नवी दिल्ली
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला मुजतबा खामेनेई यांचे भारतातील प्रतिनिधी डॉ. अब्दुल मजीद हकीम इलाही यांनी भारतीय नागरिकांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. आग्रा येथील ऐतिहासिक 'शहीद-ए-सालीस' दर्ग्याच्या चार दिवसीय भेटीदरम्यान डॉ. इलाही यांनी भारत आणि इराण या दोन्ही देशांच्या निरंतर प्रगतीसाठी आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली.
दिवाळी उत्सवाचे वर्णन करताना डॉ. इलाही म्हणाले, "दिवाळी हा आनंद आणि प्रकाशाचा सण आहे. प्रत्येक भारतीय नागरिक समृद्ध राहो आणि भारत व इराणमधील मैत्रीपूर्ण संबंध अधिकाधिक दृढ होत राहोत, हीच आमची सदिच्छा आहे." हा प्रकाशाचा उत्सव प्रत्येकाच्या आयुष्यात दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आग्रा येथील 'शहीद-ए-सालीस' या मोगलकालीन दर्ग्यात दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या चार दिवसीय मजलिस कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते आले होते.
दरम्यान, भारतातील इराणचे राजदूत मोहम्मद फताहली यांनीही इराणच्या दूतावासाच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावर एक विशेष व्हिडिओ संदेश जारी केला. 'नमस्कार' या भारतीय अभिवादनाने संदेशाची सुरुवात करत फताहली म्हणाले, "दिवाळीच्या या पावन प्रसंगी मी सर्व भारतीय बंधू-भगिनींना हार्दिक शुभेच्छा देतो. हा दीपौत्सव अंधारावर प्रकाशाचा आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचे प्रतीक आहे." भारत आणि इराण यांच्यात शतकानुशतकांचे सांस्कृतिक व ऐतिहासिक संबंध असल्याचे सांगत त्यांनी दोन्ही देशांमध्ये शांतता आणि सौहार्द टिकून राहो, अशी आशा व्यक्त केली.