महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाला आता मिळणार सरकारी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
पुण्यातील व्हीआयपी सर्किट हाऊस येथे आयोजित मराक्का डायरी २०२६-२७ प्रकाशन सोहळ्यात उपस्थित अधिकारी
पुण्यातील व्हीआयपी सर्किट हाऊस येथे आयोजित मराक्का डायरी २०२६-२७ प्रकाशन सोहळ्यात उपस्थित अधिकारी

 

प्रशासनाच्या धुरंधर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुण्याच्या व्हीआयपी सर्किट हाऊसमध्ये नुकताच एक कार्यक्रम संपन्न झाला. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक अधिकारी-कर्मचारी असोसिएशन (मराक्का) पुणे शाखेच्या वतीने आयोजित 'मराक्का डायरी २०२६-२७' चा प्रकाशन सोहळा आणि विभागीय बैठक प्रचंड उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली.

कार्यक्रमाची सुरुवात अतिशय पावन वातावरणात पवित्र कुराण पठणाने आणि भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेच्या सामूहिक वाचनाने झाली. उपस्थितांना कर्तव्याची आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देत कार्यक्रमाचा प्रारंभ झाला.

'मराक्का डायरी २०२६-२७' चे दिमाखदार प्रकाशन
या दिमाखदार सोहळ्यात राज्याचे माजी मुख्य सचिव व मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्या शुभहस्ते असोसिएशनच्या अधिकृत मार्गदर्शक पुस्तिकेचे आणि बहुप्रतिक्षित ‘मराक्का डायरी २०२६-२७’ चे अधिकृत प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराक्काचे डॉ. सादिक पटेल विराजमान होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून दुबईचे नामांकित उद्योगपती आणि एच.पी.सी.एल.चे माजी महाव्यवस्थापक भगवानराव गवई उपस्थित होते. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हाजी जतकर यांनी उपस्थितांना संघटनेची ध्येयधोरणे आणि उद्दिष्टे यावर सखोल व दिशादर्शक मार्गदर्शन केले.

शिक्षणाचा जागर 
प्रशासनात काम करताना केवळ सेवा बजावणे पुरेसे नसून समाजाला शैक्षणिक आणि वैचारिकदृष्ट्या सक्षम करणे गरजेचे आहे, हा विचार या सोहळ्यात ठळकपणे समोर आला. नदीम काझी आणि अनिस अकॅडमीचे अनिस कुट्टी यांनी उपस्थितांशी संवाद साधत शिक्षण, सकारात्मक दृष्टिकोन आणि व्यक्तिमत्त्व विकासाच्या विविध पैलूंवर अत्यंत प्रभावी मार्गदर्शन केले. अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा वापर समाजाच्या बौद्धिक उन्नतीसाठी कसा करावा, याचे कानमंत्र त्यांनी यावेळी दिले.

या सोहळ्यात 'आवाझ द व्हॉईस मराठी'चे संपादक समीर शेख यांनी उपस्थितांना विचारप्रवर्तक मार्गदर्शन केले. अल्पसंख्याक समाजाची प्रशासनातील आणि समाजातील प्रतिमा अधिक सकारात्मक आणि प्रेरणादायी कशी घडवता येईल, यावर त्यांनी रोखठोक भाष्य केले.
 

आपल्या भाषणात बोलताना समीर शेख म्हणाले, "माध्यमांचा उपयोग मुस्लिमांचे सकारात्मक आणि प्रेरणादायी चित्रण करण्यासाठी कशा पद्धतीने करता येईल, यावर आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे. आवाझ द व्हॉईस हे एकमेव असे माध्यम आहे, जे सातत्याने या ध्येयासाठी काम करत आहे. मुस्लिमांमधील व्हिक्टिमहुड (पीडितपणाची भावना) पूर्णपणे संपवून त्यांना देशाच्या जडणघडणीत सक्रिय आणि सकारात्मक योगदान देण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे. एक जबाबदार अधिकारी म्हणून तुम्ही सर्वजण या बदलाचे वाहक बनू शकता."

गुणवंतांचा गौरव अन् पदोन्नतीचा सन्मान
या प्रसंगी विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी आणि गुणवंतांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

नवनियुक्त अधिकारी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) निवड झालेले शोएब शेख व साजिद पठाण, तसेच कनिष्ठ अभियंता पदी नियुक्त झालेले अनम शेख व तंजीम बागवान यांचा गौरव करण्यात आला.

सेवानिवृत्त व पदोन्नती : सेवानिवृत्त कृषी संचालक रफिक नायकवडी, सेवानिवृत्त मंडळ अधिकारी पापामिया तांबोळी आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत मुख्याध्यापक पदी पदोन्नती मिळालेल्या शहानज सूरज कुलकर्णी यांचा विशेष सन्मान झाला.

विशेष पुरस्कार व कामगिरी : अति उत्कृष्ट सेवा पदक प्राप्त राजस शेख, समाजसेवक नजीर तांबोळी, उद्योगपती बबलू पठाण, प्राध्यापक डॉ. सरफराज पठाण, विभागप्रमुख डॉ. पगारकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. आर. शेख, एम.एस.-सी.आय.टी. (MS-CIT) परीक्षेत राज्यात प्रथम आलेले इजाज बागवान आणि आवाझ द व्हॉईस मराठीचे संपादक समीर शेख यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक आणि शैक्षणिक कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले.
 

दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात
केवळ बैठका आणि विचारांपर्यंत मर्यादित न राहता मराक्काने आपल्या सामाजिक दातृत्वाचा प्रत्ययही घडवून आणला. वाघोली येथील 'मुस्लिम वेल्फेअर असोसिएशन' आणि 'मराक्का' यांच्या संयुक्त विद्यमाने दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांच्या मदतीसाठी २५,००० रुपयांचा धनादेश माजी मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. 

विभागीय बैठकीत 'लोणावळा जाहीरनाम्या'वर मंथन
दुपारच्या सत्रात राज्यातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या प्रतिनिधींची अत्यंत महत्त्वाची विभागीय बैठक पार पडली. या सत्रात अल्पसंख्याक अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक समस्या व त्यांचे कायदेशीर निराकरण, समाजाचे आर्थिक व सामाजिक सक्षमीकरण, संघटनात्मक बळ वाढवणे आणि बहुचर्चित 'लोणावळा जाहीरनाम्या'ची तळागाळापर्यंत प्रभावी अंमलबजावणी करणे या विषयांवर सविस्तर विचारमंथन करण्यात आले.

या महत्त्वपूर्ण चर्चासत्रासाठी पुणे, मुंबई, नाशिक, सांगली, छत्रपती संभाजीनगर, अमरावती यांसह राज्यातील विविध जिल्ह्यांतून १४० हून अधिक अधिकारी व कर्मचारी आवर्जून उपस्थित होते.

मान्यवरांची मांदियाळी
या दिमाखदार सोहळ्याला प्रशासकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते. यामध्ये ऐनूल अत्तार, सलीम शेख, मोहम्मद युसुफ निशानदार, नजीर शेख, दस्तगीर मुल्ला, हारूण इनामदार, इम्रान नाईकवाडी, मोहसीन बागवान, सलीम मुलाणी, हैदर शेख, सरोष भुरे, जियाऊर रेहमान, आखलाख शेख, अजीम मुल्ला, मजीद शेख, इरफान बेलासे, कय्यूम दाखवे, फारुख खाटिक, फहीम मोमीन, मोहम्मद जतकर आणि शाकीर पटेल या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

नियोजनबद्ध आयोजन 
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रपती पदक विजेते जान मोहम्मद पठाण, जिल्हाध्यक्ष नासीर बिराजदार, उपाध्यक्ष शमीम शेख आणि इसरार पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली इव्हेंट मॅनेजमेंट टीमने काम केला.

या टीममध्ये हारून शेख, मुदस्सर शेख, दिलावर शेख, समीर शेख, नजीर तांबोळी, राजस शेख, नजमुद्दीन शेख, अजीज तांबोळी, अजमत गदवाल, अहमद शेख, सूरज मुलानी, जाकीर शेख, इब्राहिम शेख, लतीफ सुभेदार, ताहीर खान, लतीफ शाह, सूरज कुलकर्णी आणि अब्दुलरज्जाक मुल्ला यांचा समावेश होता. पू्र्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लतीफ शाह व सूरज कुलकर्णी यांनी केले, तर उपस्थितांचे आभार इब्राहिम शेख यांनी मानले. शेवटी राष्ट्रगीताच्या राष्ट्रभक्तीपूर्ण सुरांनी या अभूतपूर्व सोहळ्याची सांगता झाली.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter