भक्ती चाळक
एकेकाळी रविवारी सकाळचे नऊ वाजले की जणू देशात कर्फ्यू लागल्यासारखी भयाण शांतता पसरायची. रस्ते सुनसान व्हायचे, दुकानांचे शटर डाऊन असायचे आणि घराघरात लोक टीव्हीमोर डोळे ताणून बसलेले पाहायला मिळायचे. तो काळ होता बी.आर. चोप्रा यांच्या महात्वाकांक्षी ‘महाभारत’ या मालिकेचा.
या मालिकेने साऱ्या देशाला वेड लावले होते. मालिकेच्या पडद्यामागची कहाणी देखील रंजक आहे. ज्या माणसाने या महाकाव्याला आपल्या अस्खलित आणि भारदस्त संवादांनी सदासाठी अमर केले, त्याच माणसाच्या निवडीवरून एकेकाळी देशात वादळ उठले होते.
दिग्दर्शक बी.आर. चोप्रा यांनी जेव्हा महाभारतवर काम सुरू केले, तेव्हा त्यांच्या डोक्यात एकच नाव होते, डॉ. राही मासूम रज़ा. पण राही साहेबांनी सुरुवातीला व्यस्ततेचे कारण देत ती ऑफर नम्रपणे नाकारली. लेकीन चोप्रा साहब कहां हार मानने वाले थे? त्यांनी एक मोठी पत्रकार परिषद घेतली आणि जगाला जाहीर करून टाकले की, त्यांची आगामी ‘महाभारत’ मालिका राही मासूम रज़ाच लिहिणार आहेत.
ही बातमी वार्यासारखी पसरली आणि देशभरात एकच खळबळ उडाली. काही कट्टरपंथीयांनी या निवडीवर आक्षेप घेतला. देशभारतून विरोध पत्रे येऊ लागली. अनेकांचा सवाल होता, “महाभारत लिहिण्यासाठी एखादा हिंदू लेखक मिळाला नाही का?” ही निंदानालस्ती आणि विरोध जेव्हा चोप्रासाहेबांपर्यंत पोहोचला, तेव्हा त्यांनी ती सर्व निषेधपत्रे गोळा केली आणि थेट राही मासूम रज़ा यांच्याकडे पाठवून दिली.
राहीसाहेब स्वतःला गांगेय संस्कृतीचे पाईक समजत असल्यामुळे हा सर्व प्रकार त्यांना खटकला. याच संतापातून आणि जिद्दीतून त्यांनी बी.आर. चोप्रांना फोन केला आणि स्पष्ट शब्दांत सांगितले, “आता या महाभारतमध्ये काम मीच करणार आणि संवादही मीच लिहिणार.”
संस्कृती ही कोणाची मक्तेदारी नसते
जेव्हा मालिका टीव्हीवर झळकली तेव्हा ती गाजली सुद्धा आणि आजही अजरामर आहे. भीष्म पितामह असोत, कृष्ण असोत किंवा अर्जुन असो, या सर्वांच्या तोंडून बाहेर पडणारा प्रत्येक संवाद थेट प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेत होता. ज्या माणसाच्या धर्मावरून त्याच्या प्रतिभेवर शंका घेतली गेली, त्याच व्यक्तीच्या शब्दांनी महाप्रभूंच्या या महाकाव्याला घरोघरो पोहोचवले.
राही मासूम रज़ा यांच्याविषयी…
या अजरामर मालिकेचे संवाद लिहिणारे राही मासूम रज़ा यांचा जन्म १ ऑगस्ट १९२७ रोजी उत्तर प्रदेशच्या गाझीपूर जिल्ह्यातील गंगाउली या छोट्याशा गावात झाला. उच्च शिक्षणासाठी ते अलिगढ मुस्लिम विद्यापीठात गेले आणि तिथूनच त्यांनी हिंदी साहित्यात डॉक्टरेट पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी त्याच विद्यापीठात अध्यापनही केले आणि आपल्या अफाट ज्ञानामुळे ते विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय झाले.
त्यांचे साहित्यिक योगदान अथांग आहे. ‘आधा गाँव’, ‘दिल एक सादा कागज’, ‘टोपी शुक्ला’ आणि ‘उसकी बूँद’ यांसारख्या प्रसिद्ध कादंबऱ्या त्यांनी लिहून हिंदी साहित्याला समृद्ध केले. १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धातील परमवीर चक्र विजेता शहीद अब्दुल हमीद यांच्या शौर्यावर आधारित ‘छोटे आदमी की बड़ी कहानी’ हे पुस्तक त्यांनी लिहिले. त्या काळातील वाढता तणाव आणि गैरसमज दूर करण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री वाय. बी. चव्हाण यांनी हे पुस्तक मोठ्या प्रमाणावर रेडिओ आणि शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये प्रसारित केले होते, जेणेकरून जनतेपर्यंत योग्य संदेश जावा.
ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व
राहीसाहेबांचे व्यक्तिमत्त्व एखाद्या जुन्या जमान्यातील राजर्षीसारखे होते. त्यांच्या अंगावर नेहमीच पांढरा कुर्ता, त्यावर वेस्टकोट आणि अलिगढी पायजमा असायचा. त्यांच्या चालण्या-बोलण्यात तहजीब दिसायची. ते नेहमी खिशात विडा ठेवायचे.
सिनेसृष्टीत देखील राहीसाहेबांनी आपल्या लेखणीचा दरारा निर्माण केला. १९७४ मध्ये आलेल्या ‘पत्थर और पायल’ या चित्रपटाचे संवाद त्यांनी लिहिले, पण हृषिकेश मुखर्जी यांच्या ‘मिली’ चित्रपटानंतर चित्रपटसृष्टीचे लक्ष त्यांच्याकडे वेगाने गेले. त्यानंतर त्यांनी हृषिकेश मुखर्जी, राज खोसला, यश चोप्रा आणि सुभाष घाई यांसारख्या दिग्गजांसोबत सलग काम केले. ‘डिस्को डान्सर’, ‘जुदाई’ आणि ‘अनोखा रास्ता’ यांसारख्या व्यावसायिक चित्रपटांसाठीही त्यांनी लेखन केले.
आज जरी ते आपल्यात नसले, तरी बी.आर. चोप्रा यांच्या ‘महाभारत’ मालिकेतील त्यांचे ते अजरामर संवाद आणि त्यांची समृद्ध साहित्यिक कारकीर्द त्यांना आपल्या स्मृतीत कायम ठेवण्यास भाग पाडते.