वॉशिंग्टन
अमेरिकेमध्ये आज अत्यंत महत्त्वाच्या अशा मध्यावधी निवडणुकांसाठी (US Midterm Elections) मतदानाला सुरुवात होत आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील धोरणे, इराणमधील दीर्घकालीन युद्ध, वाढती महागाई आणि व्यावसायिक वाद या पार्श्वभूमीवर ही निवडणूक ट्रम्प प्रशासनावरील थेट जनमत कौल (Referendum) म्हणून पाहिली जात आहे.
या निवडणुकीद्वारे अमेरिकन काँग्रेसच्या १०० सदस्यांच्या सिनेटमधील ३७ जागा आणि 'हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्ज'च्या सर्व ४३५ जागांचे भवितव्य ठरणार आहे. याशिवाय ३६ राज्यांमध्ये गव्हर्नर पदासाठीही मतदान होत आहे. रिपब्लिकन पक्षाचे दोन्ही सभागृहांवरील वर्चस्व टिकणार की विरोधी डेमोक्रॅटिक पक्ष हाऊसवर ताबा मिळवणार, याकडे जगाचे लक्ष लागले आहे. प्री-पोल सर्व्हेनुसार डेमोक्रॅट्सला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ट्रम्प यांनी काँग्रेसच्या निर्णयांना 'व्हिटो' (Veto) वापरून रोखण्याचे संकेत दिले आहेत, तर माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी डेमोक्रॅटिक उमेदवारांसाठी प्रचारसभा घेत ट्रम्प यांच्या धोरणांवर कडक टीका केली आहे.
ओहायोमध्ये गव्हर्नर पदासाठी भारतीय वंशाचे रिपब्लिकन उमेदवार विवेक रामास्वामी आणि डेमोक्रॅटिक उमेदवार एमी अॅक्टन यांच्यात थेट लढत होत आहे. लॉस एंजिलीसच्या महापौरपदासाठी केरळमध्ये जन्मलेल्या निथ्या रामन निवडणूक लढवत आहेत. तसेच रो खन्ना, अमी बेरा, प्रमिला जयपाल आणि सुहास सुब्रह्मण्यम हे भारतीय वंशाचे लोकप्रतिनिधी पुन्हा हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्जवर निवडून येण्यासाठी शर्यतीत आहेत. मिशिगनमधून सिनेटच्या शर्यतीत असलेले अब्दुल एल-सयेद हे अमेरिकन सिनेटमध्ये निवडून येणारे पहिले मुस्लिम ठरण्याची शक्यता आहे.