पुणे
भारताची २४ वर्षीय अष्टपैलू खेळाडू प्रेमा रावत हिने महिला टी-२० क्रिकेटच्या इतिहासात नव्या सुवर्णअक्षरांची नोंद केली आहे. पुण्यात खेळल्या जात असलेल्या वरिष्ठ महिला टी-२० ट्रॉफी स्पर्धेत उत्तराखंडचे प्रतिनिधित्व करताना प्रेमाने अवघ्या १४ चेंडूंत नाबाद अर्धशतक ठोकून महिला टी-२० क्रिकेटमधील सर्वात वेगवान अर्धशतकाचा जागतिक विक्रम नोंदवला आहे.
प्रेमा रावत हिने या सामन्यात ३५७ च्या स्ट्राइक रेटने धावा कुटल्या. तिच्या या आक्रमक खेळीत ६ चौकार आणि ४ उत्तुंग षटकारांचा समावेश होता. तिच्या या वादळी अर्धशतकाच्या जोरावर उत्तराखंडच्या संघाने निर्धारित २० षटकांत २ बाद १८७ धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर उत्तराखंडने हा सामना ८९ धावांच्या मोठ्या फरकाने जिंकून शानदार विजय मिळवला.
महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान अर्धशतकाचा विक्रम पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना हिच्या नावावर होता. तिने या वर्षाच्या सुरुवातीला झिम्बाब्वेविरुद्ध १५ चेंडूंत अर्धशतक झळकावले होते. याशिवाय इंग्लंडची मॅरी केली आणि ऑस्ट्रेलियाची लॉरा हॅरिस यांनीही देशांतर्गत क्रिकेटमध्ये १५ चेंडूंत ५० धावा केल्या होत्या. प्रेमाने या सर्वांना मागे टाकत १४ चेंडूंत हा टप्पा गाठला. फलंदाजीत चमक दाखवल्यानंतर प्रेमाने गोलंदाजीतही कमाल करत आपल्या ४ षटकांत केवळ १२ धावा देत २ बळी घेतले