नवी दिल्ली
जर २०१४ पूर्वीच्या धिम्या गतीनेच मेट्रो रेल्वे जाळ्याचा विस्तार सुरू राहिला असता, तर पुण्यासारख्या शहरांना मेट्रो सुविधेसाठी वर्षांची नव्हे तर अनेक दशकांची वाट पाहावी लागली असती, असे रोखठोक विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केले. देशातील नागरी वाहतूक व्यवस्थेत गेल्या काही वर्षांत झालेल्या जलद परिवर्तनाचा उल्लेख करत त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांचे कौतुक केले.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका पोस्टद्वारे माहिती देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, २०१४ पर्यंत संपूर्ण देशात केवळ पाच शहरांमध्ये मिळून २४८ किलोमीटरचेच मेट्रो मार्ग कार्यान्वित होते. मात्र, आज हे जाळे सुमारे १,२०० किलोमीटरपर्यंत विस्तारले असून देशातील २६ शहरांमध्ये मेट्रो सेवा सुरू झाली आहे. "जर पूर्वीच्याच गतीने काम चालले असते, तर पुण्यासारख्या विकसित शहराला मेट्रो मिळण्यासाठी अजून कित्येक दशके लागली असती, आणि हा विलंब नक्कीच स्वीकारार्ह नव्हता," असे त्यांनी नमूद केले.
पंतप्रधानांनी सांगितले की, सध्या दररोज १ कोटींहून अधिक नागरिक दैनंदिन प्रवासासाठी मेट्रोचा वापर करत आहेत. मेट्रो जाळ्याच्या विस्तारामुळे शहरातील वाहतूक कोंडीत जाणारा वेळ वाचत असून नागरिकांना कुटुंबासाठी अधिक वेळ देता येत आहे. यामुळे लोकांची उत्पादकता वाढून आर्थिक संधी निर्माण होत आहेत. नागरी भारताचा (Urban India) कायापालट करण्यासाठी सरकार या दिशेने सातत्याने कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. ३ नोव्हेंबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधानांनी २१,८०० कोटी रुपयांच्या पुणे मेट्रो प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले होते.