आरिफुल इस्लाम
वय किंवा भौगोलिक सीमा कधीही प्रतिभेच्या वाटेत अडसर ठरू शकत नाहीत. आसामच्या कामरूप जिल्ह्यातील रंगिया येथील अवघ्या १५ वर्षांच्या एका होतकरू मुलीने हेच सिद्ध करून दाखवले आहे. कष्टाळूपणा, जिद्द, दृढनिश्चय आणि योग्य मार्गदर्शन असेल तर कोणत्याही परिस्थितीत यश मिळवता येते, हेच या तरुण मुलीने दाखवून दिले आहे. कामरूप जिल्ह्यातील रंगिया उपविभागांतर्गत येणाऱ्या साहन गावातील ही बहुगुणी किशोरवयीन मुलगी, तनाज सैकिया हिने आपल्या अफाट सर्जनशीलतेने संपूर्ण प्रदेशाची मान अभिमानाने उंचावली आहे.
अश्रांत मेहनत आणि साहित्यावरील प्रगाढ प्रेमाच्या बळावर तनाजने 'द बर्निंग लाईट' (The Burning Light) नावाचा कवितासंग्रह प्रकाशित केला. या पुस्तकाने साहित्य वर्तुळात मोठी दाद मिळवली असून तिला घसघशीत ख्याती मिळवून दिली आहे. नुकताच तिला या कवितासंग्रहासाठी राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित 'लेगसी ऑफ लिटरेसी' (Legacy of Literacy) पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. अजून शाळेत शिकत असताना, इतक्या लहान वयात असा बहुमान मिळवणे ही एक अत्यंत दुर्मिळ आणि अभिमानाची गोष्ट आहे.
सध्या रंगियाच्या मॉडर्न पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीत शिकणाऱ्या तनाजच्या या यशाने सर्वत्र मोठी चर्चा रंगली असून संपूर्ण परिसरात आनंदाची लाट पसरली आहे.
'आवाझ-द-व्हॉईस'शी बोलताना तनाज सांगते, "मी एक वर्षापूर्वी माझा कवितासंग्रह 'द बर्निंग लाईट' प्रकाशित केला. यामध्ये जवळपास पन्नास कविता आहेत. नुकताच मी 'लिटरेशात टाईम्स'तर्फे आयोजित 'लेगसी ऑफ लिटरेसी' पुरस्कारासाठी ऑनलाइन अर्ज केला होता. माझ्या कवितासंग्रहाची नामांकन झाले आणि शेवटी मला हा पुरस्कार मिळाला. अर्ज करताना मला विजयाची मुळीच अपेक्षा नव्हती. या पुरस्कारामुळे माझा आत्मविश्वास कैक पटीने वाढला असून साहित्यात आणखी चांगले काम करण्याची मला मोठी प्रेरणा मिळाली आहे."
तसेच ती पुढे म्हणते, "मी पाचवीत असल्यापासून कविता लिहू लागले. माझ्या मोठ्या भावाकडून मला पहिली प्रेरणा मिळाली. तो कविता लिहितो, आणि त्याला पाहताच मलाही लिहिण्याची प्रेरणा मिळाली. मी माझ्या भावना कवितेच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करते. आमच्यासारख्या तरुणांना मनातले सगळेच विचार नेहमीच इतरांसोबत मोकळेपणाने बोलता येत नाहीत. त्यामुळे मी ते न बोललेले विचार कवितेतून व्यक्त करू लागले. आतापर्यंत मी दोनशेहून अधिक कविता लिहिल्या आहेत. त्यापैकी पन्नास कविता मी आधीच प्रकाशित केल्या आहेत आणि उरलेल्या दीडशेपैकी बऱ्याच कविता लवकरच प्रकाशित करण्याची माझी इच्छा आहे."
तिची प्रतिभा केवळ एकाच क्षेत्रापुरती मर्यादित नाही. लहानपणापासूनच साहित्य आणि संस्कृतीची आवड असलेल्या तनाज इंग्रजी भाषेत अतिशय सुंदर कविता लिहिते. तिच्या कवितांमध्ये आयुष्याचे वास्तव, निसर्गाचे सौंदर्य आणि मानवी भावना अत्यंत संवेदनशीलतेने मांडलेल्या असतात.
साहित्यासोबतच तनाजला संगीत आणि कला क्षेत्रातही विशेष रुची आहे. कविता लेखनासोबतच ती एक उत्तम गायिका आणि वाद्यवादक आहे. सध्या ती संगीताचे पद्धतशीर प्रशिक्षण घेत असून आपल्या आवाजाला अधिक धार आणत आहे. फावल्या वेळेत गिटार आणि हार्मोनियम वाजवण्यात तिला एक वेगळाच आनंद मिळतो.
आपल्या भविष्यातील स्वप्नांबद्दल बोलताना तनाज सांगते, "मला स्वतःची गाणी लिहायची आहेत, त्याचे संगीत स्वतःच कंपोज करायचे आहे आणि ती गाणी मला स्वतःलाच गायची आहेत. लवकच एक अल्बम रिलीज करण्याचा माझा विचार आहे. सध्या मी संगीताचे धडे घेत आहे आणि योग्य मार्गदर्शनामुळे मी नक्कीच माझे हे स्वप्न पूर्ण करू शकेन, असा मला विश्वास आहे."
कविता, गायन आणि वाद्यवादक या सर्व गोष्टींमुळे तनाजला मनःशांती मिळते आणि तिचा अभ्यासावरील फोकस वाढतो. याविषयी ती सांगते, "या सर्व गोष्टींमुळे माझे मन शांत राहते आणि अभ्यासात एकाग्रता वाढायला मदत होते. यामुळे माध्यमिक शाळा सोडण्याच्या प्रमाणपत्राच्या परीक्षेची (HSLC) तयारी करणे मला अधिक सोपे जाते."
तिच्या या यशामागे तिच्या आई-वडिलांचे मोठे योगदान आणि त्याग आहे. एका सामान्य गावातून थेट राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचण्याचा हा प्रवास तनाजसाठी मुळीच सोपा नव्हता. पण तिच्या पालकांचे सातत्यपूर्ण प्रयत्न, प्रचंड मेहनत आणि खंबीर भावनिक पाठिंब्यामुळेच ती आपली स्वप्ने प्रत्यक्षात उतरवू शकली. त्यांनी प्रत्येक पावलावर आपल्या मुलीचे खच्चीकरण होऊ न दिले नाही आणि तिची प्रतिभा जोपासण्यासाठी आवश्यक असलेले सर्व संसाधने व संधी उपलब्ध करून दिली. त्यांचा हा निस्वार्थी त्याग आणि प्रोत्साहनच तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी ताकद आहे.
तनाजचे वडील डॉ. अब्दुल सलाम सांगतात, "पालक म्हणून आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. तनाजने जेव्हा लिहायला सुरुवात केली, तेव्हा ती फक्त आवडी म्हणून लिहिते असे आम्हाला वाटले होते. सुरुवातीला आम्ही याकडे फारसे लक्ष दिले नाही. पण मुले ज्या वयात फुलपाखरांच्या मागे धावतात, त्या वयात तिला मिळालेला मान पाहता ती नक्कीच आयुष्यात खूप दूरवर जाईल, असा मला विश्वास आहे."
ते पुढे म्हणतात, "जेव्हा मी तिच्या कविता वाचतो, तेव्हा मला त्या नेहमीच पूर्णपणे समजतात असे नाही. एखादी कविता वाचताना मला अनेकदा काही शब्दांचे अर्थ तिलाच विचारून घ्यावे लागतात. तिच्या कविता अतिशय विचार करायला लावणाऱ्या आणि अर्थपूर्ण असतात. या वयात तिच्या कवितांमध्ये जी प्रगल्भता दिसते, ती मला सर्वात जास्त भावते. भविष्यात ती या क्षेत्रात नक्कीच मोठी मजल मारेल."
"आपण सहसा आपल्या मुलांना एका विशिष्ट चौकटीत बंदिस्त करून वाढवण्याचा प्रयत्न करतो. ही अगदी चुकीची गोष्ट आहे. आपला समाज अजूनही मुलांना अशा बंधनात ठेवतो आणि ते योग्य नाही. अनेक मुलांना आपल्या पालकांकडे आपले विचार मोकळेपणाने मांडता येत नाहीत, परिणामी त्यांची प्रतिभा ती फुलण्याआधीच कोमेजून जाते," असेही ते आवर्जून सांगतात.
आपल्या भविष्यातील ध्येयांबद्दल बोलताना तनाज सांगते की, तिला एक प्रस्थापित आणि यशस्वी लेखिका बनण्याची इच्छा आहे. आपल्या लेखनाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवून आणायचा आहे आणि साहित्यात मोलाचे योगदान द्यायचे आहे. तिचा हा प्रवास तिच्याच वयाच्या इतर अनेक तरुणांसाठी नक्कीच एक दीपस्तंभ ठरेल यात शंका नाही.