पुणे मेट्रो लाईन ३ चे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन; हिंजवडी ते जिल्हा न्यायालय प्रवास होणार सुलभ

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 1 h ago
एआय निर्मित इमेज
एआय निर्मित इमेज

 

पुणे 

गेल्या १० ते १२ वर्षांत भारतातील सुमारे ५० कोटी नागरिक अत्यंत गरिबीतून बाहेर आले असल्याचे जागतिक बँकेच्या अहवालाचा हवाला देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी स्पष्ट केले. पूर्वी गरिबीविरोधातील लढा केवळ 'घोषणां'पुरता मर्यादित होता, मात्र आज भारत प्रत्यक्ष पातळीवर गरिबीचा पराभव करत आहे, असे त्यांनी सांगितले. पुणे मेट्रो लाईन ३ (पिंक लाईन) चे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.

पुणे मेट्रो लाईन ३ चे उद्घाटन आणि टप्पा-२ चे भूमिपूजन

पंतप्रधान मोदी यांनी ८,३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून उभारण्यात आलेल्या २३ किमी लांबीच्या हिंजवडी ते जिल्हा न्यायालय या 'पिंक लाईन' मेट्रोचे उद्घाटन केले. या मेट्रोमुळे हिंजवडी आयटी पार्कमधील हजारो आयटी व्यावसायिकांचा दैनंदिन प्रवास वेगवान होणार असून वाहतूक कोंडीतून मोठी सुटका होणार आहे. यासोबतच त्यांनी सुमारे २१,८०० कोटी रुपयांच्या पुणे मेट्रो टप्पा-२ अंतर्गत चार नवीन कॉरिडॉरचे भूमिपूजनही केले. २०१४ पूर्वी देशात केवळ २४८ किमी असलेले मेट्रोचे जाळे आज १,२०० किमीवर पोहोचले असून भारत जागतिक स्तरावर अव्वल तीन मेट्रो नेटवर्कमध्ये समाविष्ट झाला आहे, असे मोदी म्हणाले.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन आणि दिवाळीची सामाजिक बांधिलकी

महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीवर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील शेतकऱ्यांना धीर दिला. केंद्र सरकार संवेदनशीलतेने आणि पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच सणासुदीच्या काळात देशवासीयांनी दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांची आठवण ठेवून त्यांच्या घरातही दिवाळीचा आनंद पोहोचवावा, असे आवाहन त्यांनी केले. राज्य सरकारने राज्यातील ८५ टक्के भाग दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केला असून दिवाळीपूर्वी ५,००० रुपयांची अंतरिम मदत जाहीर केली आहे.

नागरी पायाभूत सुविधा आणि आर्थिक विकास

शहरांचा पायाभूत विकास हा विकसित भारताच्या संकल्पाचा आत्मा आहे, असे सांगत पंतप्रधानांनी फेब्रुवारीमध्ये मंजूर केलेल्या १ लाख कोटी रुपयांच्या 'अर्बन चॅलेंज फंड'चा उल्लेख केला. मेट्रो जाळ्याच्या विस्तारामुळे नागरिकांचा वेळ वाचत असून उत्पादकता वाढत आहे, ज्याचा थेट फायदा देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि सर्वसामान्य नागरिकांना होत असल्याचे त्यांनी नमूद केले.