गोव्याच्या पालोलेम बीचचा जगात डंका; आशियातील सर्वोत्तम, तर जगात ६ व्या क्रमांकाचा सुंदर समुद्रकिनारा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 11 h ago
गोव्यातील जागतिक दर्जाचा प्रसिद्ध पालोलेम समुद्रकिनारा (Palolem Beach) आणि निसर्गरम्य परिसर.
गोव्यातील जागतिक दर्जाचा प्रसिद्ध पालोलेम समुद्रकिनारा (Palolem Beach) आणि निसर्गरम्य परिसर.

 

पणजी 

दक्षिण गोव्यातील काणकोण तालुक्यातील पालोलेम बीचला (Palolem Beach) आशिया खंडातील सर्वोत्तम समुद्रकिनारा म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच 'Beach.com' च्या जागतिक निर्देशांकात जगातील सर्वोत्कृष्ट २५ समुद्रकिनाऱ्यांच्या यादीत पालोलेम बीचने ६ वा क्रमांक पटकावला आहे, अशी माहिती गोवा राज्याच्या पर्यटन विभागाने दिली.

जागतिक टॉप २५ मध्ये एकमेव आशियाई बीच

पालोलेम हा जागतिक टॉप २५ च्या यादीत स्थान मिळवणारा संपूर्ण आशिया खंडातील एकमेव समुद्रकिनारा ठरला आहे. यामुळे गोव्याच्या किनारपट्टीला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी ओळख मिळाली आहे. अर्धचंद्राकृती खाडी, पांढरी वाळू, नारळाची झाडे आणि शांत पाणी यासाठी पालोलेम बीच जगभरात प्रसिद्ध आहे. 'Global Beach Index 2026' अंतर्गत तज्ज्ञांचे नामांकन, पर्यटकांचे अभिप्राय, नासा (NASA) कडून मिळालेली पाण्याच्या रंगाची आणि स्पष्टतेची आकडेवारी, तसेच हवामान, सुलभता आणि लोकप्रियता यांसारख्या १८ निकषांच्या आधारे ही पाहणी करण्यात आली होती.

जबाबदार अन् शाश्वत पर्यटनावर भर

या आंतरराष्ट्रीय सन्मानाबद्दल बोलताना गोव्याचे पर्यटन मंत्री रोहन खंवटे म्हणाले, "हा गौरव गोव्याच्या किनारपट्टीचे नैसर्गिक सौंदर्य आणि जगभरातील पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभवांचे प्रतीक आहे. आता गोवा सरकार केवळ पर्यटकांच्या संख्येवर भर न देता, पर्यावरण, स्थानिक समुदाय आणि सांस्कृतिक ओळख जपून जबाबदार व शाश्वत पर्यटनाला (Regenerative Tourism) प्रोत्साहन देत आहे."

दक्षिण गोव्याच्या पर्यटनाला नवी चालना

पर्यटन संचालक केदार नाईक यांनी नमूद केले की, हा सन्मान आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर गोव्याचे स्थान अधिक बळकट करेल आणि दक्षिण गोव्यातील इतर निसर्गरम्य भागांकडे पर्यटकांना आकर्षित करण्यास मदत करेल. पालोलेम बीचवर पोहणे, कायकिंग, डॉल्फिन सफारी आणि खाडी भागाची भ्रमंती यांसारख्या उपक्रमांना मोठी पसंती दिली जाते. गोवा आता केवळ समुद्रकिनाऱ्यांपुरता मर्यादित न राहता निसर्ग पर्यटन, वारसा सहल, अध्यात्म आणि स्थानिक खाद्यसंस्कृतीचा विस्तार करत आहे.