Diwali 2026 : पन्नासची नोट, भाजलेला हात आणि पहिली कमाई: दिवाळीच्या आठवणींचा कोलाज - इर्शाद वडगावकर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 9 h ago
इर्शाद वडगावकर
इर्शाद वडगावकर

 

इर्शाद वडगावकर

दिवाळी! अखिल भारतीय स्तरावर साजरा केला जाणारा सर्वात मोठा सण म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सामायिक आनंद आणि प्रकाश वाटून घेण्याचा सण. दिवाळीला केवळ एक हिंदू सण म्हणणे अतिशयोक्ती ठरेल. बहुधा असा एकही माणूस सापडणार नाही ज्याला दिवाळी या सणाशी काहीच देणंघेणं नसेल.

आजकाल जवळपास सर्वच सण आपण अशा गोंगाटयुक्त आणि भडकपणे साजरे करतो की तो सण आनंदात्सव न वाटता सार्वजनिक उपद्रव अधिक वाटावा! मग ते कोणत्याही धर्मातील असोत. दिवाळी देखील याला अपवाद राहिलेली नाही. पण हळूहळू या विषयावर जनजागृती आणि प्रबोधन दिसून येत आहे ही जमेची बाब आहे. त्यामुळे भविष्यात सण-उत्सवांच्या बाबतचं चित्र अधिक दिलासादायक आणि निकोप दिसेल अशी आशा करूयात.

लहानपणीच्या दिवाळीच्या माझ्या आठवणी काय आहेत, असा प्रश्न मी स्वतःला विचारतो आणि डोक्याला ताण देऊन उत्तर शोधायचा प्रयत्न करतो. तेव्हा फारच थोड्या आठवणी हाताला लागतात. परंतु, एक जाणवलं. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर दिवाळीचं मला दिसलेलं रूप हे वेगवेगळं होतं. बहुरंगी होतं. काही छोट्या मोठ्या आठवणी इथे मांडण्याचा प्रयत्न करतो. मांडणी, अर्थातच, अघळपघळ.

माझ्यासाठी माझ्या लहानपणीच्या दिवाळीची सर्वात ठळक आठवण म्हणजे दिवाळीचे आकाशकंदील! आमच्या घरी तशी दिवाळी साजरी केली जायची नाही. त्यामुळे घरी आकाशकंदील किंवा दिवे असण्याचा सवाल नव्हता. मला गल्लीतले आकाशदिवे बघत फिरायला खूप आवडे. मी चार पाच गल्ल्या फक्त घरासमोरील निरनिराळ्या आकाराचे आणि रंगाचे आकाशदिवे पहायला पालथ्या घालायचो. सोबतच पणत्यांची रोषणाई बघायला जाम मजा यायची.

पणत्या बघताना चौथी पाचवीची ती प्रार्थना अलगद आठवायची - 'पणती जपून ठेवा अंधार फार झाला; थोडा उजेड ठेवा अंधार फार झाला…' आता झुंडशाहीच्या ह्या काळात मागे वळून बघताना त्या ओळींचा नेमका अर्थ लागतोय. आठवीत गेल्यावर कार्यानुभव विषय आला. कांबळे सरांनी जिलेटिनचा पेपर वापरून साधे आकाशदिवे कसे तयार करायचे हे शिकवलं. मी ते चांगलचं शिकून घेतलं. इतकं की घरी एकदमच पाच-सहा दिवे बनवून टाकले. ताराच्या आकारातले. त्यातला एक घरासमोर टांगला. पण बाकीच्या दिव्यांपायी घरी काव बसला.

फटाक्यांचं बालसुलभ आकर्षण मलाही होतंच. पण फटाक्यांसाठी घरी - म्हणजे वडिलांकडे - पैसे मागण्याचं धाडस होत नव्हतं. गल्लीतली इतर मुले फटकड्या, पाऊसकुंडी, भुईचक्कर, फुरफुरबाजे इत्यादी वाजवताना फक्त ते बघत बसणं आणि त्याचाच आनंद घेणं, यावरच समाधान मानायचो. एकदा मला ही प्रेक्षकाची भूमिका सहन झाली नाही. काहीतरी करून फटाक्यांसाठी पैसे मिळवायचे असा निश्चय केलाच.

माझा डोळा मम्मीच्या घरातल्या भिशीवर होता. भिशीच्या प्लास्टिक डब्यावर. आता मला नेमकं आठवत नाही मी काय खटपट केली होती. पण चक्क पन्नासची नोट त्या डब्यातून बाहेर काढण्यात यशस्वी झालो होतो. पळत जाऊनच दुकानातून त्या सगळ्या पैशांचे फटाके घेतले आणि पुढच्या गल्लीत जाऊन ते वाजवू लागलो. स्वतःचे फटाके म्हणजे स्वर्गीय आनंद जणू असं वाटलं. पण माझ्या आनंदावर लवकरच विरजण पडलं. मम्मीला कुणकुण लागली कोणास ठाऊक, पण माझी चोरी उघडकीस आली होती.

मला त्या गल्लीत गाठून कान पकडून थोबडीत भडकावली व मारत मारतच त्या दुकानात नेलं जिथून फटाके खरेदी केले होते. तिने कुठलं कौशल्य वापरलं माहित नाही, पण माझ्याकडे शिल्लक असलेले फटाके दुकानदाराला परत करून त्याचे पैसे परत मिळवले. मारत मारतच घरी आणलं. मी बराच वेळ भोकांड पसरून बसलो होतो. माझी ‘दिवाळी निघाली’ होती. अर्थातच, पप्पांपर्यंत ही बातमी मम्मीने पोहोचू दिली नाही त्यामुळे पुढचा मार वाचला होता.

असच एका दिवाळीत गल्लीतली इतर पोरं फटाके वाजवताना एक लक्षात आलं. फटाकड्यांच्या माळेतल्या सगळ्याच फटाकड्या उडत नाहीत, काही तशाच पडून राहतात. पोरांचं लक्ष त्याकडे जात नाही. मग न उडालेल्या फटाकड्या शोधून त्या हळूच खिशात कोंबून नंतर दुसरीकडं जाऊन उडवणं, असा काहीसा मी मार्ग काढला.

माणसाने आपला आनंद स्वतः ‘शोधला’ पाहिजे या सुविचाराचं माझ्या आयुष्यातल कदाचित ते पहिलं आचरण होतं. पण हाच शोध माझ्यावर उलटला. अशीच एक सापडलेली छोटी फटाकड्डी माझ्या हातातच वाजली. दोन-तीन सेकंद कळालच नाही काय झालं. कान सुन्न झाला होता. भानावर आलो तेव्हा उजवा हात प्रचंड भगभगत होता. पळतच घरी आलो. पाण्याचा टब दिसला. त्यात पटकन भाजलेला हात घातला आणि दोन-तीन मिनिट तसाच ठेवला. म्हटलं, व्वा, आता जरा बरं वाटतंय. कळतं वय नव्हतं म्हणून दुहेरी मूर्खपणा झाला होता. अर्थातच, पाण्यात हात घातल्यामुळे आणखी फोड आले. घरी मार बसला हे सांगणं न लगे.

दिवाळी हा शब्द उच्चारला की माझ्यासमोर आता सर्वप्रथम दिवाळी हा सण येत नाही. शाळेतली दिवाळी सुट्टी आणि सुट्टीनंतर सुरू होणारी शाळा येते. दिवाळीच्या अगोदर सहामाही परीक्षा व्हायच्या. आणि सुट्टीनंतर शाळा सुरू झाल्यावर शिक्षक एक एक विषयांचे मार्क वर्गात वाचून दाखवायचे. विषयावर मार्क ऐकण्यात एक वेगळीच मजा. आपल्या स्वतःचे मार्क टिपून घ्यायचेच, पण आपल्या प्रतिस्पर्ध्यांचेही मार्क नोंदवून घ्यायचे. चुरशीपोटी. त्यामुळे दिवाळीची सुट्टी कधी एकदा लवकर संपते असं मला वाटतं राहायचं. (किंवा मुळात ती देतातच का असाही बालबोध प्रश्न मनात अधून-मधून डोकावायचा)

दिवाळी म्हटलं की कोल्हापूरचा महाद्वार रोड आणि त्यावरचा फुललेला दिवाळी बाजार. जवळजवळ अख्खं कोल्हापूर इथं दिवाळीची खरेदी करतं. पप्पा ह्या महाद्वार रोडवरच (तसं म्हणजे या रस्त्याला छेदणाऱ्या जोतिबा रोडवर) पहिल्यापासून होजिअरी कपड्याची हातगाडी लावायचे. दिवाळीच्या आठवड्याभराच्या मोसमात या रस्त्यावर मधोमधच हातगाड्यांच्या आणि दुकानांच्या दोन रांगा वाढतात.

कपडे, फटाके, खेळणी, दिवे, आकाशकंदील आणि दिवाळीच्या इतर सामानांची रेलचेल. पप्पा दिवाळीच्या मोसमात नेहमीपेक्षा वेळाने घरी परत यायचे. त्यांचा सीजन असायचा. मदतीला मोठ्या भावाला सोबत घ्यायचे. चार-पाच दिवस त्याची नेमणूक गाडीवर. त्यांना डबा देण्याच्या निमित्ताने मला शहरात येऊन दिवाळीचा गच्च भरलेला महाद्वार रोड बघायला मिळायचा. हा रोड बघत फिरणे हा माझ्यासाठी एक विरंगुळा होता.

पुढे किल्ल्या बनवण्याचा व्यवसाय करणारा माझा एक मामा दिवाळीच्या सीझनला फटाक्यांची हातगाडी महाद्वार रोडला लावू लागला. त्याला मदतनीस म्हणून माझी नेमणूक झाली. दहावीला होतो तेव्हा. चार दिवस गाडीवर बसून फटाके विक्री करत असताना दिवाळीतली भाऊगर्दी नजरेत साठवून घ्यायची.

मला आठवतंय त्यावेळी चायना बंदूक नव्याने बाजारात आली होती. एका ग्राहकाला त्याचे प्रात्यक्षिक करून दाखवत असताना माझ्याकडून चुकून ती वरच्या दिशेने फायर होण्याऐवजी समोर फायर झाली. समोर होती कपड्यांच्या दुकानांची रांग. वाटलं, आता ठाकूर तो गयो! सू सू बंदुकीतली गोळी दुकानाच्या दिशेने झेपावली. पण सुदैवाने ती दुकानात न शिरता, दुकानाच्या फलकावर लागली. नुकसान असं काही झालं नाही. दुकानाचा मालक ताडताड ओरडला खरा, पण मी बचावलो.

दिवाळी झाल्यावर मामा घरी येऊन मम्मीकडे माझी कमाई देऊन जायचा; काहीतरी तीन-साडेतीनशे रुपये! दिवाळी माझ्यासाठी पहिल्या कमाईचं साधन ठरायची ती अशी. दोन-तीन वर्षे मी सलगपणे दिवाळीत त्या गाडीवर काम केलं असेन. दुनियादारीचा, व्यावहारिक जगाचा माझा पहिला अनुभव कदाचित दिवाळीतली ती फटाक्यांची हातगाडीच असेल.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter