सणासुदीच्या काळात भेसळ करणाऱ्यांवर एफएसएसएआयची मोठी कारवाई; ८२ कोटींचे ३,२८० टन अन्नपदार्थ जप्त

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 11 h ago
एफएसएसएआय (FSSAI) संस्थेची देशभरातील अन्न सुरक्षा तपासणी मोहीम आणि जप्त केलेल्या भेसळयुक्त अन्नपदार्थांचे प्रातिनिधिक दृश्य.
एफएसएसएआय (FSSAI) संस्थेची देशभरातील अन्न सुरक्षा तपासणी मोहीम आणि जप्त केलेल्या भेसळयुक्त अन्नपदार्थांचे प्रातिनिधिक दृश्य.

 

नवी दिल्ली 

सणासुदीच्या काळात अन्नपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (FSSAI) देशभरात व्यापक तपासणी मोहीम राबवली आहे. १ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या धडक मोहिमेदरम्यान एफएसएसएआयने तब्बल ८२ कोटी रुपये मूल्याचे ३,२८० टन प्रतिबंधित आणि मानकांनुसार नसलेले अन्नपदार्थ जप्त केले आहेत.

५२ परवाने रद्द, ३१४ आस्थापने सील

अन्न सुरक्षेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी प्राधिकरणाने ५२ अन्न व्यावसायिकांचे परवाने थेट रद्द केले आहेत, तर १,१३३ परवाने निलंबित करण्यात आले आहेत. याशिवाय नियमांचे पालन न करणाऱ्या ३१४ दुकानांना आणि आस्थापनांना सील ठोकण्यात आले आहे. सणांच्या काळात नागरिकांना सुरक्षित आणि शुद्ध अन्न मिळावे यासाठी दक्षता वाढवण्यात आल्याची माहिती एफएसएसएआयने दिली.

पनीर, तूप, दूध आणि मिठाईचे धाडसत्र

१ सप्टेंबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत एफएसएसएआयच्या पथकांनी देशभरातील ५६,४३१ अन्न आस्थापनांची अचानक तपासणी केली. या मोहिमेत मुख्यत्वे पनीर, तूप, दूध आणि सणांसाठी तयार करण्यात येणाऱ्या मिठाईंचे नमुने तपासण्यात आले आणि भेसळ आढळलेला माल जप्त करण्यात आला. एकूण ३,२७९.५७ टन भेसळयुक्त व अस्वच्छ अन्नपदार्थ जप्त करण्यात आले असून त्यांची किंमत ८१.८० कोटी रुपये आहे.

१० हजार व्यापाऱ्यांना सुधारणा नोटीस

या कठोर कारवाईव्यतिरिक्त प्राधिकरणाने १०,०४७ अन्न व्यावसायिकांना (Food Business Operators) स्वच्छता आणि गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी कायदेशीर नोटीस जारी केली आहे. ग्राहकांपर्यंत सुरक्षित अन्न पोहोचावे यासाठी एफएसएसएआयने यंदाच्या वर्षात नेहमीच्या दुकानांसह ई-कॉमर्स कंपन्या आणि ऑनलाइन डिलिव्हरी प्लॅटफॉर्म्सवरील तपासणीचा वेग लक्षणीयरीत्या वाढवला आहे.