आबेदा दिलावर शेख
आजकाल दिवाळी म्हटलं की रेडीमेड फराळ, महागडे कपडे आणि डिजिटल शुभेच्छांचा पाऊस पाहायला मिळतो. पण ५० वर्षांपूर्वीची दिवाळी नेमकी कशी होती? मातीची घरे, शेणाने सारवलेले अंगण, घरच्या घाण्याचं तेल आणि नात्यांमधील ओलावा या साऱ्या गोष्टी आज दुर्मिळ झाल्या आहेत. याच जुन्या आणि सोनेरी आठवणींना आबेदा दिलावर शेख यांनी दिलेला उजाळा...
दिवाळी म्हणजे आनंदाचा सण. सगळीकडे नुसता आनंदी आनंद. माझ्या लहानपणीची दिवाळी म्हणजे ५० वर्षांपूर्वीची गोष्ट. दिवाळी जवळ आली, साफसफाई सुरू व्हायची. त्याकाळी बऱ्याच लोकांची मातीची साधी कौलारू घरं असायची. जमिनी शेणानं सारवलेल्या असायच्या. मग सारवणं सुरू व्हायचं.
आमच्या घराच्या पाठीमागेच शाडू म्हणजेच पांढरी माती मिळायची. ती माती आणायची. मग घर, घराचा मागचा भाग, आजूबाजूचा सगळा भाग मातीनं म्हणजेच पोताऱ्यानं लिंपून काढायचा. माती, पाणी आणि कापडाचा मोठा बोळा म्हणजे पोतारा.
मग आतली जमीन आणि अंगण शेणानं सारवायचं. पण गंमत सांगते, सारवण काढलं, मला तो पसारा अजिबात आवडायचा नाही. मी हळूच मैत्रिणीच्या घरी सटकून जायचे. पण परत आल्यावर चार शिव्या खायच्या, खरमरीत बोलणी ऐकून अंगण सारवायला लागायचंच. मग मी बादलीत पाणी आणि शेण एकत्र करायचे, तेही काठीनं ढवळायचे.
वडील हे मिश्रण तयार करून द्यायचे. मग मी छोट्या पत्र्याच्या डब्यानं म्हणजेच टमरेलानं हे मिश्रण जमिनीवर टाकायचे. तुटलेला छोटा झाडू म्हणजेच भुंडाट घेऊन ते सारवायचे. पण मला शेणाचा खूपच वास यायचा. पण आईची शिस्त एकदम कडक. थोडंतरी काम करावंच लागायचं. असं करून दोन-चार दिवस सगळी स्वच्छता करण्यात जायचे.

दिवाळी म्हटलं, नवे कपडे आलेच. मग कपड्यांसाठी पैशांची जमवाजमव सुरू व्हायची. घरी पाळलेल्या शेळ्या-कोंबड्या असायच्या. त्यातलं एखादं बोकड खास त्यासाठी वाढवलेलं असायचं. ते सोमवारच्या बाजारात विकायचं. मग सगळ्यांसाठी आईच्या पसंतीचे दिवाळीचे कपडे खरेदी व्हायचे. थोडंफार वाण्याकडून सामानही खरेदी केलं जायचं.
दिवाळीच्या दिवसांत पहिला कोंबडा आरवला की सगळ्यांना उठवलं जायचं. मी थोडी कुरबूरच करायचे. आमच्याकडे भयंकर थंडी असायची. गाव डोंगराच्या पायथ्याशी असल्याने थंडी थोडी जास्तच असायची. मी म्हणायचे, मी सगळ्यात शेवटी आंघोळ करेन.
घरात चुलीवर पातेल्यात पाणी तापवलं जायचं. आंघोळ करायला त्यावेळी बाथरूम वगैरे नसायचं. घराच्या समोरच्या बाजूस घडगे रचून दगडांची न्हाणी म्हणजेच मोरी बनवली जायची. तिथेच आंघोळ करावी लागायची. पाणी घरातून बादलीत घेऊन जाईपर्यंत थंड झालेलं असायचं. त्यात भयंकर थंडी.
पण चार आण्याचं उटणं आणि वासाचा साबण लावून आंघोळ करायची. लगेच वासाचंच लाल रंगाचं तेल डोक्यावर लावायचं. मग सगळीकडे नुसता सुगंधच सुगंध असायचा. वातावरण अगदी आनंदी आणि प्रसन्न असायचं. एकदम मज्जा वाटायची.
पहिल्या आंघोळीनंतर सूपभर करंज्या केलेल्या असायच्या. त्यात आम्ही मदत करायचो. पण आईला उलट बोलायची हिंमत नसायची. ती सांगेल तसं करायचं. मग ती शिकवायची, करंजी कशी भरायची, ती फुटू नये म्हणून तिला हातानं व्यवस्थित मुरड कशी घालायची.
शंकरपाळ्या, कापण्या, चकल्या, रव्याचे लाडू, कळ्याचे लाडू, अनारसे असे वेगवेगळे प्रकार व्हायचे. कळीचे लाडू करणं म्हणजे एक मोठा कार्यक्रमच असायचा. कळ्या पाडणं, चुरणं, मग पाक तयार करणं, लाडू वळणं अशी सगळी कामं करावी लागायची. आम्ही सगळे त्यात मदत करायचो. रोज एक-दोन प्रकार केले जायचे.सकाळी-सकाळी आंघोळ झाल्यावर नाश्त्याला फराळ मिळायचा. मग चहाबरोबर कापण्या, शंकरपाळ्या खायचो. खूप मज्जा यायची.
फराळासाठी लागणाऱ्या तेलासाठी घरातील शेंगांचा घाणा गाळून आणायचा. त्यातून तेल काढलं जायचं. तेच तेल दिवाळीसाठी खास वापरायचे. मग संध्याकाळी फटाक्यांची मज्जा असायची. पण फटाके म्हणजे काय, तर लवंगी बार, टिकल्या आणि सुरसुऱ्या. तेही मोजून मापून मिळायचे. मग थोड्या-थोड्या वेळानं फटाके पेटवायचे, मग ते जास्त वेळ पुरतील. त्यावेळेस वडील सगळ्या भावंडांसोबत तिथे असायचे. कुणालाही कसली इजा दुखापत व्हायला नको म्हणून. त्यांच्याच देखरेखीखाली फटाके वाजवायचे.
टिकली वाजवताना अंगणात बसून दगडावर टिकली ठेवायची आणि वरून दुसरा दगड मारायचा. वाट्याला आलेले फटाके आणि टिकल्या अगदी पुरवून-पुरवून वाजवायच्या. जपून ठेवायच्या. तिथे हट्ट अजिबात चालायचा नाही.

धनत्रयोदशीच्या दिवशी थोडेफार पैसे आणि एखादा दागिना पूजला जायचा. धने-गूळ ठेवले जायचे. तिन्ही सांजेला तेही अगदी मनोभावे. दिवाळीच्या दिवशी झाडू म्हणजे लक्ष्मी असायची. वडील झाडू म्हणूच द्यायचे नाहीत, लक्ष्मी म्हणायला लावायचे. मग त्या झाडूचं पूजन केलं जायचं. फक्त साखर-पाणी टाकलं जायचं, पणत्या लावल्या जायच्या. अगदी मनोभावे सगळं केलं जायचं.
दिवाळी पाडव्याला घरातील दप्तराचं म्हणजेच वह्या-पुस्तकांचं पूजन केलं जायचं. पाटी कोळशानं ओढ्यावर घासून आणायची आणि स्वच्छ पुसायची. त्यावर पेन्सिलनं सरस्वती काढायची. वह्या-पुस्तकांसमोर गूळ-खोबरं ठेवायचं आणि म्हणायचं, "खूप बुद्धी दे, यावर्षी पास कर." दुसऱ्या दिवशी तेच गूळ-खोबरं आपल्या वर्गशिक्षकांना द्यायचं, असा नियमच होता.

भाऊबिजेला तर खूप मज्जा असायची. काही माहेरवाशिणी भाऊबिजेला माहेरी यायच्या, काही भाऊ बहिणीकडे जायचे. गोडधोड खाऊन कंटाळा आलेला असायचा. मग मेजवानीसाठी मटणाचं जेवण केलं जायचं. मोठ्या बहिणीला साडीचोळी घेतली जायची. दिवस अगदी आनंदात जायचा.
सगळीकडे नुसता आनंदी आनंद. सख्ख्या भावाबरोबरच मानलेले भाऊसुद्धा तेवढ्याच प्रेमानं आणि आपुलकीनं भाऊबिजेसाठी यायचे. आपल्या ऐपतीप्रमाणे ओवाळणी द्यायचे. त्यात ओवाळणी काय आहे, याचा अजिबात हिशोब नसायचा. त्यामागे नुसतं प्रेम आणि माया असायची. तेच मानलेले भाऊ आजही अगदी प्रेमानं बोलतात, भेटतात, विचारपूस करतात. आमचा असाच एक मानलेला भाऊ म्हणजे बापू मामा. त्याला आम्ही साखर भाऊ म्हणायचो.
तर दुसरा अविनाश. तो आजही भेटतो, बोलतो, विचारपूस करतो. मुलांनासुद्धा गावी यायला सांगत असतो. अजूनही त्या नात्यांमध्ये आपुलकी, जिव्हाळा आणि प्रेम आहे. दिवाळी आली की बालपणीच्या या आठवणी अजूनही ताज्या होतात. मन अगदी भूतकाळात जाऊन रमतं. आणि तो काळ आता परत यावा, असं पुन्हा-पुन्हा वाटत राहतं.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -