भक्ती चाळक
माणूस जन्माला येतो तो परिस्थितीचा गुलाम बनण्यासाठी नाही, तर परिस्थितीलाच आपल्या मेहनतीचा गुलाम बनवण्यासाठी. अशाच संवेदनशील व्यक्तींच्या आयुष्यातील पडद्याआडचे प्रसंग आमच्या ‘एक कहाणी’ या खास मालिकेतून उलगडत आहोत. या अंतर्गत आज आपण जाणून घेणार आहोत विनोदी कलाकृतीने कोट्यवधी प्रेक्षकांना खळाळून हसवणाऱ्या कादर खान यांच्या जीवनप्रवासातील अंगावर काटा आणणारा किस्सा.
दोन रुपयांसाठी चाललेला लढा
कामाठीपुऱ्याच्या झोपडपट्टीत लहानाचे मोठे झालेले कादर खान सुरुवातीच्या काळात चिक्की आणि लिंबू सरबत विकून पोट भरायचे. एका बाजूला भीषण गरिबी अन् दुसऱ्या बाजूला नागपाड्यात गँगस्टर आलमझेब आणि अमीरझादा यांसारख्या गुंडांचा उगम होत होता. अशा गुन्हेगारी आणि गरिबीच्या सावटात कादर खान यांचे बालपण जात होते.
घरात एकवेळच्या जेवणाचा प्रश्न होता. एके दिवशी मित्रांनी कादर खान यांना जवळच्या भारत बाजारात रद्दी आणि भंगार वेचायला येण्याचा सल्ला दिला. त्या कामातून कादर यांना दिवसाचे २ रुपये मिळणार होते. कादर भंगार वेचायला जाणार, ही गोष्ट त्यांच्या आईला समजल्यावर आईने त्यांना अडवले अन् कानपिचक्या देत एक मोलाचा सल्ला दिला.
कादर यांची आई म्हणाली की, “जर तू आज या २ रुपयांच्या मागे धावलास, तर आयुष्यभर भंगारच वेचत राहशील. गरिबीच्या दलदलीतून बाहेर पडण्याची ताकद शिक्षणातच आहे.” आईचे हे शब्द कादर खान यांच्या मनावर बिंबले. त्यांनी शिक्षणालाच आपले सर्वात मोठे शस्त्र बनवले.
शिक्षणाचे धडे देणारा लाडका प्राध्यापक
आईच्या सांगण्यावरून त्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. साबू सिद्दीक पॉलिटेक्निकमधून पदवी घेतली अन् त्याच कॉलेजमध्ये वर्कशॉप टेक्नॉलॉजीचे प्रोफेसर म्हणून रुजू झाले. ते आपल्या लॅम्ब्रेटा स्कूटरवरून ते कॉलेजला यायचे.
शाळेच्या वेळेनंतर शफी इनामदार आणि मुश्ताक मर्चंट यांच्यासोबत साबू सिद्दीकच्या रंगमंचावर रात्री उशिरापर्यंत नाटकांची तालीम चालायची. ‘ताश के पत्ते’ आणि ‘लोकल ट्रेन’ या नाटकांनी त्यांना रंगभूमीवर ओळख मिळवून दिली. उर्दू भाषेवरील प्रभुत्वामुळे आधी ‘जवानी दिवानी’ चित्रपटातून संवादलेखक आणि नंतर एक महान अभिनेता म्हणून त्यांनी बॉलिवूड गाजवले.
विद्यार्थ्यांचे गुरुप्रेम
कादर खान यांच्या आयुष्यातील एक भावनिक प्रसंग त्यांच्या प्राध्यापकपदाच्या काळाशी जोडलेला आहे. एका रात्री ते कॉलेजमधून साडेअकरा वाजता घरी निघाले होते. मध्यरात्री साडेबारा वाजता ते घरी पोहोचल्यानंतर त्यांच्या घराबाहेर शेकडो विद्यार्थ्यांचा एक ग्रूप त्यांची वाट पाहत बसला होता.
ते विद्यार्थी दक्षिण दिल्ली पॉलिटेक्निकमधील होते, जिथे कादर खान पूर्वी शिकवत असत. त्यांच्या मनात शिक्षकाविषयी नितांत आदर आणि भीती दोन्ही होते. कादर घराच्या इथे पोहोचल्यानंतर, एका विद्यार्थ्याने त्यांच्या डोक्याला बाम लावला, दुसऱ्याने डोक्यावर पट्टी बांधली आणि प्रेमाने चहाचा कप हातात दिला.
त्या विद्यार्थ्यांचे ते अथांग प्रेम पाहून कादर खान गहिवरले. त्यांनी कसलाही विचार न करता थेट सकाळी सहा वाजेपर्यंत सलग सहा तास त्या विद्यार्थ्यांना शिकवले. असा हा सिलसिला तब्बल तीन महिने अविरत चालला. विशेष म्हणजे त्या प्राध्यापकाच्या कल्पक मार्गदर्शनामुळे त्या संपूर्ण विद्यार्थ्यांचा बॅच प्रथम श्रेणीत पास झाली.
मी मूलतः एक शिक्षकच आहे!
चित्रपटांच्या अफाट यशानंतरही कादर खान यांच्यातील शिक्षक कधीच हरवला नाही. आयुष्याच्या उत्तरार्धात ते धार्मिक अभ्यासाकडे वळले. त्यांनी लहान मुलांसाठी इस्लामिक पाठ्यपुस्तकेही लिहिली. ते नेहमी म्हणायचे, “मी मूलतः एक शिक्षक आहे, त्यामुळे मला शेवटी शिक्षणाच्या क्षेत्रातच परत जायचे आहे.”