भुवनेश्वर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी भुवनेश्वर येथे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) १६९ कोटी रुपयांच्या अत्याधुनिक डेटा सेंटर आणि सायबरसुरक्षा प्रशिक्षण संस्थेचे उद्घाटन केले. यावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा, ओडिशाचे राज्यपाल ब्रजमोहन राम आणि मुख्यमंत्री मोहन चरण माथी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
जटणी येथील इन्फो व्हॅली-२ मधील १८.५५ एकर परिसरात आरबीआयचा हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाची पायाभरणी २२ मार्च २०२३ रोजी तत्कालीन आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या हस्ते करण्यात आली होती. नवी मुंबईनंतर अशा स्वरूपाचे हे देशातील दुसरे डेटा सेंटर ठरले आहे. हे डेटा सेंटर महत्त्वाच्या देयक आणि सेटलमेंट सिस्टम्ससह इतर प्रमुख उपक्रमांना होस्ट करणार आहे.
या प्रकल्पाची उभारणी अशा ठिकाणी करण्यात आली आहे, जी भौगोलिकदृष्ट्या स्थिर असून भूकंपीय संवेदनशील क्षेत्रांपासून दूर आहे. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती आणि भू-राजकीय धोके टळण्यास मदत होईल. पंतप्रधानांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून सुमारे २,१०० पोलीस जवान तैनात करण्यात आले होते. या सुविधेमुळे देशाची डिजिटल वित्तीय प्रणाली अधिक सुरक्षित, सक्षम आणि भविष्यकालीन गरजांनुसार विकसित होण्यास मदत होणार आहे.