Diwali 2026 : आमच्या हिंदू शेजाऱ्यांच्या दारापुढे रांगोळी काढण्याचा मान मला मिळायचा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
तनुजा संदे
तनुजा संदे

 

तनुजा संदे

आमच्या दिवाळीची तयारी शाळांना सुट्टी लागण्याआधीपासूनच सुरू व्हायची. आमच्या घरी जरी दिवाळीचा फराळ बनत नसला, तरी आजूबाजूचे लोक आमच्यासाठी तीन-तीन किलोचे डबे भरून आवर्जून फराळ घेऊन यायचे. सुट्टी लागण्याआधीच आम्ही सगळ्या लहान मुलींचे ग्रुप्स बनवून शेजाऱ्यांच्या घरी जायचो आणि त्यांना फराळ बनवायला मदत करायचो.

आमच्यासाठी सर्वात जास्त बिझी असलेला दिवस म्हणजे लक्ष्मीपूजनचा. सकाळी ७ वाजल्यापासून मी, माझे भाऊ-बहीण आणि आजूबाजूची सारी लहान मुलं मोठ्या बहिणभावांना घेऊन फटाके उडवायला बाहेर पडायचो. आम्ही राहिला पोलीस लाईनमध्ये होतो. आमच्या सर्वांचे वडील ड्युटीवर असायचे. कोणाची डे शिफ्ट, तर कोणाची नाईट शिफ्ट. त्यामुळे वडिलांसोबत दिवाळी साजरी केल्याचे फारसे आठवतच नाही. पण आमचे हे आजूबाजूचे शेजारीच आमचा खरा परिवार होते.
 

दुपारी शेजारच्या काकू प्लेटभरून फराळ घेऊन यायच्या. आम्ही फराळ खाऊ शकत होतो ते आमच्या शेजारच्या काकींमुळे. आणि एक गंमत म्हणजे, ज्यांच्या घरी मुली नव्हत्या, तिथे दारात रांगोळी काढण्याची जबाबदारी माझी असायची. आम्ही संध्याकाळी ४ वाजल्यापासून दाराबाहेर सुंदर रांगोळी काढायची तयारी करायचो. आमच्या रांगोळ्यांपुढे मग काकू लोकं पणत्या ठेवून चार चांद लावायच्या. 

कोणी जर आज आम्हाला विचारले की, ‘तुमची दिवाळीची आठवण सांगा?’ तर हा कधीही न विसरणारा बालपणीचा अनुभव आहे. त्या आठवणीतल्या कितीतरी गोष्टी अशा आहेत, ज्या आठवून आजही वाटतं की, ‘का गेले ते दिवस?’ खरंच, ही माझी बालपणीची दिवाळीची आठवण आज तुमच्यापर्यंत पोहोचवयला मला भारी आनंद वाटतोय.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter