नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी नवी दिल्लीत 'चिन्मय अमृत महोत्सव ग्लोबल संमेलनाचे' उद्घाटन केले. यावेळी त्यांनी सामाजिक आव्हानांवर मात करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन करतानाच विभाजक शक्तींविरुद्ध समाजाने एकत्र येण्यावर भर दिला. चिन्मय मिशनच्या ७५ वर्षांच्यापूर्तीनिमित्त आयोजित या तीनदिवसीय संमेलनात देश-विदेशातून ९ हजारांहून अधिक सहभागी झाले आहेत.
कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, गेल्या काही दशकांत समाजासमोर नवी आव्हाने उभी राहिली आहेत. अशा वेळी समाजसुधारणेसाठी आणि विभाजक शक्तींना चोख उत्तर देण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. २०२७ पर्यंत 'विकसित भारत' घडवण्याच्या स्वप्नाशी प्रत्येक नागरिकाला जोडले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. स्वामी चिन्मयंद यांनी स्वातंत्र्याच्या काळात रुजवलेले विचार आज देशाच्या प्रगतीचा मार्ग सुकर करत आहेत. राष्ट्रीय शिक्षण धोरणाद्वारे (NEP) भारतीय ज्ञान प्रणाली आणि आधुनिक विज्ञानाचा मेळ घालण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
गेल्या १२ वर्षांत भारताच्या परदेशात गेलेल्या ६५० हून अधिक प्राचीन आणि चोरीला गेलेल्या मूर्ती भारतात परत आणल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. तसेच देशातील सांस्कृतिक वारसा स्थळे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट होत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. २०४७ मध्ये भारत स्वातंत्र्याची शतकोत्तर पूर्ती साजरी करेल, त्याच वेळी चिन्मय मिशनचीही शतकोत्तर वाटचाल पूर्ण होईल, असे सांगत त्यांनी दोन्ही प्रवासांचे ध्येय एकच असल्याचे अधोरेखित केले. कार्यक्रमादरम्यान त्यांनी स्वामी चिन्मयंद यांच्या 'होलिबॉट' (3D होलोग्राफिक डिजिटल मानवी तंत्रज्ञान) द्वारे संवाद साधून जुन्या आठवणींना उजाळा दिला.