५० मीटर पिस्तूल स्पर्धेत भारताचा दबदबा; पुरुषांच्या संघ प्रकारात पटकावले सुवर्णपदक

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 1 h ago
प्रातिनिधिक इमेज
प्रातिनिधिक इमेज

 

दोहा 

येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ (ISSF) जागतिक नेमबाजी चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या रवींद्र सिंग, सौरभ चौधरी आणि अमनप्रीत सिंग या त्रिकुटाने पुरुषांच्या ५० मीटर पिस्तूल संघ प्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे. या विजयासह भारताने या जागतिक स्पर्धेत पदकतक्त्यात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

रवींद्र सिंगची दुहेरी चमक आणि सुवर्ण कामगिरी

भारताचा स्टार नेमबाज रवींद्र सिंग याने संघ सुवर्णपदकासोबतच वैयक्तिक ५० मीटर पिस्तूल प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली. ५५९ गुणांची कमाई करत तो भारतीय संघात सर्वाधिक गुण मिळवणारा नेमबाज ठरला. त्याच्या या स्कोअरमध्ये ११ इनर १० चा समावेश होता. अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुवर्ण जिंकणाऱ्या सौरभ चौधरीने ५५१ गुण मिळवले, तर अमनप्रीत सिंगने ५४९ गुणांचे योगदान दिले. भारतीय संघाने एकूण १६५९ गुणांची कमाई करत अव्वल स्थान मिळवले.

चीनला रौप्य तर कोरियाला कांस्य

या स्पर्धेत चीनच्या झांग बिंगचेन, ल्यू जुनेई आणि फेंग लिनलांग यांच्या संघाने १६४८ गुणांसह रौप्यपदक मिळवले. तर दक्षिण कोरियाच्या संघाने १६४३ गुणांसह कांस्यपदकावर समाधान मानले. वैयक्तिक प्रकारात रशियाच्या अँटन अरिस्तारखोव्हने ५६१ गुणांसह सुवर्णपदक जिंकले. या विजयासह भारत सध्या १ सुवर्ण आणि १ रौप्यपदकासह तक्त्यात अव्वल स्थानावर आहे.