तंदुरुस्तीचे धडे देणारे साठीतील ‘Father Of GenZ’ गुलाम अंसारी

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
‘फादर ऑफ जेनझी’ गुलाम अंसारी
‘फादर ऑफ जेनझी’ गुलाम अंसारी

 

भक्ती चाळक

कपाळावर अनुभवाच्या रेषा, डोळ्यांत तरुणांनाही लाजवेल असा अंगार आणि शरीरात लोखंडालाही मोडून काढण्याची ताकद. आज सोशल मीडियावर ज्यांच्या फिटनेसचे आणि मार्शल आर्ट्सच्या व्हिडीओवर तरुणाई फिदा झाली आहे, ते आहेत साठ वर्षांचे गुलाम मुस्तफा अंसारी. 

आजची पिढी गुलाम अंसारी यांना ‘फादर ऑफ जेनझी’ म्हणून ओळखते. पण हा किताब मिळवण्यापूर्वीचा त्यांचा प्रवास एखाद्या थ्रिलर चित्रपटापेक्षाही जास्त संघर्षमय राहिलाय. 'आवाझ-द-व्हॉईस'शी बोलताना त्यांनी खडतर पण तितक्याच प्रेरणादायी संघर्षाची कहाणी सांगितली.

सुरुवातीचा काळ
बिहारच्या गया जिल्ह्यातील गुरपा जवळील खटांगी नावाच्या एका गावात जन्मलेल्या मुस्तफा अंसारी यांच्या आयुष्याची सुरुवातच संघर्षाने झाली. घरची परिस्थिती अत्यंत बेताची. वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी काही कौटुंबिक कारणांमुळे त्यांनी घर सोडले. कलकत्ता आणि नंतर दिल्लीत जाऊन हॉटेलात भांडी घासण्यापासून त्यांनी आपल्या जगण्याची लढाई सुरू केली.

नव्वदच्या दशकाच्या मध्यात ते मुंबईत आले. बॉम्बे सेंट्रलवर जेव्हा ते उतरले, तेव्हा त्यांच्या खिशात फक्त पस्तीस रुपये होते. एक वेळच्या जेवणासाठी त्यांनी टॅक्सी धुण्याचे काम केले. अनेक महिने तर नवीन कपडे खरेदी करण्याचीही परिस्थिती नव्हती. पण या अदारिक परिस्थितीतही त्यांनी मार्शल आर्ट्सची आवड कधीही सोडली नाही.

त्या काळातील आठवण सांगताना गुलाम मुस्तफा अंसारी म्हणतात, “त्यावेळी माझे खाण्यापिण्याचे वांदे होते. एका वेळचे जेवण मिळणेही अवघड जायचे. पण माझ्या मनात मार्शल आर्ट्सचे वेड होते. खिशात पैसे नसतानाही मी कराटे क्लासचे पैसे कसेबसे जमवून ते जॉईन करायचो.”

ब्रूस लीच्या चित्रपटाने मार्शल आर्ट्सची भुरळ 
दिल्लीत असताना एका थिएटरमध्ये ब्रूस ली यांचा चित्रपट पाहिल्यानंतर मुस्तफा अंसारी यांच्या मनावर मार्शल आर्ट्सची छाप पडली. इंटरनेट नसलेल्या त्या काळात ब्रूस ली यांची पुस्तके वाचून त्यांनी स्वतःच सराव सुरू केला. पुढे मुन्ना मास्टर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कष्टाने मार्शल आर्ट्सचे धडे गिरवले.

प्रशिक्षण घेत असताना त्यांना अनेकदा दुखापतींचा सामना करावा लागला. त्यांचे कॉलर बोनसुद्धा मोडले, हात अनेकदा फ्रॅक्चर झाले. पण त्यांनी कधीही मार्शल आर्ट्स सोडले नाही. कालांतराने संसाराची जबाबदारी वाढली. वयाच्या एका टप्प्यावर त्यांनी आपल्या धार्मिक आणि पारिवारिक मूल्यांना प्राधान्य दिले. मार्शल आर्ट्सला तात्पुरता पूर्णविराम देऊन पूर्णपणे व्यवसायावर लक्ष केंद्रित केले. 

कठोर दिसणारा भावनिक माणूस
गुलाम यांनी मुंबईत कागदी पिशव्या बनवण्याचा व्यवसाय उभा केला आणि आपल्या कुटुंबाला चांगले आयुष्य दिले. पत्नी रझिया खातून यांच्या निधनानंतर त्यांनी मुलांच्या संगोपनासाठी आयुष्य व्यतीत केले. बाहेरून कठोर दिसणारे गुलाम हे अत्यंत भावनिक स्वभावाचा माणूस. पत्नी रझिया यांच्यावर त्यांचे अफाट प्रेम होते. २०१८ मध्ये झालेल्या पत्नीच्या निधनानंतर आजतागायत रोज ते आपल्या पत्नीच्या कबरीवर जाऊन फातिहा पठन करतात.

गुलाम यांचा मोठा मुलगा अली रज़ा हा गुलाम यांनी सुरु केलेल्या उद्योगाची जबाबदारी सांभाळतो. त्यांची विवाहित मुलगी सहर बानो ही व्यावसायिक मेकअप आर्टिस्ट आहे. त्यांचे दोन छोटे सुपुत्र, गुलफाम अंसारी आणि हसनैन अंसारी, एक डिजिटल मार्केटिंग एजन्सी चालवतात आणि ब्रँड्ससाठी व्हिडिओ निर्मितीचे काम करतात.  

असा झाला ‘फादर ऑफ जेनझी’चा जन्म
मुले मोठी झाल्यावर त्यांनी आपल्या वडिलांना धावपळीच्या व्यवसायातून पूर्णवेळ निवृत्ती दिली. पण आयुष्यभर शिस्तीने आणि कष्टाने जगलेल्या माणसाला एका जागी बसणे अशक्य होते. त्यांचे दोन्ही मुलं गुलफाम आणि हसनैन डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात असल्यामुळे त्यांनी वडिलांना सोशल मीडियावर येण्याचा सल्ला दिला.

याबद्दल सांगताना त्यांचा मुलगा गुलफाम अंसारी म्हणाला, “अब्बा सकाळी ५ वाजता उठतात. आमच्यापेक्षा जास्त स्टॅमिना त्यांच्यात आहे. आम्ही त्यांना कामातून रिटायर केल्यावर ते घरात बोर होत होते. मग आम्ही विचार केला की त्यांच्यातील ३०-३५ वर्षांचा मार्शल आर्ट्स आणि फिटनेसचा अनुभव आपण जगासमोर आणावा.”

गुलफाम पुढे म्हणाला की, “आजची पिढी फिटनेसच्या बाबतीत कुठे ना कुठे चुकतेय, त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. म्हणून आम्ही त्यांच्या चॅनलचे नाव ‘फादर ऑफ जेनझी’ ठेवले. जेणेकरून आमच्यासारखी पोरं त्यांना रिलेट करू लागतील. अब्बांनी स्वतःला सोशल मीडियासाठी पूर्ण तयार केलंय. ते व्हिडीओमध्ये अगदी जेनझीची भाषा बोलतात.” 

सोशल मीडियाचा प्रवास
सुरुवातीला केवळ तीन फॉलोअर्सपासून सुरू झालेला हा प्रवास पाहता पाहता लाखो लोकांपर्यंत पोहोचला. मोठ्या काळाच्या कठोर मेहनतीनंतर त्यांनी ‘७५ हार्ड डे फिटनेस चॅलेंज’ स्वीकारले. या प्रवासात त्यांच्या हाताला फ्रॅक्चर झाले, चॅलेंजमध्ये खंड पडला. पण त्यांनी हार मानली नाही. जखम बरी झाल्यावर त्यांनी पुन्हा नव्या उमेदीने सुरुवात केली.

फादर ऑफ जेनझीने  भारतभरच नव्हे, तर गल्फ देश आणि युरोपियन देशांतील युथलाही वेड लावले आहे. पोर्तुगीज, डच यांसारख्या भाषांमध्ये त्यांचे व्हिडिओ पाहिले जातात. युट्यूब आणि इन्स्टाग्रामवर त्यांचे दीड लाखांच्या जवळपास फॉलोअर्स आहेत. 

जेनझीला फिटनेसचा संदेश
रोज सकाळी न चुकता पाच वाजता उठून दोन तास मार्शल आर्ट्सचा कसून सराव करणे, नानचॅक चालवणे आणि स्ट्रेचिंग करणे आणि रोज न चुकता फिटनेसचे धडे देणे, हा गुलाम यांचा नित्यक्रम. आज ते आपल्या तीन पिढ्यांना घरीच मार्शल आर्ट्सचे धडे देतात. सध्या त्यांच्याकडे वैयक्तिक क्लाउड ट्रेनिंगसाठी भरगोस पगाराच्या ऑफर्स येत आहेत, पण त्यांनी कुटुंबासोबत राहून लोकांपर्यंत कंटेंट पोहोचणे पसंत केले. 

तरुणाईला संदेश देताना गुलाम म्हणतात, “तरुण वयात तुमची शरीरयष्टी पीकवर असते. या वयात तुम्ही लोहाचे चणे चावू शकता. जर तुम्ही या वयात स्वतःला फिट ठेवायला शिकलात, तर ५०-६० वयातही तुम्ही तरुणच राहाल. पैशांपेक्षाही आरोग्य महत्वाचे आहे हे लक्षात ठेवा.”

आज घराघरातून प्रत्येक जेनझीला स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी सक्षम बनवण्याचे मोठे स्वप्न ‘फादर ऑफ जेनझी’ बाळगून आहेत. वयाच्या साठीतही अफाट ऊर्जा आणि जिद्द त्यांच्यात पाहायला मिळतेय. पॅशनच्या जोरावर तरुणांना नवी दिशा देणारे गुलाम अंसारी हे खऱ्या अर्थाने आजच्या पिढीचे प्रेरणास्त्रोत ठरले आहेत.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter