खदीजा नाईक
दिवाळी म्हटलं की लखलखणारे दिवे, रंगीबेरंगी आकाशकंदील, घरासमोरच्या सुंदर रांगोळ्या, फराळाचा सुगंध आणि फटाक्यांचा आवाज हा सगळा माहोल डोळ्यासमोर येतो. विशेषतः आमच्या कोकणात तर अनोखेच वातावरण पाहायला मिळते.
आमच्या घरात फराळ वैगेरे तर बनत नव्हते पण तरीही आमच्या बालपणीच्या सुंदर आठवणींमध्ये दिवाळीला एक खास जागा आहे. कारण कोकणात दिवाळी फक्त एका घरापुरती मर्यादित नव्हती. संपूर्ण गावात दिवाळीचा आनंद पसरलेला असायचा.
दिवाळीची चाहूल लागली की आमचं गावच बदलून जायचं. दिवाळीच्या काही दिवस आधीपासूनच गावात लगबग सुरू व्हायची. घरांची साफसफाई, अंगण सारवणं, घरांना रंग देणं, फराळाची तयारी करणं अशी सगळी कामं सुरू असायची. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मोठा उत्साह दिसायचा.
संध्याकाळ झाली की घराघरांसमोर सुंदर आकाशकंदील लावलेले दिसायचे. कुठे लाल, कुठे पिवळे, तर कुठे हिरवे कंदील. घरासमोर पणत्या लावलेल्या असायच्या. त्या छोट्या छोट्या दिव्यांच्या प्रकाशात आमचं कोकणातलं गाव लय सुंदर दिसायचं.
आमच्या मित्रमैत्रिणींच्या घरासमोर दिवाळीत किल्ले बनवले जायचे. माती आणि दगड वापरून शिवाजी महाराजांचे किल्ले तयार केले जायचे. त्यावर छोटे मावळे, सैनिक आणि भगवे झेंडे लावलेले असायचे. आम्ही ते किल्ले बघायला जायचो. कोणाचा किल्ला किती सुंदर आहे, कोणाच्या किल्ल्यावर काय नवीन आहे, हे बघायला खूप मजा यायची.
पण दिवाळीत आम्हाला सगळ्यात जास्त वाट बघायला लावणारी गोष्ट म्हणजे दिवाळीचा फराळ. आमच्या शेजारी दिवाळी साजरी करणारी अनेक घरं होती. आणि दरवर्षी न चुकता त्या घरांमधून आमच्यासाठी फराळाचं ताट यायचंच. त्या ताटात करंज्या, चकल्या, चिवडा, बेसनाचे लाडू आणि शंकरपाळ्या असायच्या.
अजूनही आठवतं, ते फराळाचं ताट घरी आलं की आम्ही किती खुश व्हायचो. त्यातल्या गोड शंकरपाळ्या आणि बेसनाचे लाडू मला खूप आवडायचे. चकल्या आणि खमंग चिवडा खाताना तर मोहच अरायचा नाही.
आमच्या घरी दिवाळीचा फराळ बनत नसला, तरी शेजाऱ्यांमुळे आम्हाला दरवर्षी दिवाळीच्या फराळाची चव चाखायला मिळायची. त्या काळात शेजाऱ्यांमधलं नातंही खूप जिव्हाळ्याचं होतं. सण कोणाचाही असो, त्यातला आनंद एकमेकांसोबत वाटला जायचा.
फराळानंतर दिवाळीची दुसरी आवडती गोष्ट म्हणजे फटाके. दिवाळीच्या दिवसांत संध्याकाळ कधी होते याची आम्ही वाट बघायचो. मित्रमैत्रिणींसोबत फुलबाज्या उडवणं, भुईचक्र फिरताना बघणं, फुलबाजे लावणं या सगळ्यात खूप मजा यायची. कधी एखादा मोठा फटाका वाजला की आम्ही कानावर हात ठेवून पळायचो. आणि थोड्या वेळाने पुन्हा तिथेच जायचो.
तेव्हा फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाबद्दल आम्हाला फारशी माहिती नव्हती. पण आता मोठं झाल्यावर त्याचे पर्यावरणावर, प्राण्यांवर आणि आपल्या आरोग्यावर होणारे वाईट परिणाम समजले आहेत. त्यामुळे आता कोणताही सण असो आम्ही फटाके विकत घेत नाही किंवा फोडत नाही.
आज आम्ही कोकणातल्या गावात राहत नाही. त्यामुळे दिवाळीच्या वेळी घराघरांतून येणारा फराळ, मित्रांनी बनवलेले किल्ले आणि संध्याकाळी दिव्यांनी उजळलेली गावातली घरं या सगळ्या गोष्टी खूप आठवतात. आज शहरात दिवाळीला मोठमोठे दिवे, आकर्षक सजावट आणि सुंदर आकाशकंदील दिसतात. पण आमच्या कोकणातल्या त्या साध्या दिवाळीची मजाच काही वेगळी होती.
आम्ही दिवाळी साजरी करत नव्हतो, पण दिवाळीचा आनंद मात्र मनापासून अनुभवला. कारण आमच्या कोकणात सण वेगवेगळे असले, तरी आनंद वाटून घेणारी माणसं एकत्र होती. आणि म्हणूनच आजही दिवाळी म्हटलं की मला सर्वात आधी आठवतं ते आमचं लहानपण, आमचं गाव आणि त्या गावातली प्रेमळ माणसं.