अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्याहस्ते ‘महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कार’ स्वीकारताना इंटेरियर डिझायनर जुवेरिया पटवेगार
भक्ती चाळक
बाईचे अस्तित्व फक्त चूल आणि मूलपुरते मर्यादित असते. मध्यमवर्गीय कुटुंबातील स्त्रियांना सामाजिक बंधने आणि रुढींच्या प्रवाहात वाहवत जावे लागते, असा सर्वसामान्य समज आहे. पण या सर्व समजुतींना केराची टोपली दाखवत जुवेरिया पटवेगार आपल्या कर्तुत्वाने थेट दुबईपर्यंत पोहोचल्यात. ‘आवाझ-द-व्हॉईस’शी बोलताना त्यांनी आपली यशोगाथा मांडली.
कुटुंबाचा पाठींबा
जुवेरिया या मूळ कोल्हापूरच्या. यांचे वडील साजिद हे चालक, तर आई तस्मिया या गृहिणी आहेत. दोन लहान भाऊ आणि जुवेरिया असे त्यांचे सर्वसामान्य मुस्लिम कुटुंब. लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असलेल्या जुवेरिया प्रत्येक वर्गात मेरिट होल्डर होत्या. घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती परंतु कुटुंबात शिक्षणाविषयी जनजागृती असल्याने जुवेरिया यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातले गेले.
दहावी आणि अकरावी-बारावीचे शिक्षण पार पडल्यानंतर त्यांच्या आयुष्याला एक अनपेक्षित वळण मिळाले. त्याविषयी जुवेरियासांगतात, “माझे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर मामानी मला इंटेरियर डिझायनिंग करण्याचा सल्ला दिला. मला तेव्हा वाटायचे की ड्रॉइंग म्हणजे डिझायनिंग आणि मला ड्रॉइंग अजिबात येत नव्हते. पण मामाच्या सांगण्यावरून मी सायबर गर्ल्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि तिथूनच माझ्या आयुष्याला खरी दिशा मिळाली.”
शिक्षकांचे मार्गदर्शन
इंटेरियर डिझायनिंगला प्रवेश घेतल्यावर कॉलेजच्या सुरुवातीच्या काळात जुवेरिया यांच्यावर कौटुंबिक रुढी-परंपरांचा पगडा होता. कोणत्याही सर्वसामान्य घरात विशेषतः मुस्लिम कुटुंबातील मुलींचे लवकर लग्न करून देण्याची पद्धत असल्याने त्या नेहमी आपल्या शिक्षकांना म्हणायच्या, “एवढे शिकून काय फायदा, शेवटी तर मला लग्नच करायचे आहे.”
जुवेरिया यांच्या कॉलेजमधील प्रिया आणि शांभवी मॅडम यांनी त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. याबाबत त्या सांगतात की, “प्रिया मॅडम मला नेहमी शिक्षणाचं महत्व सांगायच्या. ‘तू शिक्षण सोडून लग्न करशील पण उद्या तुझ्या पतीला वाटले तू काहीतरी करिअर करावे, तर तुझ्या हातात काहीच नसणार.’ असं त्या म्हणायच्या. मॅडमच्या या शब्दांनी माझे विचार बदलले आणि मी शिक्षणाला व डिझायनिंगला गांभीर्याने घेतले.”
तिसऱ्या वर्षापासून त्यांनी कॉलेज करता करता एका ऑफिसमध्ये काम करण्यास सुरुवात केली. याच काळात त्यांचे कुटुंब कोल्हापूरवरून सांगलीला शिफ्ट झाले. पण शिक्षणाच्या ओढीने त्यांनी एकटीने कोल्हापुरात राहून शिक्षण आणि प्रात्यक्षिक कामाचा अनुभव दोन्ही गोष्टी यशस्वीपणे चालू ठेवल्या. युनिव्हर्सिटीच्या विविध स्पर्धांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवत त्या शेवटी युनिव्हर्सिटी रँक होल्डर म्हणून बाहेर पडली.
लग्नानंतरही करिअरची भक्कम घोडदौड
पदवी पूर्ण झाल्यानंतर अवघ्या तीन-चार महिन्यांतच घरच्यांनी जुवेरिया यांचा विवाह करून दिला. परंतु त्यांनी संसाराच्या चक्रात स्वतःचे स्वप्न हरवू दिले नाही. स्त्रियांनी स्वतःसाठी उभे राहिले पाहिजे, असे त्यांचे म्हणणे आहे.
महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याबद्दल बोलताना जुवेरिया म्हणतात, “घरकाम करणारी असो किंवा नोकरी करणारी असो प्रत्येक स्त्री एकसमान असते. परंतु आपला समाज कमावणाऱ्या बाईला जास्त व्हॅल्यू देतो. आणि मला माझ्या आयुष्यात कधीही कोणत्याच प्रकारची तडजोड करायची नव्हती, म्हणून मी स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा निर्णय घेतला.”
जुवेरिया यांनी सुरुवातीला छोट्या-छोट्या साईट्स घेऊन एक-एक वॉल डिझाईन करून देण्याचे काम सुरू केले. काहींचे काम मोफतही केले. सोबतच सॉफ्टवेअरचे क्लासेसही घेतले. प्रेग्नेंट असताना त्यांनी घरातच सॉफ्टवेअरचे क्लासेस घेणे सुरू केले. एका गोंडस मुलाला जन्म दिल्यानंतर, बाळ अवघ्या तीन महिन्यांचे असताना त्या पुन्हा घराबाहेर पडल्या आणि इंटेरिअरची कामे घ्यायला सुरुवात केली.
दुबईचा महाप्रकल्प
बाळाच्या आगमनानंतर जुवेरिया यांना एकापाठोपाठ एक अनेक साईट्स मिळत गेल्या आणि त्यांचे व्यावसायिक आयुष्य पूर्णपणे बदलून गेले. आणि त्यांनी स्वतःचे स्वतंत्र ऑफिस थाटले. आजवरच्या प्रोजेक्ट्समध्ये त्यांनी स्वतःच्या घराचे डिझाईन करणे हे सर्वात मोठे आव्हान मानले. कारण स्वतःच्या कष्टाच्या पैशांची किंमत काय असते हे त्यांना ठाऊक होते.
परंतु याहूनही मोठे धाडस त्यांनी परदेशातील कामात दाखवले. दुबईतील एका मोठ्या प्रोजेक्टचे काम त्यांच्याकडे आले तेव्हा सुरुवातीला त्यांना शंका आली की आपण हे करू शकू का? पण त्यांनी स्वतःवर विश्वास ठेवला. या अनुभवाबद्दल सांगताना जुवेरिया सांगतात, “दुबईच्या प्रोजेक्टसाठी मी इथून ऑनलाईन मीटिंग्ज घेत होते. तिथले कार्पेन्टर्स, पेंटर्स मी गुगल करून शोधले आणि पूर्ण यशस्वीपणे तो प्रोजेक्ट पार पाडला. जोपर्यंत माणूस एक्सप्लोर करत नाही, तोपर्यंत ‘स्काय इज द लिमिट’ हेच खरं वाटतं.”
‘महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कारा’ने सन्मान
या यशस्वी प्रवासात नुकताच त्यांच्या शिरपेचात एक मानाचा तुरा जोडला गेला आहे. दीड-दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या व्यवसायात मिळालेल्या यशाबद्दल त्यांना नुकताच सप्टेंबर महिन्यात ‘महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. ‘बेस्ट इमर्जिंग इंटीरियर डिझाईन ब्रँड’ श्रेणीतील या सन्मानामुळे त्यांना भविष्यात आणखी मोठ्या स्तरावर काम करण्याची मोठी संधी मिळणार आहे.
धर्माचे वास्तव
समाजात मुस्लिम महिलांच्या स्वातंत्र्याबद्दल असलेल्या गैरसमजांवर जुवेरिया यांनी अतिशय परखड भाष्य केले. इस्लाममध्ये महिलांना घरात कोंडून घेण्याची कोणतीही शिकवण दिली नसून त्यांना आदराचे स्थान दिले आहे, हे त्यांनी आवर्जून स्पष्ट केले.
याविषयी बोलताना जुवेरिया म्हणतात, “लोकांचा गैरसमज आहे की मुस्लिम महिलांना घराबाहेर पडण्याची परवानगी नाही. पण प्रेषित मुहम्मद यांच्या पत्नी खदिजा या मक्केतील सर्वात मोठ्या व्यावसायिक होत्या. अनेकवेळा युद्धांच्या काळात महिला वैद्यकीय सेवा आणि आर्थिक मदत करायच्या. पर्दा ही प्रथा महिलांच्या सुरक्षेसाठी आणि आदरासाठी आहे, त्यांना मागे ठेवण्यासाठी नाही.”
नवीन पिढीसाठी संदेश
आज यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या जुवेरिया पटवेगार यांनी तरुण पिढीसाठी आणि भावी डिझायनर्ससाठी मोलाचा संदेश दिला आहे. आई-वडिलांच्या योगदानाबद्दल सांगताना जुवेरिया म्हणतात, “तुम्ही जगासाठी काही करू नका, स्वतःसाठी करा. पण ज्या आई-वडिलांनी स्वतःच्या पोटाला चिमटे घेऊन तुम्हाला या पदावर पोहोचवले, त्यांना कधीही विसरू नका. आई-वडिलांची किंमत जो माणूस ओळखतो, तो आयुष्यात कधीच मागे राहत नाही आणि त्याला ईश्वराचेही आशीर्वाद लाभतात.”
भविष्यात वेगवेगळ्या देशांमधील आधुनिक तंत्रज्ञान शिकून आणि ते आपल्या देशात आणून भारताला अधिक प्रगत बनवण्याचे जुवेरिया यांचे स्वप्न आहे. कोल्हापूरच्या छोट्याशा गावातून सुरू झालेला जुवेरिया पटवेगार यांचा हा संघर्षमयी आणि तितकाच प्रेरणादायी प्रवास आजच्या प्रत्येक तरुणीसाठी आदर्शवत आहे.