि विशेषतः गंभीर जखमी लहान मुलांवर त्यांनी तिथे अत्यंत कठीण परिस्थितीत उपचार केले होते.

रशिदा तलाईब आणि इल्हान ओमर: अनुभवी नेत्यांचे पुन्हा वर्चस्व 

अमेरिकन राजकारणातील आक्रमक चेहरे म्हणजे रशिदा तलाईब (Rashida Tlaib) आणि इल्हान ओमर (Ilhan Omar) यांनीही आपले वर्चस्व पुन्हा सिद्ध केले आहे. मिशिगनच्या १२ व्या डिस्ट्रिक्टमधून रशिदा तलाईब सलग पाचव्यांदा निवडून आल्या आहेत. मूळच्या पॅलेस्टिनी असलेल्या रशिदा इस्रायलच्या धोरणांवर आणि गाझावरील युद्धावर नेहमीच सडकून टीका करतात. मिनेसोटाच्या ५ व्या डिस्ट्रिक्टमधून सोमाली वंशाच्या इल्हान ओमर यांनीही पाचव्यांदा दणदणीत विजय मिळवला आहे. या दोघींनीही २०१८ मध्ये पहिल्यांदा काँग्रेसमध्ये पाऊल ठेवून इतिहास रचला होता. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून होणाऱ्या सततच्या राजकीय हल्ल्यांना न जुमानता त्यांनी आपला गड राखला आहे.


डारियालिझा अविला शेव्हेलियर: पहिली लॅटिना मुस्लिम महिला 

न्यूयॉर्कच्या १३ व्या डिस्ट्रिक्टमधून ३३ वर्षीय डारियालिझा अविला शेव्हेलियर यांनी विजयश्री खेचून आणली. काँग्रेसमध्ये पोहोचणाऱ्या त्या पहिल्या लॅटिना मुस्लिम महिला ठरल्या आहेत. त्या डोमिनिकन वंशाच्या आहेत. मानवाधिकार चळवळी आणि पॅलेस्टिनी समर्थक आंदोलनांमधून त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. याशिवाय, इंडियाना राज्याच्या ७ व्या डिस्ट्रिक्टमधून आंद्रे कार्सन आणि कॅलिफोर्नियाच्या १२ व्या डिस्ट्रिक्टमधून मानवाधिकार कार्यकर्त्या लतीफा सायमन यांनीही आपापल्या जागा सहज राखत पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश मिळवला आहे.


स्थानिक आणि राज्य पातळीवरही मोठा दबदबा 

स्थानिक आणि राज्य पातळीवरील निवडणुकांमध्येही मुस्लिम उमेदवारांनी कमाल केली आहे. भारतीय वंशाच्या मुस्लिम नेत्या नबिला सय्यद यांनी इलिनॉय राज्याच्या २६ व्या सिनेट डिस्ट्रिक्टमधून रिपब्लिकन उमेदवाराचा पराभव केला. त्यांनी ही जागा रिपब्लिकन पक्षाकडून खेचून घेत डेमोक्रॅटिक पक्षाला मिळवून देण्याची मोठी कामगिरी केली.

न्यूयॉर्कच्या १२ व्या स्टेट सिनेट डिस्ट्रिक्टमधून पॅलेस्टिनी वंशाच्या कार्यकर्त्या अबीर कवास निवडून आल्या आहेत. त्यांच्या कुटुंबाला १९४८ मध्ये पॅलेस्टाईनमधून विस्थापित व्हावे लागले होते. त्यांनी परवडणारी घरे, आरोग्य सेवा आणि स्थलांतरितांच्या हक्कांसाठी जोरदार प्रचार केला होता. मिशिगनच्या दुसऱ्या स्टेट सिनेट डिस्ट्रिक्टमधून लेबनीज वंशाचे अब्बास अलावी यांनीही विजय मिळवला आहे. त्यांनी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या इस्रायल धोरणाला विरोध करणारी 'अनकमिटेड' चळवळ उभी करण्यात मोठी भूमिका बजावली होती. या सर्व नेत्यांसोबतच टेक्सासमध्ये पाकिस्तानी वंशाचे सलमान भोजानी आणि सुलेमान लालानी यांनीही आपले वर्चस्व कायम राखले आहे. पेनसिल्व्हेनियामध्ये तारिक खान आणि कनेक्टिकटमध्ये सौद अन्वर यांनीही पुन्हा एकदा विजय मिळवला आहे.

हेही वाचा: अमेरिकन काँग्रेसमध्ये दणदणीत विजय मिळवणारे हे आहेत भारतीय वंशाचे उमेदवार...

अमेरिकेच्या राजकारणात मुस्लिम समुदायाचा वाढता प्रभाव या ताज्या निकालांमधून अगदी स्पष्ट दिसतो. द्वेषपूर्ण प्रचार, वर्णद्वेषी शेरेबाजी आणि राजकीय हल्ल्यांना न जुमानता या उमेदवारांनी लोकांची मने जिंकली आहेत. अमेरिकेतील सर्वसामान्य जनतेने सर्वसमावेशकतेच्या बाजूने दिलेला हा कौल आहे. राजकारणात सर्वसामान्यांचे प्रश्न, आरोग्य सेवा आणि शांततेचा पुरस्कार करणारे हे सर्व नेते आता अमेरिकेच्या धोरणांना एक नवी दिशा देतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.