अझहर इक्बाल : थोडक्यात बातम्या देणाऱ्या 'इनशॉर्ट्स'चे सह-संस्थापक

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
अझहर इक्बाल
अझहर इक्बाल

 

झेबा नसीम

मोठी अन महत्त्वाची बातमी, तीही अवघ्या ६० शब्दांत. एकेकाळी केवळ एक प्रयोग म्हणून सुरू झालेली ही संकल्पना आज संपूर्ण जगाला 'इनशॉर्ट्स' (Inshorts) या नावाने ओळखली जाते. आजचे जग प्रचंड धावपळीचे झाले आहे आणि प्रत्येक जण आपापल्या आयुष्यात व्यस्त आहे, हे ओळखणाऱ्या एका तरुण असीम ध्येयवेड्याची ही निर्मिती होती. 

धावपळीच्या काळात बातम्यांचा मुख्य गाभा अत्यंत संक्षिप्त रूपात मांडण्याचा हा प्रयोग पूर्णपणे नवा होता. २०१३ मध्ये हा अनोखा प्रयोग सुरू करून पुढे लोकांच्या बातम्या वाचण्याच्या आणि जाणून घेण्याच्या सवयीच बदलून टाकण्याचे श्रेय अझहर इक्बाल या तरुणाला जाते. 'न्यूज इन शॉर्ट्स' नावाच्या एका साध्या फेसबुक पेजवरून सुरू झालेला हा प्रवास आज 'इनशॉर्ट्स' या नावाने एका मोठ्या डिजिटल मीडिया समूहात रूपांतरित झाला आहे.
 

बिहारच्या छोट्या गावातील मोठी स्वप्ने पाहणारा तरुण
अझहर इक्बाल हे मूळचे बिहारमधील किशनगंज या गावचे रहिवासी. एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचे संगोपन झाले. बालपणापासूनच नवीन गोष्टी शिकण्याची आणि अथांग ज्ञान मिळवण्याची त्यांची तीव्र इच्छा होती. अभ्यासात अत्यंत हुशार असलेल्या अझहर यांनी आयआयटी (IIT) प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली आणि २००९ मध्ये आयआयटी दिल्लीत प्रवेश मिळवला.

आयआयटी दिल्लीत त्यांनी गणित आणि संगणक शास्त्राशी संबंधित एकात्मिक उच्च शिक्षण अभ्यासक्रमात प्रवेश घेतला. परंतु, तिथे शिकत असतानाच आपल्या आकांक्षा या पारंपरिक शिक्षण आणि एखाद्या ठराविक नोकरीपुरत्या मर्यादित राहू शकत नाहीत, याची जाणीव त्यांना झाली. याच विचाराने त्यांनी ज्या नामांकित संस्थेत प्रवेश घेतला होता, तिथले शिक्षण अर्धवट सोडण्याचा धाडसी निर्णय घेतला. 

१८ जानेवारी १९९२ रोजी जन्मलेल्या अझहर यांच्या मनात बालपणापासूनच काहीतरी वेगळे आणि मोठे करून दाखवण्याची जबरदस्त जिद्द होती. आजचे त्यांचे आर्थिक आणि व्यावसायिक यश हे त्याच जिद्दीचे आणि निष्ठेचे प्रतिबिंब मानले जाते. २०२३ मधील नोंदींनुसार, त्यांचे वार्षिक उत्पन्न सुमारे १,१४,१४३ अमेरिकन डॉलर इतके अंदाजित करण्यात आले होते.

फेसबुक पेजपासून सुरुवात
२०१३ मध्ये अझहर इक्बाल यांनी त्यांचे सहकारी विद्यार्थी अनुनय अरुणव आणि दीपित पुरकायस्थ यांच्यासोबत मिळून 'न्यूज इन शॉर्ट्स' नावाचे एक साधे फेसबुक पेज सुरू केले. ही कल्पना अत्यंत साधी-सोपी होती, पण तिने काळाची एक मोठी गरज भागवली. महत्त्वाच्या बातम्या निवडून त्या सोप्या आणि संक्षिप्त भाषेत मांडायच्या आणि वाचकांना मूळ बातमी वाचायची असल्यास त्यासाठी स्त्रोताची लिंकही उपलब्ध करून द्यायची, असा हा नमुना होता.

जगात नेमके काय घडत आहे हे जाणून घेण्यासाठी लोकांना मोठा वेळ खर्च करून भलंमोठं वृत्त वाचायची गरज भासू नये, हाच यामागचा मुख्य उद्देश होता. माहितीचा ओघ वेगाने वाढत असताना लोकांकडे वेळेची कमतरता होती. अशा काळात ही नवी संकल्पना हजारो वाचकांसाठी अत्यंत आकर्षक आणि सोयीची ठरली.
 

टी-लॅब्सने दिली स्वप्नांना नवी दिशा
अझहर इक्बाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या या प्रवासातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा टप्पा तेव्हा आला, जेव्हा त्यांच्या या प्रकल्पाची निवड 'टी-लॅब्स' (T-Labs) या इनक्यूबेशन प्रोग्रामसाठी झाली. टाइम्स इंटरनेट ग्रुपचे पाठबळ असलेला हा एक स्टार्टअप उपक्रम होता.

या तिन्ही तरुण उद्योजकांसाठी ही संधी केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित नव्हती. व्यवसाय कसा उभा करायचा, संस्था कशी चालवायची आणि एका कल्पनेचे रूपांतर मोठ्या कंपनीत कसे करायचे, हे प्रत्यक्ष शिकण्याची ही एक सुवर्णसंधी होती. या पाठबळामुळे 'न्यूज इन शॉर्ट्स'ची संकल्पना अधिक वेगाने पुढे गेली आणि नंतर तिने 'इनशॉर्ट्स' या एका संपूर्ण डिजिटल प्लॅटफॉर्मचे रूप धारण केले. एका साध्या फेसबुक पेजचे हळूहळू एका मोठ्या व्यावसायिक उद्योगात रूपांतर होण्याचा हा मुख्य काळ ठरला.

'इनशॉर्ट्स'ची उभारणी
सुरुवातीच्या प्रयोगाला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर, अझहर इक्बाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्रकल्पाला एका औपचारिक व्यवसायाचे स्वरूप दिले. कमीत कमी वेळेत वाचकांपर्यंत जास्तीत जास्त आवश्यक आणि महत्त्वाची बातमी पोहोचवणे, हा इनशॉर्ट्सचा उद्देश अगदी पहिल्या दिवसापासून स्पष्ट होता. व्यस्त राहणाऱ्या लोकांसाठी निरनिराळ्या क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्यांवर झटपट नजर टाकण्याचे ते एक अत्यंत लोकप्रिय माध्यम बनले.

इनशॉर्ट्सच्या वाढत्या लोकप्रियतेने मोठ्या गुंतवणूकदारांचे लक्षही आपल्याकडे वेधून घेतले. सुरुवातीच्या टप्प्यात २०१३ मध्ये टी-लॅब्सने या कल्पनेला १० लाख रुपयांची आर्थिक मदत दिली होती. त्यानंतर कंपनीने गुंतवणुकीच्या विविध फेऱ्यांमधून मोठा निधी उभारला. २०१५ मधील गुंतवणुकीमुळे कंपनीच्या विस्ताराला अधिक गती मिळाली. पुढील काळात आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांनीही या प्लॅटफॉर्ममध्ये रस दाखवला. वेगवेगळ्या अहवालांनुसार, टायगर ग्लोबल आणि टाइम्स इंटरनेटसह अनेक नामवंत गुंतवणूकदारांकडून कंपनीने लाखो डॉलर्सचा निधी मिळवला.

लाखो-करोडो वाचकांपर्यंत पोहोचले
एका साध्या फेसबुक पेजवरून सुरू झालेली ही छोटीशी कल्पना अवघ्या काही वर्षांत लाखो आणि पुढे करोडो युजर्सपर्यंत पोहोचली. इनशॉर्ट्सचे सक्रिय वापरकर्ते आणि डाऊनलोड्सची अथांग संख्या हेच सांगत होती की, संक्षिप्त आणि जलद बातम्यांची मागणी हा केवळ एक तात्पुरता ट्रेंड नव्हता, तर ती काळाची गरज होती.

या यशाने डिजिटल पत्रकारितेतील एका नव्या दृष्टिकोनाला बळकटी दिली. प्रत्येक बातमी समजून घेण्यासाठी खूप वेळ देण्याची गरज नसते, तर माहिती जर नीट निवडून आणि नेटकेपणाने मांडली, तर मोजके शब्दही खूप काही सांगून जातात, याची जाणीव लोकांना झाली.

लोकांशी जोडणारा पब्लिक प्लॅटफॉर्म
इनशॉर्ट्सच्या प्रचंड यशानंतरही अझहर इक्बाल आणि त्यांच्या टीमने स्वतःला केवळ शॉर्ट न्यूजपुरते मर्यादित ठेवले नाही. स्थानिक पातळीवर आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडींशी लोकांना जोडण्यासाठी कंपनीने 'पब्लिक' (Public) नावाचा नवा प्लॅटफॉर्म सुरू केला.

या माध्यमातून कंपनीने इनशॉर्ट्सद्वारे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या संक्षिप्त रूपात देण्याचे काम चालूच ठेवले, तर दुसरीकडे 'पब्लिक' ॲपने स्थानिक बातम्या आणि समाजातील थेट संवादासाठी एक नवा आणि भक्कम मंच उपलब्ध करून दिला.

'शार्क टँक इंडिया' गाठले
 
 
इनशॉर्ट्सची स्थापना आणि तिची टप्प्याटप्प्याने झालेली प्रगती या संपूर्ण प्रवासात अझहर इक्बाल यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. प्रदीर्घ काळ त्यांनी कंपनीचे व्यवस्थापन सांभाळले आणि नंतर चेअरमन पदाची जबाबदारी स्वीकारली. यादरम्यान दीपित पुरकायस्थ यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून पदभार स्वीकारला. तीन विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या एका छोट्या प्रकल्पाचे रुपांतर एका प्रस्थापित कंपनीत कसे झाले, याचाच हा प्रवास होता.

अझहर यांच्या या व्यावसायिक यशाने त्यांना देशातील एक प्रख्यात उद्योगपती म्हणून ओळख मिळवून दिली. 'शार्क टँक इंडिया'च्या तिसऱ्या पर्वात ते एक प्रमुख गुंतवणूकदार (शार्क) म्हणून सहभागी झाले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना देशभरातील नवोदित उद्योजक आणि तरुण संस्थापकांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली. विद्यार्थी असताना फेसबुकवर एक छोटासा प्रयोग करणाऱ्या व्यक्तीसाठी, आता इतर तरुण उद्योजकांच्या व्यावसायिक स्वप्नांचे मूल्यमापन करणे, त्यांना मार्गदर्शन करणे आणि निधी उपलब्ध करून देणे, हा त्यांच्या प्रवासातील एक अत्यंत अभूतपूर्व टप्पा होता.

नव्या पिढीसाठी दीपस्तंभ
अझहर इक्बाल यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी आणि सन्मानांनी गौरवण्यात आले आहे. 'बिजनेस वर्ल्ड ४० अंडर ४०', 'फॉर्च्युन इंडिया ४० अंडर ४०', 'बिजनेस वर्ल्ड यंग आंत्रप्रिन्योर अवॉर्ड', 'फोर्ब्स इंडिया ३० अंडर ३०' आणि 'फोर्ब्स आशिया ३० अंडर ३०' यांसारख्या अत्यंत प्रतिष्ठित याद्यांमध्ये त्यांच्या नावाचा समावेश झाला आहे.

परंतु, त्यांच्या या जीवनप्रवासाचे खरे महत्त्व केवळ पुरस्कार किंवा आर्थिक यशापुरते मर्यादित नाही. दररोज करोडो लोकांना भेडसावणारी एक मुख्य अडचण त्यांनी वेळीच ओळखली, हीच त्यांची सर्वात मोठी ओळख आहे. लोकांना बातम्या तर समजून घ्यायच्या होत्या, पण त्यांच्याकडे वेळेची प्रचंड कमतरता होती; हीच नस त्यांनी अचूक पकडली.

एक अद्वितीय प्रवास 
अझहर इक्बाल यांची ही यशोगाथा अजून पूर्ण झालेली नाही. एका साध्या फेसबुक पेजवरून सुरू झालेला हा प्रवास आज इनशॉर्ट्स आणि पब्लिकसारख्या उत्तुंग मंचांपर्यंत पोहोचला आहे. आयआयटी दिल्लीचे शिक्षण अर्धवट सोडण्यापासून ते एक यशस्वी उद्योगपती होण्यापर्यंत आणि पुढे शार्क टँक इंडियावर तरुणांना मार्गदर्शन करण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास अनेक चढ-उतारांनी भरलेला राहिला आहे.

बिहारमधील एका सामान्य तरुण मुलापासून ते भारतातील अग्रगण्य स्टार्टअप उद्योजकांपर्यंतचा अझहर इक्बाल यांचा हा जीवनप्रवास म्हणजेच जिद्द, संघर्ष, चिकाटी आणि कल्पकतेवर असलेल्या अढळ विश्वासाची एक जिवंत कथा आहे. जेव्हा एखाद्या माणसाच्या मनात काहीतरी नवीन करण्याची तीव्र इच्छा असते आणि त्याला अपयश किंवा अनिश्चिततेची भीती वाटत नाही, तेव्हा एका साध्या फेसबुक पेजवरून सुरू झालेला प्रवाससुद्धा करोडो लोकांच्या दैनंदिन आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनू शकतो, हेच त्यांनी आपल्या कर्तृत्वाने सिद्ध करून दाखवले आहे.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter