बासित जरगर (श्रीनगर)
श्रीनगरच्या प्रसिद्ध लाल चौकात यंदाची दिवाळी खास ठरली. एकेकाळी दहशतवादी हल्ल्यांसाठी ओळखला जाणारा हा परिसर यंदा शांतता आणि सद्भावाच्या प्रकाशाने उजळून निघाला. काश्मीरमध्ये पुन्हा एकदा शांतता परतल्याचे हे एक सुंदर चित्र होते. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी स्थानिक नागरिक, पर्यटक आणि आयोजकांनी लाल चौकात गर्दी केली होती. सर्वांनी एकत्र येत तब्बल १०,००० हून अधिक दिवे प्रज्वलित केले. यावेळी पुजाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विशेष प्रार्थना पार पडली.
लाल चौकातील ऐतिहासिक "घंटाघर" या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले. या घंटाघराच्या पार्श्वभूमीवर स्वयंसेवकांनी सुंदर रांगोळ्या काढल्या. वाईटावर चांगल्याचा, अंधारावर प्रकाशाचा आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय या अर्थाने नागरिकांनी हजारो तेलाचे दिवे लावले. संपूर्ण परिसर आकर्षक दिव्यांनी आणि सजावटीने नटला होता. लोक या ऐतिहासिक चौकात एकत्र जमून या भव्य उत्सवाचा आनंद घेत होते. हा ऐतिहासिक क्षण प्रत्येकजण आपल्या कॅमेऱ्यात कैद करत होता.
संपूर्ण देशभरात दिवाळी हा सण अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक म्हणून उत्साहात साजरा होतो. लोक घरांना दिवे लावतात, सजावट करतात, एकमेकांना मिठाई देतात, प्रार्थना करतात आणि आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवतात. श्रीनगरमध्येही हाच उत्साह पाहायला मिळाला. शहराचे मुख्य व्यावसायिक केंद्र असलेल्या लाल चौकातील बाजारपेठांमध्ये सणासुदीचा उत्साह ओसंडून वाहत होता. व्यापाऱ्यांनी आपली दुकाने आकर्षक पद्धतीने सजवली होती. शेवटच्या क्षणाची खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी बाजारात गर्दी केली होती.

कुटुंबे, तरुण वर्ग आणि पर्यटकांनी घंटाघराजवळ एकत्र येत या उत्सवाचा मनमुराद आनंद लुटला. काश्मीरच्या विविधतेने नटलेल्या सांस्कृतिक परंपरेची एक सुंदर झलक या निमित्ताने सर्वांना पाहायला मिळाली. वेगवेगळ्या समुदायाचे लोक एकत्र येऊन हा सण साजरा करत होते. सार्वजनिक ठिकाणे लोकांना एकत्र आणण्यात आणि समाजात आनंद, ऐक्य आणि बंधुभावाचे वातावरण निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. या दिवाळीने हीच गोष्ट पुन्हा एकदा नव्याने दाखवून दिली.
श्रीनगरच्या या उत्सवी वातावरणात आता एक नवा आणि रंगतदार अध्याय जोडला गेला आहे. एकेकाळी तणावाचे केंद्र असलेले हे ऐतिहासिक घंटाघर आणि लाल चौक आता पुन्हा एकदा शांतता, आनंद आणि सकारात्मकतेचे मुख्य केंद्र बनले आहे. दहा हजार दिव्यांच्या या झगमगटाने लाल चौकासह संपूर्ण काश्मीर खोऱ्यात शांततेचा एक नवा आणि आश्वासक प्रकाश पसरवला आहे!