दिल्लीची हवा अत्यंत धोकादायक पातळीवर; ३० केंद्रांवर 'गंभीर' AQI ची नोंद

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 6 h ago
प्रातिनिधिक इमेज
प्रातिनिधिक इमेज

 

नवी दिल्ली 

दिवाळीच्या अवघ्या दोन दिवस आधी देशाची राजधानी दिल्लीच्या हवेची गुणवत्ता अत्यंत खालावली असून संपूर्ण शहरावर दाट धुराचे (Smog) साम्राज्य पसरले आहे. शुक्रवारी सकाळी दिल्लीचा एकूण हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) ३९१ वर पोहोचल्याने दिल्लीतील हवा 'गंभीर' (Severe) श्रेणीच्या उंबरठ्यावर आली आहे.

शहरातील ३० केंद्रांवर 'गंभीर' प्रदूषणाची नोंद

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) आकडेवारीनुसार, दिल्लीतील एकूण ५९ प्रदूषण मापन केंद्रांपैकी ३० केंद्रांवर सकाळी ९ वाजता हवेची गुणवत्ता 'गंभीर' श्रेणीत नोंदवली गेली, तर उर्वरित केंद्रांवर ती 'अत्यंत वाईट' श्रेणीत होती. शहरात रोहिणी भागात सर्वाधिक ४७५ इतका AQI नोंदवला गेला, तर आयआयटी दिल्ली परिसरात तो ४७२ वर पोहोचला होता. सकाळी ८ वाजता ३८९ असलेला निर्देशांक ९ वाजेपर्यंत ३९१ वर पोहोचून हवेची स्थिती अधिक ढासळल्याचे स्पष्ट झाले.

पराटी जाळणे आणि फटाक्यांमुळे धोका वाढणार

'एयर क्वालिटी अर्ली वॉर्निंग सिस्टीम'च्या अंदाजानुसार, दिवाळीच्या दिवसापर्यंत दिल्लीतील हवेची ही अतिधोकादायक स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात (NCR) सध्या शेतातील पराटी जाळण्याचा काळ (Stubble Burning) सुरू आहे. त्यातच दिवाळीच्या सणात फुटणाऱ्या फटाक्यांच्या धुरामुळे या प्रदूषणात अधिक भर पडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सफदरजंग वेधशाळेत किमान तापमान १७.२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. तसेच सकाळी हलके धुके पसरले असून ९ नोव्हेंबरपर्यंत अशीच परिस्थिती राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.