जाहिद मंजूर : जन्मजात अपंगत्वावर मात केलेला 'नशा मुक्त भारत'चा चेहरा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 45 m ago
जाहिद मंजूर
जाहिद मंजूर

 

एहसान फजिली

आज आपला समाज तरुणांमधील व्यसनाधीनतेच्या गंभीर समस्येशी लढा देत आहे. अशा काळात काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील बिरवाह भागातील एका तरुणाने आपल्या शारीरिक अडचणींवर मात करत व्यसनमुक्तीची एक धगधगती मशाल पेटवली आहे. जन्मतःच एक पाय नसतानाही, जम्मू-काश्मीर बोर्ड ऑफ स्कूल एज्युकेशनची दहावीची परीक्षा देणाऱ्या जाहिद मंजूर या सोळा वर्षांच्या मुलाने सायकलिंग, डान्स आणि मार्शल आर्ट्सच्या जोरावर ड्रग्जविरोधी लढ्यात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. संपूर्ण काश्मीरमध्ये जनजागृती करण्यासाठी गेल्या एका दशकापासून तो सातत्याने प्रयत्न करत असून, आज तो 'नशा मुक्त भारत अभियाना'चा एक सक्रिय भाग बनला आहे.

"मी प्राथमिक शाळेत असताना इतर मुले माझ्यापासून दूर राहणे पसंत करायची," असे बडगाम जिल्ह्यातील बिरवाह भागातील मिरपोरा सरकारी हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या जाहिद मंजूर याने 'आवाझ-द-व्हॉईस'शी बोलताना सांगितले. शारीरिक दिव्यांगत्व असूनही, जाहिदला लहानपणापासूनच वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये मोठा रस होता. मनात एकच जिद्द होती. इतर सामान्य मुले जर रोजची कामे आणि खेळ सहज करू शकतात, तर आपण का करू शकत नाही? याच जिद्दीच्या बळावर त्याला लहानपणापासूनच ओळखीसोबत विविध संधी आणि सुविधा मिळत गेल्या.
 

मागमा शेजारील पारंपरिक शाल विणकरांच्या (शालबाफ) सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या जाहिदच्या पालकांना त्याच्या शारीरिक परिस्थितीची सतत चिंता असायची, पण योग्य मार्ग मात्र सापडत नव्हता. गावातले अनेक लोक तो आयुष्यात काही करू शकणार नाही असे म्हणायचे. पण जाहिदच्या आजोबांना मात्र त्याच्या भविष्याची मोठी काळजी होती आणि त्यांनीच त्याला योग्य दिशा दाखवून त्याच्या कलागुणांना वाव दिला.

आपल्या प्रशिक्षकाच्या घरून परतत असताना शेतातील वाटेवर काही तरुण मुलांना ड्रग्ज घेताना जाहिदने पाहिले आणि तिथूनच त्याच्या या मोहिमेची सुरुवात झाली. घाबरलेल्या अवस्थेत तिथून पळ काढत त्याने ही घटना आपल्या शिक्षकांना सांगितली. तेव्हा शिक्षकांनी त्याला सांगितले की, "खरी अपंगत्व शरीरात नाही, तर ड्रग्ज घेणाऱ्यांच्या विचारात असते." या एका वाक्याने त्याचे डोळे उघडले. तेव्हापासून आतापर्यंत त्याने शालेय परिपाठांमध्ये शंभरहून अधिक कार्यक्रमांना संबोधित करत मुलांना व्यसनाधीनतेच्या धोक्यांची जाणीव करून दिली आहे. एका पायाने आपण एवढ्या गोष्टी करू शकतो, तर सुदृढ शरीराच्या तरुणांनी वाईट सवयींमध्ये गुंतण्याऐवजी चांगले काम का करू नये, हा विचार तो सातत्याने मांडत आहे.

व्यसनमुक्तीसाठी ४८ मिनिटांचा चित्रपट
तरुणांना ड्रग्जच्या धोक्यांबद्दल जागरूक करत असतानाच जाहिदने आपले शिक्षक मोहम्मद युसूफ यांच्यासोबत मिळून व्यसनाधीनतेचे घातक परिणाम दाखवणारी ४८ मिनिटांची एक लघुफिल्म तयार केली. सुमारे दोन वर्षांपूर्वी बनवलेली ही फिल्म आज संपूर्ण खोऱ्यातील शाळांमध्ये शैक्षणिक उपक्रमाचा भाग म्हणून दाखवली जात आहे, जेणेकरून विद्यार्थी ड्रग्जपासून दूर राहतील.

जाहिदमधील सुप्त गुण उजेडात येणे हासुद्धा एक योगायोगच होता. २०१४ मध्ये, तो अवघ्या पाच वर्षांचा असताना त्याच्या आजोबांनी त्याला नरबल येथील मिडल स्कूलमध्ये दिव्यांगांना मदत साहित्य वाटपाच्या शिबिरात नेले होते. सर्वसमावेशक शिक्षण कार्यक्रमांतर्गत तिथे व्हीलचेअर, रोलेटर, ट्रायसायकल, श्रवणयंत्रे आणि इतर वैद्यकीय साधने वाटली जात होती. तिथे उपस्थित असलेले शिक्षक आणि सध्याचे जिल्हा समन्वयक मोहम्मद युसूफ पर्रे यांनी या चुणचुणीत मुलाची कामाची उत्सुकता ओळखली.
 

"आम्ही त्याला रोलेटर देणार होतो... पण त्याने त्यावर हात ठेवताच अत्यंत आत्मविश्वासाने ते चालवायला सुरुवात केली," असे जाहिदचे मार्गदर्शक मोहम्मद युसूफ पर्रे यांनी सांगताना नमूद केले की, तो लगेचच त्या साधनासोबत शर्यत लावल्यासारखा धावू लागला होता. त्याच्यातील हा रस पाहून त्यांनी आजोबांना जाहिदच्या प्रशिक्षणाबद्दल सांगितले. त्यानंतर त्यांनी त्याला रोलेटर चालवणे आणि अवघ्या काही दिवसांत सायकल चालवणे शिकवले. अथांग इच्छाशक्तीच्या जोरावर या लहानग्याने सायकलिंगसोबतच मार्शल आर्ट्स आणि फ्लाइंग किक्सचेही धडे गिरवले.

राष्ट्रीय स्तरावर उमटवला ठसा
२०१७ मध्ये 'समग्र शिक्षा' उपक्रमांतर्गत प्रतिभासंपन्न अपंग विद्यार्थ्यांमध्ये जाहिदची निवड झाली आणि हाच त्याच्या आयुष्याचा खरा टर्निंग पॉईंट ठरला. यानंतर त्याला विविध जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये भाग घेण्याची संधी मिळाली. २०१७ पासून तो ओडिशामधील 'अंजली इंटरनॅशनल चिल्ड्रन्स अँड युथ फेस्टिव्हल'मध्ये दरवर्षी सहभागी होत असून, पुढील महिन्यात होणाऱ्या २६ व्या वार्षिक महोत्सवालाही तो उपस्थित राहणार आहे. बांगलादेश, नेपाळ आणि म्यानमारसारख्या शेजारील देशांतील मुले या महोत्सवात भाग घेतात आणि जाहिदने तिथे आपली एक वेगळी छाप सोडली आहे. याशिवाय दरवर्षी ३ डिसेंबर रोजी जम्मूत होणाऱ्या 'आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनाच्या' राज्यस्तरीय कार्यक्रमातही तो सातत्याने सहभागी होत आहे.

इतकेच नाही तर जाहिदला एका बॉलिवूड डान्सरकडून नृत्याचे रीतसर प्रशिक्षण घेण्याची संधीही मिळाली. "आज तो एक उत्तम डान्सर बनला आहे आणि स्वतः इतरांना नृत्याचे धडे देणारा मास्टर बनला आहे, सोबतच त्याचा अभ्यासही सुरू आहे," असे मोहम्मद युसूफ पर्रे अभिमानाने सांगतात. आपल्या अपंगत्वाला हताश न होता त्याने बनवलेली ही वेगळी ओळख आज काश्मीरमधील शेकडो भरकटणाऱ्या तरुणांसाठी एक मोठा दीपस्तंभ ठरत आहे.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter



Latest News