हाँगकाँग
विवाहबाह्य संबंधांमुळे राष्ट्रीय सुरक्षेबाबत चिंता निर्माण झाल्यानंतर चिप निर्माता कंपनी एनव्हिडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जेन्सन हुआंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कंपनीने विद्यमान कार्यकारी उपाध्यक्ष आणि मुख्य वित्तीय अधिकारी कोलेट क्रेस यांची हंगामी सीईओ म्हणून नियुक्ती केली आहे. एका कथित चिनी गुप्तहेरासोबत असलेल्या संबंधांमुळे हुआंग यांच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढला होता. बुधवारी उशिरा प्रसिद्ध झालेल्या माध्यम वृत्तांनुसार, हुआंग यांचे एनव्हिडियाच्याच एका हाताखालील महिला अधिकाऱ्याशीही संबंध होते. या घडामोडींनंतर गुरुवारी जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या एनव्हिडियाचे समभाग प्री-मार्केट व्यवहारात १० टक्क्यांनी घसरले.
मेघास्पीड या कंपनीच्या माजी कार्यकारी अधिकाऱ्याशी हुआंग यांचे संबंध असल्याची माहिती समोर आल्यानंतर एनव्हिडियाच्या संचालक मंडळाने त्यांच्या भवितव्यावर चर्चा करण्यासाठी बैठक घेतली होती. संबंधित महिला चिनी सरकारची गुप्तहेर असल्याचा संशय आहे. संचालक मंडळाने गुरुवारी उद्योजक आणि गुंतवणूकदार हार्वे सी. जोन्स यांची कंपनीचे पहिलेच अध्यक्ष म्हणून नियुक्ती केल्याचे जाहीर केले. दुसरीकडे, राष्ट्रीय सुरक्षा किंवा कंपनीची गोपनीय माहिती उघड झाल्याचे कोणतेही कारण दिसत नसले तरी उपलब्ध सर्व माहितीची सखोल चौकशी केली जाईल, असे एनव्हिडियाने स्पष्ट केले आहे.
'द न्यू यॉर्क टाईम्स'च्या वृत्तानुसार, हुआंग यांचे एलिस हुआंग (जिला हुआंग ले या नावानेही ओळखले जाते) या महिलेशी संबंध होते आणि ती मेघास्पीडमध्ये वरिष्ठ पदावर कार्यरत होती. या दोघांमध्ये कोणतेही कौटुंबिक नाते नाही. अमेरिकन गुप्तचर संस्थांना या जवळीकीची माहिती मिळाली असून ही महिला थेट बीजिंगला माहिती पुरवत असल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला होता. या प्रकरणाची एफबीआयमार्फत चौकशी सुरू असल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी केली होती. चीनने मात्र हुआंग यांना जाळ्यात ओढण्याचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. एआय तंत्रज्ञानासाठी लागणाऱ्या चिप्सच्या निर्मितीत आघाडीवर असलेल्या एनव्हिडियाला चीनमध्ये H200 चिप्स विकण्यासाठी हुआंग यांनी जानेवारीमध्ये ट्रम्प यांची मंजुरी मिळवली होती.
या प्रकरणानंतर सिंगापूरस्थित मेघास्पीड इंटरनॅशनलने आपले पहिले निवेदन प्रसिद्ध केले असून अमेरिकेच्या निर्यात नियंत्रण कायद्यांचे पालन करण्याच्या जबाबदारीकडे आपण अत्यंत गांभीर्याने पाहत असल्याचे म्हटले आहे. अमेरिकन सरकारसोबत पारदर्शकपणे काम करण्यास कंपनी कटिबद्ध असल्याचे मेघास्पीडचे अध्यक्ष आणि सीईओ टॅन योंग पाँग ऊर्फ जेम्स टॅन यांनी स्पष्ट केले. गेल्या वर्षी मेघास्पीडवर प्रगत एनव्हिडिया चिप्स बेकायदेशीरपणे चीनमध्ये पाठवल्याचे आरोप झाले होते, मात्र असे कोणतेही पुरावे नसल्याचे कंपनीने डिसेंबरमध्ये सांगितले होते. सिंगापूर प्रशासनही या आरोपांची चौकशी करत आहे. मेघास्पीडने अमेरिकन वाणिज्य विभागाच्या उद्योग आणि सुरक्षा ब्युरोला (BIS) सहकार्य केले असून संगणक चिप्सची सर्वसमावेशक मोजणी करण्यासाठी एका अमेरिकन कायदा फर्मची नियुक्ती केली आहे. दरम्यान, मेघास्पीडच्या आर्थिक व्यवहारांकडेही लक्ष वेधले गेले असून २०२३ च्या अखेरीपासून २०२४ पर्यंत कंपनीची एकूण मालमत्ता सुमारे ९० पटीने वाढून जवळपास ३ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे, तर २०२३ मध्ये शून्य असलेला महसूल २०२४ मध्ये २९.४ कोटी डॉलरच्या पुढे गेला आहे.