देशभरात दिवाळीचा मोठा उत्साह; पंतप्रधान मोदींनी बस्तरमध्ये जवानांसोबत साजरा केला दीपोत्सव

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 11 h ago
'जवानांचा त्याग अन् सेवा देशासाठी प्रेरणादायी'; बस्तरमध्ये सुरक्षा दलांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिवाळी
'जवानांचा त्याग अन् सेवा देशासाठी प्रेरणादायी'; बस्तरमध्ये सुरक्षा दलांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिवाळी

 

नवी दिल्ली 

अनेक दिवसांची खरेदी आणि सणाची लगबग रविवारी संध्याकाळी भव्य दीपोत्सवाने पूर्ण झाली. देशभरात घराघरांवर दिव्यांची आकर्षक रोषणाई, समृद्धीसाठी दुकानांमध्ये झालेले पूजन आणि फटाक्यांच्या आतषबाजीने दिवाळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला.

पंतप्रधान मोदींची बस्तरमध्ये जवानांसोबत दिवाळी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाची दिवाळी नक्षलमुक्त झालेल्या छत्तीसगडच्या बस्तर भागात सुरक्षा दलांच्या जवानांसोबत साजरी केली. बस्तरला रवाना होण्यापूर्वी त्यांनी सोशल मीडियावर लिहिले, "बस्तरमध्ये एकेकाळी नक्षलवादाचा प्रभाव होता, परंतु आता तिथे विकास फुलत आहे. देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या आणि अहोरात्र सेवा करणाऱ्या आपल्या शूर जवानांना सलाम करण्यासाठी मी तिथे जात आहे." तत्पूर्वी, पंतप्रधान मोदी आणि उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेत त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

मुख्यमंत्री फडणवीसांचे कौतुक आणि सोनिया गांधींच्या आठवणी

पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूरमधील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केल्याबद्दल कौतुक केले. "शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसणे हीच माझ्यासाठी खरी दिवाळी आहे," असे फडणवीस म्हणाले. दुसरीकडे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी प्रियंका गांधी वद्रा आणि नात मिराया यांच्यासोबत १, सफदरजंग रोड येथील त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी बालपणीच्या दिवाळीच्या गप्पा मारताना कंदील, फुलबाजे आणि काश्मिरी अन्नाची आठवणीने उजळणी केली.

लाल चौकात दीपोत्सव आणि उत्तर प्रदेशात पूजा

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी देश-विदेशातील नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. श्रीनगरच्या ऐतिहासिक लाल चौकातील घंटाघरावर १० हजारांहून अधिक दिवे प्रज्वलित करून स्थानिक नागरिक आणि पर्यटकांनी दीपोत्सव साजरा केला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हनुमानगढी आणि श्रीराम जन्मभूमी संकुलात जाऊन रामलल्लाचे दर्शन घेतले.

दिल्लीतील हवेची गुणवत्ता 'अत्यंत वाईट' श्रेणीत

एकिकडे सणाचा उत्साह असताना, राजधानी दिल्लीत हवेच्या प्रदूषणाने पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. रविवारी दिल्लीचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) ३७६ नोंदवला गेला, जो 'अत्यंत वाईट' श्रेणीत येतो. सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांनुसार फक्त हरित (ग्रीन) फटाक्यांना ठराविक वेळेत परवानगी असतानाही अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाले. शेतातील पराटी जाळण्याचा काळ आणि फटाक्यांचा धूर यामुळे सोमवारपर्यंत दिल्लीची हवा 'गंभीर' श्रेणीत पोहोचण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.