ग्रामीण भागातील ३१ टक्के लोकांना उच्च रक्तदाब टाटा मेमोरियल सेंटरच्या संशोधनातून धक्कादायक वास्तव समोर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 5 h ago
प्रातिनिधिक इमेज
प्रातिनिधिक इमेज

 

मुंबई 

ग्रामीण भारतातील प्रौढ लोकसंख्येपैकी दर तीनपैकी एका व्यक्तीला उच्च रक्तदाबाचा (Hypertension) त्रास आहे. मात्र, या आजाराने ग्रस्त असलेल्यांपैकी ८० टक्क्यांहून अधिक म्हणजेच पाचपैकी चार जणांना आपल्या या वैद्यकीय परिस्थितीची कोणतीही माहिती नाही, अशी धक्कादायक माहिती एका नवीन संशोधनातून समोर आली आहे. टाटा मेमोरियल सेंटर (TMC) अंतर्गत असलेल्या सेंटर फॉर कॅन्सर एपिडेमिओलॉजीच्या संशोधकांनी हा अभ्यास केला आहे.

बार्शीतील ४० हजार नागरिकांचा अभ्यास

'इंडियन स्टडी ऑफ हॅल्दी एजिंग' (ISHA) अंतर्गत महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील ३० ते ६९ वयोगटातील सुमारे ४० हजार प्रौढ नागरिकांच्या माहितीचे विश्लेषण करण्यात आले. २०१५ ते २०२० दरम्यान संकलित करण्यात आलेल्या या आकडेवारीनुसार, तब्बल ३१ टक्के सहभागी नागरिकांना उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याचे स्पष्ट झाले. यात २५ टक्के नागरिकांना त्यांच्या आजाराचे प्राथमिक निदानच झाले नव्हते, तर केवळ ६ टक्के लोकांनाच याविषयी पूर्वकल्पना होती.

उपचारांनंतरही रक्तदाब नियंत्रणात राहण्याचे प्रमाण कमी

संशोधनातील निष्कर्षांनुसार, उच्च रक्तदाबाचे योग्य निदान झालेल्या रुग्णांपैकी ७३ टक्के लोक औषधोपचार घेत असल्याचे सांगत असले, तरी त्यातील केवळ ३९ टक्के लोकांचाच रक्तदाब प्रत्यक्षात नियंत्रणात राहतो. त्यामुळे नियमित औषधे घेऊनही अनेक रुग्णांना हृदयविकाराचा झटका (Heart Attack), स्ट्रोक आणि मूत्रपिंडाचे आजार होण्याचा धोका कायम राहतो.

नियमित तपासणी आणि स्क्रीनिंगची गरज

टाटा मेमोरियल सेंटरच्या संशोधक डॉ. शरायू म्हात्रे आणि संचालक डॉ. पंकज चतुर्वेदी यांनी स्पष्ट केले की, ग्रामीण भागात उच्च रक्तदाबाचे वेळीच निदान होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर स्क्रीनिंग आणि दीर्घकालीन पाठपुरावा करणे अत्यंत आवश्यक आहे. वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यास क्रॉनिक आजारांमुळे होणारे मृत्यू कमी करता येऊ शकतात.